भटकंतीत करते भूमिकांचा अभ्यास!

anjali-patil actress
anjali-patil actress

मी  मूळची नाशिकची. मुंबईत आले आणि माझे आयुष्यच बदलत गेले. ते सतत बदलतच राहते. कधी हा प्रवास मोठा वाटतो; तर कधी छोटा. मी खूप लहान असताना सकाळी सकाळी क्‍लासला जायचे. तेव्हा काही लोक बाहेर जाताना अर्थात मुंबईच्या दिशेने जाताना मला दिसायचे. तेव्हा आपणही असेच बाहेर भटकंती करायला जायला हवे, असे वाटायचे. तेव्हापासूनच फिरण्याची वा भटकंती करण्याची आवड माझ्या मनात निर्माण झाली. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी मी पुण्याला ललित कला केंद्रामध्ये गेले. त्यानंतर दिल्लीला ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेले. तेथे माझी ओळख विविध राज्यातील मंडळींशी झाली. हिंदी कविता; तसेच हिंदी साहित्य माझ्या वाचनात आले. काही आंतरराष्ट्रीय मंडळीही तेथे मला भेटली. त्यांच्याही विचारांचे आदान-प्रदान झाले. खूप काही शिकायला मिळाले आणि अजूनही मी शिकतच आहे. तीन वर्षे तेथे मी होते. तेथे माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. खऱ्या  अर्थाने एक कलाकार म्हणून तेथे माझी जडणघडण झाली. 

जेव्हा मी प्रवास सुरू केला, त्या वेळी बॉलीवूडमध्ये जायचे किंवा मराठी चित्रपट करायचे असे काही ठरविलेले नव्हते. केवळ अभ्यास करायचा आणि विविध कला-प्रकारांचा अभ्यास करायचा, हेच माझे ध्येय होते. कारण माझ्यामध्ये जे काही दडलेले आहे ते कलेच्या माध्यमातूनच येणार आहे. त्यामुळे चित्रपट करायचे की नाहीत हे मी ठरविलेले नव्हते. एक चित्रपट केला की दुसरा लगेच स्वीकारायचा, असेही काही नव्हते. माझ्यावर कुणाचे बंधन नव्हते. मला काम निवडण्याचे स्वातंत्र्य होते. आताच्या आयुष्यात मी जे जगते आहे, त्याच्याशी जवळ जाणारे हे काम आहे का... मी ते काम करू शकते का, या कामाला माझ्या आयुष्यात मी बसवू शकते का, असा विचार केला आणि चित्रपट स्वीकारला. ‘दिल्ली इन अ डे’ हा चित्रपट मी केला. त्याचबरोबर ‘अंते’, ‘ना भांगरू तल्ली’, ‘श्री’, ‘मेरी निम्मो’, ‘न्यूटन’, ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’, ‘काला’ यांसारखे बरेच हिंदी, मल्याळम, तेलुगू चित्रपट मी केले. त्याचबरोबर मी श्रीलंकन चित्रपटही केला. माझा हिंदी-मराठीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपट प्रवास सुरू झाला. आता हे काम मला वरदान वाटत आहे आणि मी हे काम एन्जॉय करीत आहे.  

जेव्हा सुरुवातीला मी फेस्टिव्हल फिल्म केल्या, तेव्हा काही जणांनी मला कमर्शियल चित्रपट कर वगैरे वगैरे उपदेशाचे डोस पाजले; परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. कारण मी कोणता चित्रपट किती चालेल वा नाही याचा विचार केला नाही. फक्त आपले काम कसे चांगले होईल हे पाहते. एक वेळ तर माझ्याकडे कामच नव्हते. मी मुंबई सोडून गेले होते हिमालयात. नंतर विविध ठिकाणी फिरले आणि खूप खूप अभ्यास केला. नेपाळ व मॉरिशसमध्ये राहिले. फिरण्याने आणि वाचनाने मला खूप आनंद दिला. केवळ एक ॲक्‍टरचं आयुष्य जगणं अतिशय बोअर आहे. मला ते एकच आयुष्य जगता येणार नाही. सतत फिरणे... वाचन करणे मला खूप आवडते. 

आता नुकतीच मी तिरुवनंतपुरमहून आले आहे. तेथे मी एका डॉक्‍युमेंट्रीसाठी गेले होते. पहिल्यांदाच मी दिग्दर्शन करीत आहे आणि या डॉक्‍युमेंट्रीसाठी अनेक ठिकाणी फिरत आहे. मला अनेक जण विचारतात की तू तुझ्या भूमिकेचा अभ्यास कसा करतेस...? तर मी सतत भटकत असते आणि निरीक्षण करीत असते. तोच माझा अभ्यास असतो. कारण सतत फिरत असताना आपल्याला विविध स्वभावांची माणसे भेटत असतात आणि प्रत्येक माणसाकडून काही ना काही तरी शिकण्यासारखे असते. या भटकंतीमध्ये काही चांगल्या स्क्रीप्ट माझ्याकडे येतात. त्यातील माझ्या हृदयाला भिडणाऱ्या स्क्रीप्ट असतात त्या मी स्वीकारते. ‘मन फकिरा’ या चित्रपटातील माहीची भूमिका मला आवडली म्हणूनच मी स्वीकारली. माही ही भूमिका रोमॅंटिक आहे, तिला बाईक चालवायला आवडते, समाजाने घातलेल्या ज्या अटी आहेत, त्यांना जुमानून जगणारी ही मुलगी आहे. ती तिच्या आयुष्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने एक्‍सपेरिमेंट करत असते. मृण्मयीने जेव्हा या चित्रपटाविषयी मला सांगितले तेव्हा त्या भूमिकेत तिला मी दिसले, असे तिने मला सांगितले होते. त्यामुळे एकूणच ही भूमिका साकारताना मला मजा आली आणि या चित्रपटाचा प्रवासही खूप छान होता. 

मृण्मयीने ‘मन फकिरा’चे दिग्दर्शन केले आहे. मी पहिल्यांदाच एका महिला दिग्दर्शिकेसोबत काम करत आहे. ती एक अभिनेत्रीही आहे. आम्ही सगळे समवयस्क असल्याने तिच्यासोबत काम करतानाही मजा आली. खरं तर मला हिंदीत एका महिला दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा आहे. आता लवकरच मी गुजरात-कच्छला जाणार आहे. माझा हा प्रवास असाच सुरू  राहणार आहे.

शब्दांकन : संतोष भिंगार्डे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com