रिलिज होण्याच्या दोन दिवस आधी 'तान्हाजी' चित्रपट अडचणीत !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी वर्जन मध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारीला चित्रपटगृहांत झळकणार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असताना सिनेमा अडचणीत आला आहे. पिसाळ-देशमुख कुटुंबियांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. 

मुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप भारतीय इतिहासावर आजही कायम असून आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे! दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी वर्जन मध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असताना सिनेमा अडचणीत आला आहे. पिसाळ-देशमुख कुटुंबियांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. 

Image may contain: 1 person, text

तान्हाजी या चित्रपटामध्ये सुर्याजी पिसाळ या मराठा सरदाराची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आक्षेप पिसाळ कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे. पुण्याच्या जिल्ह्याच्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी आक्षेप वर्तवणारे पत्र जाहिर केले आहे. तान्हाजी सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना हे पत्र लिहिण्यात आले आहे. आक्षेप व्यक्त करताना या पत्रामध्ये लिहिले आहे की,' तान्हाजी : द अनसंग वॉरीअर या चित्रपटात सुर्याजी पिसाळ या मराठा सरदाराची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने, अपुऱ्या व अयोग्य माहितीच्या आधारे खलनायक, असत्यवादी, दोषी व कट-कारस्थानी अशी दाखविण्यात आली आहे. ही व्य़क्तीरेखा चुकीची असून मराठा समाज व पिसाळ-देशमूख कुटुंबिय हे मान्य करणार नाहीत. तसेच संबंधित आशय न बदलल्यास चित्रपटाशी संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल'. 

कडक शब्दांमध्ये अशाप्रकारची आपत्ती व्यक्त करण्यात आली आहे. एक महान कथा मोठ्या पटावर उलगडण्यात आल्याने त्यातून मिळणारा अनुभव हा अद्भुत असेल. शिवाय महाराष्ट्रात हा सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे.अजय देवगन अभिनित तान्हाजी - द अनसंग वॉरीयरची निर्मिती अजय देवगन याच्या एडीएफ आणि भूषण कुमारच्या टी-सिरीजने केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने सांभाळली आहे. 10 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay devgans Tanhaji movie into trouble