
Bigg Boss : बिग बॉस मराठी मधल्या या अभिनेत्रीचा झाला भीषण अपघात, नवीन गाडीचं प्रचंड नुकसान
Mira Jagannath News: बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी असलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मीराने सोशल मीडियावर पोस्ट करून हि माहिती सर्वांना सांगितली आहे. या अपघातात मीरा सुदैवाने बचावली असून तिच्या गाडीचं मात्र प्रचंड नुकसान झालंय. मीराने सोशल मीडियावर तिला झालेल्या अपघाताबद्दल सविस्तर सांगितलं आहे
मीराने अपघात झालेल्या गाडीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलीय. "माझा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. देवाचे आभार आणि मित्रमंडळी, नातेवाईक आणि फॅन्सच्या प्रेमामुळे मी अगदी सुखरूप आहे. तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. अशी पोस्ट मीराने लिहिली आहे." मीराने डिसेंबर महिन्यात दत्तजयंतीच्या मुहूर्तावर नवीन गाडी विकत घेतली होती. या अपघातात या नव्या कोऱ्या गाडीचं मोठं नुकसान झालंय.
मीराचा हा अपघात नेमक्या कोणत्या मार्गावर झाला याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. मीराच्या गाडीचा मागचा भाग मात्र संपूर्ण नुकसानग्रस्त झालाय. गाडीचं नुकसान झालं असलं तरीही मीराला कोणतीही दुखापत झाली नाही हि चांगली गोष्ट आहे.
मीरा बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी होती. या सिझनला मीराने टॉप ६ पर्यंत मजल मारली. मीराचा जबरदस्त खेळ, तिची आणि गायत्री दातारची मैत्री, मीराने इतरांसोबत घातलेले वाद अशा अनेक गोष्टींमुळे मीरा बिग बॉस मराठी ३ मधली चर्चेत असलेली सदस्य राहिली. अनेकदा मीराला महेश मांजरेकरांकडून सुद्धा ओरडा मिळाला आहे
याशिवाय बिग बॉस मराठी ४ मध्ये मीरा घरात एक आठवडा चॅलेंजर म्हणून आलेली. मीरा १ आठवडा घरात होती पण तिने सात दिवसांमध्ये चॅलेंजर म्हणून संपूर्ण घर दणाणून सोडलं. सध्या मीरा स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग या मालिकेत साक्षीची भूमिका साकारतेय.