'या' अभिनेत्रीला आलाय शबाना आझमींचा राग

Shabana Azami
Shabana Azami

मोजक्याच चित्रपटांमध्ये अभिनय केलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आताही ती एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओद्वारे पायलने अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी शबाना आझमी यांनी एका सोहळ्यामध्ये असे म्हटले होते की, सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्यांना लगेच राष्ट्रविरोधी घोषित केले जात आहे. त्यामुळे सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांनी कोणाला घाबरू नये. यानंतर सोशल मीडियावर शबाना यांच्याविरोधात अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेल्या शबाना यांना अनेकांनी पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला होता. आता शबाना यांच्या विरोधात अभिनेत्री पायल रोहतगीने एक वक्तव्य केले आहे. 'शबाना यांनी आपल्या वक्तव्यात भारतासाठी 'मुल्क' या शब्दाचा वापर केला होता, तो चुकीचा आहे. हिंदुस्तान हा देश असून मुल्क हा शब्द हिंदुस्तानसाठी चुकीचा आहे. तसेच देशातील नागरिकांनी सरकारचा द्वेष करावा यासाठी शबाना प्रयत्न करत आहेत,' अशा आशयाचा एक व्हिडिओ पायलने फेसबुक या सोशल साईटवरून पोस्ट केला आहे.

भारतीय संविधानानुसार भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून भारताचा मुल्क, देश, राष्ट्र असा उल्लेख करण्याचा पूर्ण अधिकार संविधानाने देशातील सर्व नागरिकांना दिला आहे, हे बहुतेक पायलला माहीत नाही. तसेच शबाना यांच्या सारख्या अभिनेत्रीला 'कमी काम केलेली अभिनेत्री' म्हणणाऱ्या पायलने 2012 नंतर कोणत्याच चित्रपटात काम केलेले नाही. आपल्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत जवळपास 20 चित्रपटात काम करणाऱ्या पायलने शबानांना कमी काम करणारी अभिनेत्री असा उल्लेख करणे चुकीचे आहे. 

पायल पाठोपाठ भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनीही शबाना यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'कधी कधी भावनेच्या भरात येऊन कलाकार असे वक्तव्य करत असतात. परंतु जर कोणी चुकीचे वक्तव्य करत असेल, तर त्याला नक्कीच विरोध होणार.'

दरम्यान, शबाना आझमी यांनी सरकारविरोधात बोलणाऱ्यांना लगेच राष्ट्रद्रोही घोषित केले जात आहे, अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. पण असे असले तरी आपण कुणालाही घाबरता कामा नये, असे म्हटले आहे. यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही गंगा-यमुनेच्या खोऱ्यात मोठे झालो असून कोणत्याही परिस्थितीत आपण हार मानणार नाही. भारत हा एक सुंदर देश आहे. मात्र लोकांमध्ये फूट पाडली जात असल्याचे शबाना यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com