अभिनेत्री स्मिता तांबे 'हवा बदले हासू'मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका 

मंगळवार, 21 मे 2019

लवकरच अभिनेत्री स्मिता तांबे कंगनाच्या 'पंगा' चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये सुद्धा दिसणार आहे. 'हवा बदले हासू'च्या माध्यमातून स्मिता डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवेल यात काही शंका नाही. 

चित्रपट मालिका या माध्यमात विविध भूमिका साकारून स्मिता तांबे हिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता स्मिता 'हवा बदले हासू' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे. आरती ही पर्यावरण शास्त्रात पी. एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत असते. या भूमिकेबाबत स्मिता खूप उत्साही असून ती सांगते की, 'आरती ही हासूने (एक व्यक्तिरेखा) हाती घेतलेल्या पर्यावरणपूरक मोहीमेत त्याची महत्त्वाची सहकारी बनते. ती हासूकडून रोज प्रवाशांबाबतच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी ऐकत असते आणि अप्रत्यक्षरित्या त्याच्या या वायू प्रदूषण रोखण्याच्या लढ्याचा एक भाग बनते. आरती आणि हासूचे नातं पर्यावरणाशी एका विशिष्ट पद्धतीने जुळलेले आहे.'

स्मिता तांबे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. जोगवा, ७२-माईल, परतु, देऊळ यासह विविध मराठी सिनेमात तसेच सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. 'सावट' या सिनेमाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. लवकरच ती कंगनाच्या 'पंगा' चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये सुद्धा दिसणार आहे. 'हवा बदले हासू'च्या माध्यमातून स्मिता डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवेल यात काही शंका नाही. 

'हवा बदले हासू' ही विज्ञान-पर्यावरणपूरक थ्रिलर सिरिज आहे. ज्याची सुरुवात एक सामान्य माणसाच्या जीवनशैलीशीपासून होऊन नंतर पुढे ती वाढत जाऊन त्याचे रुपांतर वैज्ञानिक कथेत होते. सप्तराज सिवा यांनी दिग्दर्शन केले आहे तर प्रतिक मुजुमदार यांनी या वेबसिरीजची निर्मिती तसेच सहाय्यक लेखकाची जबाबदारी सुद्धा सांभाळली आहे. लवकरच ही वेबसिरीज सोनी लाइव्हवर प्रदर्शित होणार आहे.