सोनाली कुलकर्णी : अप्सरा ते हिरकणी

Sonali Kulkarni
Sonali Kulkarni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा 'बकुळा नामदेव घोटाळे' हा पहिला चित्रपट. परंतू तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'नटरंग' या चित्रपटामुळे. 'नटरंग'पासून तिचा खरा प्रवास सुरु झाला. आता ती 'हिरकणी' या चित्रपटात झळकणार आहे. 'नटरंग' ते 'हिरकणी' हा तिचा प्रवास खडतर होता. सोनालीला आता इंडस्ट्रीमध्ये बारा वर्ष पूर्ण होत आहेत. तिच्या एकूणच प्रवासाबाबत...

संघर्ष हा कधीच संपत नाही. यश मिळवण्यापासून ते मिळालेले यश टिकवून ठेवण्यासाठीही संघर्षाला तोंड द्यावेच लागते. इंडस्ट्रीमधल्या यशाबद्दल सांगायचे तर एखादा आपला चित्रपट हिट ठरला तर आपण यशस्वी झालो आणि एखादा चित्रपट हिट नाही झाला तर अयशस्वी झालो असे काहीसे समीकरण आहे. यश हे आज आहे तर उद्या नाही. पण माझ्या बाबतीत यशाचे गणित फारच वेगळे आहे, यश मिळाले म्हणून मी कधीच थांबले नाही. 12 वर्ष मी चित्रपटसृष्टीत काम करतेय, पण यश मिळाले म्हणून माझ्या आयुष्यातील, चित्रपटसृष्टीतील संघर्ष कधीच मी थांबवला नाही.
"हिरकणी' चित्रपटातून बऱ्याच गोष्टी मला नव्याने शिकायल्या मिळाल्या. ध्येय गाठण्यासाठी कसलाही विचार न करता थेट आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे ही या चित्रपटातून मला शिकवण मिळाली. आपण स्वप्न पाहायचे कधीच थांबवायचे नाही आणि जी स्वप्न आपण पाहतोय ती स्वप्ने मोठी पाहायची ही एक गोष्ट 'हिरकणी' चित्रपट करताना मी शिकले.

काही वर्षांपूर्वी मी 'अजिंठा' नावाच्या चित्रपटादरम्यान प्रताप गंगावणे या लेखकाला भेटले. त्यावेळी त्यांनी मला 'हिरकणी' वर एक चित्रपट होऊ शकतो याबाबत कल्पना दिली होती. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, 'अजिंठा' चित्रपटातील चारू हे पात्र तू साकारतेस तर हिरकणी या पात्राचाही तू विचार केला पाहिजे. पण त्यावेळी ही कथा, ही कल्पना पुढे चालली नाही. पुन्हा एकदा सात-आठ वर्षानंतर हीच कथा माझ्याजवळ फिरून आली. इतक्‍या वर्षांनी फिरून एखादी गोष्ट वाट्याला येणे म्हणजे ती गोष्ट आपल्या नशिबातच आहे असे म्हणावे लागेल. याच विचाराने मी या कथेला अनुसरून चित्रपट नक्कीच होऊ शकतो असा विचार माझ्या मनात आला व चित्रपटाचा पुढचा प्रवास सुरु झाला.

'हिरकणी' चित्रपट करताना सुरुवातीला प्रचंड आव्हाने होती, आणि ती आव्हाने कदाचित पेलवण्यासारखी देखील नव्हती, अशावेळी संपूर्ण टीम विखुरली जाण्याची शक्‍यता होती. मात्र आमच्या टीममधील प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांवर असलेल्या विश्‍वासामुळे चित्रपट यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकला. या चित्रपटामुळे प्रसाद ओक, राजेश म्हापुस्कर, संजय मेमाणे यांच्याबाबत माझ्या मनात आपुलकी वाढली आहे.

तीन वर्षांच्या तयारीनंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या काळात अभ्यास, रिसर्च अशा बऱ्याच गोष्टी केल्या. मी माझ्या दिसण्यावर फार मेहनत घेतली. शहरात राहिल्याने मला खेडेगावातील स्त्रीची भूमिका साकारणे आधी कठीण वाटले, माझ्या या चित्रपटातील भूमिकेसाठी मी माझे वजन कमी केले. शरीरयष्टी आणि बांधा व्यवस्थित दिसण्यासाठी मी बराच व्यायामही केला. नाक टोचून घेतले, शिवाय कासाराकडून दीड-दोन महिन्यासाठी चुडा भरून घेतला. गायीचे दूध कसे काढायचे, शेण कसे सारवायचे, चुलीवर भाकरी कशी बनवायची या सर्वच गोष्टी मी नव्याने शिकले. विशेष म्हणजे माझ्या बाळासोबत असलेले माझे नातेसंबंध वाढवण्यासाठी मी बाळाबरोबर बराच काळ एकत्र घालवला. त्या बाळाची आणि माझी खूप छान केमिस्ट्री निर्माण झाली. अशा बारीक बारीक गोष्टी एकत्र करून, त्यांची सवय लावून घेऊन त्या भूमिकेजवळ जाण्याचा प्रयत्न माझा सुरुच होता. चित्रपटात वापरण्यात येणारी भाषा ही मावळ भाषा आहे. त्या भाषेत प्रचंड गोडी आहे आणि ती भाषा भूमिकेजवळची वाटायला हवी म्हणून मी जवळजवळ एक वर्ष फक्त स्क्रिप्टचे वाचन केले. सोनाली कुलकर्णी न वाटता मी हिरकणी वाटण्यासाठी फारच मेहनत घेतली. संपूर्ण चित्रपट आम्ही एका नाटकासारखा बसवून घेतला. हिरकणीची कथा सर्वानाच ज्ञात आहे. मातृत्वाची आणि शौर्याची अशी ही एक कहाणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com