'LAXMI'; नाव मोठं लक्षण खोटं,आयएमडीबी रेटिंग 'अडीच स्टार' 

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 10 November 2020

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटाची सगळीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. त्यावरुन वादाला सुरुवातही झाली. त्याच्या नावावरुन अनेकांनी आक्षेप घेतले. काही संघटनांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले.

मुंबई -  आपल्याकडे एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या नावावरुन, कथेवरुन वाद होण्याचे प्रकार अधिक आहेत. मुळात एखादा चित्रपट होण्याअगोदरच त्याच्या कथानकाविषयी, पात्रांविषयीची माहिती समोर येते कशी हे काही कळायला मार्ग नाही. अनेकदा काही निर्मात्यांकडूनच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याप्रकारच्या गोष्टींचा आधार घेतला जात असल्याचे दिसून आले आहे. जसे की अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटाविषयी ज्या उत्साहाने प्रमोशन करण्यात आले प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मिळालेलं रेटिंग हे अतिशय निराशाजनक आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटाची सगळीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. त्यावरुन वादाला सुरुवातही झाली. त्याच्या नावावरुन अनेकांनी आक्षेप घेतले. काही संघटनांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले. प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले आहेत. त्यातच आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरदेखील ‘लक्ष्मी’ अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाला १० पैकी २.६ रेटिंग मिळालं आहे.

आयएमडीबीवर कमी रेटिंग मिळाल्या पहिल्या १० चित्रपटांमध्ये ‘लक्ष्मी’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. लक्ष्मीला आतापर्यंत ६ हजार रेटिंग्स मिळाले आहेत. सध्या अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे लक्ष्मीदेखील डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कियारा आडवाणीने स्क्रीन शेअर केली आहे.

यापूर्वी हिम्मतवाला, रामगोपाल वर्मा की आग, कर्ज, जोकर, सडक 2, रेस 3, गुंडे या चित्रपटांना कमी रेटिंग मिळालं आहे.विशेष म्हणजे, अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘लक्ष्मी’ या नव्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती.इंटरनेट मुव्ही डेटाबेस (आयएमडीबी) हा एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म आहे. यावर चित्रपट पाहणारे चाहते एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवू शकतात. येथे स्टार्स पद्धतीवर कोणत्याही कलाकृतीला रेटिंग दिलं जाते. या प्लॅटफॉर्मवर चित्रपट, मालिका, वेब  सिरीज, व्हिडिओ गेम्स यांना रेटिंग दिले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar Kiara Advani Laxmii Released IMDB Ratings very low