Alka Kubal: मी बॉलीवुडच्या अनेक ऑफर नाकरल्या, कारण.. अभिनेत्री अलका कुबल यांचा मोठा खुलासा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress alka kubal talks on why she rejecting bollywood movies

Alka Kubal: मी बॉलीवुडच्या अनेक ऑफर नाकरल्या, कारण.. अभिनेत्री अलका कुबल यांचा मोठा खुलासा..

Alka kubal birthday: अभिनेत्री अलका कुबल. मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव. 'माहेरची साडी' सारखे कित्येक चित्रपट, कित्येक मालिका अजरामर केलेली ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात आजही तितकीच सक्रिय आहे.

मग ती 'आई माझी काळूबाई' मालिका असो किंवा 'धुरळा' सारखा दर्जेदार चित्रपट. अलका ताईंनी त्यांच्या अभिनयाची जादू कायमच दाखवली आहे. अलका कुबल म्हणजे रडणारे आणि रडवणारे सिनेमे अशी कितीही टीका त्यांच्यावर झाली तरी मराठी मनोरंजन विश्वातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

एकवेळ अशी होती की अलका ताईंचा चाहतावर्ग प्रचंड मोठा होता. अलका कुबल नावाची बॉलीवुड मध्येही प्रचंड हवा होती. पण त्यांनी तिथे कधीही पाऊल ठेवलं नाही. त्या कायमच हिंदी मनोरंजन विश्वापासून लांब राहिल्या. त्यामागे नेमकी काय कारणं आहेत, याचा खुलासा अलका ताईंनी स्वतः केला आहे.

(actress alka kubal talks on why she rejecting bollywood movies)

आजवर अनेक हिंदी चित्रपटांसाठी अलका ताईंना विचारण्यात आलं पण त्यांनी सर्व ऑफर नाकारल्या. यामागची कारणं काय याबाबत त्यांनी ललिता ताम्हणे लिखित ‘चंदेरी सोनेरी’ या पुस्तकात छापून आले आहे.

याबाबत अलका कुबल म्हणाल्या, ''माहेरची साडी' चित्रपटानंतर मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या मात्र मी त्या नाकारल्या. मी 'धार' नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. यात मी एका पत्रकार मुलीच्या भूमिकेत होते. चित्रपटात ती भूमिका फारच महत्त्वाची होती.

अनेकदा मी भूमिका निवडताना तिची लांबी न बघता त्याची गरज बघते. ते पात्र चित्रपटात किती महत्वाचं आहे ते पाहते. या चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या सहकलाकाराच्या ओळखीचा असल्याने मी ती भूमिका केली. पण हिंदी चित्रपटासाठी वाट्टेल तसे तोकडे कपडे घालण्याची आणि शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती.'

पुढे त्या म्हणाल्या, 'तसंच हिंदी चित्रपटात उगाचच छोटंसं पात्र साकारण्यापेक्षा मराठी चित्रपटात नायिका म्हणून भूमिका करणं केव्हाही चांगलंच नाही का? मी दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांच्या ‘नया ज़हर’ नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. पण तो चित्रपट अजिबात चालला नाही. तो चित्रपट कधी आला आणि कधी गेला हेसुद्धा कोणाला कळलं नाही. त्यामुळे अशा भूमिका करून काहीही उपयोग नाही हे मला जाणवलं. त्यामुळे मी ठरवलं की हिंदी चित्रपटात अशा छोट्या भूमिका अजिबात करायच्या नाहीत.'

टॅग्स :AlkaKubal