आदर्श शिंदेनं गायलं 'विठूमाऊली'चं शीर्षक गीत 

adarsh shinde sings song for vithu mauli esakal news
adarsh shinde sings song for vithu mauli esakal news

मुंबई : आपल्या दमदार आवाजानं अवघ्या महाराष्ट्रावर गारूड करणाऱ्या आदर्श शिंदेनं स्टार प्रवाहच्या 'विठूमाऊली' या नव्या मालिकेचं शीर्षक गीत गायलं आहे. ही मालिका ३० ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता पाहता येणार असून, या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आता या गाण्यानं तिन्हीसांजेला महाराष्ट्राच्या घराघरात विठूमाऊली अवतरणार आहेत.
 
मराठी संगीतात आदर्श शिंदे हे महत्त्वाचं नाव आहे. आदर्शनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांसाठी हिट गाणी गायली आहेत. महाराष्ट्रात त्याचा मोठा फॅन क्लब आहे. आदर्शने अलीकडेच स्टार प्रवाहच्याच 'गोठ' या मालिकेचंही शीर्षक गीत गायलं होतं जे लोकप्रिय ठरलं. अक्षयराजे शिंदे या नव्या गीतकारानं हे शीर्षक गीत लिहिलं आहे. तर गुलराज सिंह यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. गुलराज सिंह यांनी बरीच वर्षं ऑस्कर विजेत्या ए. आर. रहमान आणि शंकर एहसान लॉय यांच्यासारख्या दिग्गजांसाठी कीबोर्ड वाजवले आणि संगीत निर्मिती केली आहे. विठूमाऊलीच्या शीर्षक गीताद्वारे त्यांनी मराठी टेलिविझनवर पदार्पण केलं आहे.
 
आदर्श शिंदे गाण्याविषयी आणि स्टार प्रवाहसोबत असलेल्या नात्याविषयी म्हणाले, 'स्टार प्रवाहबरोबर काम करताना घरच्यासारखं वातावरण असतं. स्टार प्रवाहबरोबर तीन-चार मालिकांची गाणी मी गायलोय. स्टार प्रवाहनं मला मोठं केलं असंही म्हणता येईल. कारण स्टार प्रवाहच्याच एका रिअॅलिटी शो 'आता होऊन जाऊ  द्या' मधून मी महाराष्ट्रासमोर आलो. त्यामुळे स्टार प्रवाहशी माझे कायमच छान सूर जुळतात. मी आजवर गायलेल्या गाण्यांत विठूमाऊली हे एक वेगळं गाणं आहे. गुलराज सिंह यांनी केलेली रचना अप्रतिम आहे. हे गाणं नक्कीच हिट होईल, याची मला खात्री आहे.'
 
'संगीत ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. त्यात कुठेही भाषेचं किंवा धर्माचं बंधन नसतं. मी पंजाबी असल्यानं मराठीशी माझा संबंध कसा असं अनेकांना वाटतं. मी दोन कारणांनी मराठीशी जोडला गेलो आहे. एक म्हणजे संगीत आहे, जे भाषा आणि धर्मांना एकत्र आणते आणि दुसरं म्हणजे माझी आई मराठी आहे. मराठी संगीत ऐकत मी महाराष्ट्रातच लहानाचा मोठा झालो. माझे मित्र मराठीच आहेत. त्यामुळे माझी मराठीशी असलेली मुळं खूप घट्ट आहेत.  विठ्ठल हे महाराष्ट्राचं दैवत आहे. आम्ही संगीतकार जे काही काम करतो, त्यासाठी कुठेतरी दैवी शक्तीची मदत होते. विठ्ठलाचं गाणं माझ्याहातून झालं हे माझं भाग्य आहे. अक्षयराजे शिंदे यांनी लिहिलेले शब्द अप्रतिम आहेत. आदर्श शिंदे यांनी त्यांच्या आवाजाद्वारे हे गाणं वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. त्यांच्या गायकीला लोककलेची पार्श्वभूमी आहे. या गाण्यात त्याची गरज होतीच, शिवाय या गाण्यात समर्पणाचीही भावना आहे. त्यांनी हे गाणं फारच कमाल पद्धतीनं सादर केलं आहे,' असं गुलराज सिंह यांनी सांगितलं.
 
'विठू माउली' या मालिकेचे शीर्षक गीत कधी एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय, याची आतुरता या गाण्याचे गायक, संगीतकार, गीतकार, कोठारे विझन आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या टीमला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com