तिचे कपडे नव्हे, तुमचे विचार छोटे- अक्षयकुमार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

अक्षयकुमारने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, "आज मला माणूस असण्याचीच लाज वाटत आहे. आणि काही लोक रस्त्यावर होणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचेही समर्थन करण्याची लाज बाळगत नाहीत..."

मुंबई- बंगळूरमधील छेडछाडीच्या घटनेला त्या मुलीचे छोटे कपडे जबाबदार आहेत म्हणणाऱ्या अबू आझमींना अभिनेता अक्षय कुमार सणसणीत उत्तर दिले आहे. 'तिचे छोटे कपडे नव्हे, तर तुमचे छोटे विचार त्याला कारणीभूत आहेत' असे अक्षयने म्हटले आहे.

आपली पत्नी, लहान मुलगी यांच्या सोबत केपटाऊन येथे कौटुंबिक सहलीला गेलेला अक्षयकुमार नुकताच परतला आहे. 
"मुलीला कडेवर घेऊन विमानतळावरून निघालो असतानाच टीव्हीवर मला एक बातमी दिसली. नववर्षाच्या आरंभी बंगळूरमध्ये काही लोकांचा भर रस्त्यावर वैश्यांप्रमाणे नाच पाहिला. तुम्हाला काय वाटलं माहीत नाही, परंतु माझं रक्त खवळलं. एका मुलीचा पिता आहे म्हणून आणि नसतो तरी हेच म्हटलं असतं की जो समाज आपल्या स्त्रियांना इज्ज देऊ शकत नाही त्या समाजाला मानवी समाज म्हणवून घेण्याचा काही हक्क नाही."

अक्षयकुमारने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, "आज मला माणूस असण्याचीच लाज वाटत आहे. आणि काही लोक रस्त्यावर होणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचेही समर्थन करण्याची लाज बाळगत नाहीत. मुलीने छोटे कपडे का घातले? मुलगी रात्री बाहेर का गेली? असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनो थोडीशी तरी लाज बाळगा. छोटे त्या मुलीचे कपडे नव्हे, तर तुमचे विचार आहेत. 
असे नराधम परग्रहावरील नाहीत, तर हे आपल्यापैकीच असतात. त्यांना सांगू इच्छितो की, जेव्हा भारतीय मुलगी उलट फिरून उत्तर देईल तेव्हा तुमचं डोकं ठिकाणावर येईल. एवढेच नाही तुम्ही हादरून जाल हे लक्षात ठेवा."

मुलींनो स्वसंरक्षण शिका...
माझं मुलींना आवाहन आहे की, अशा नराधमांना धडा शिकवणे फार अवघड नाही. मार्शल आर्टच्या सोप्या तंत्रांनी तुम्ही यांना सहज परतवू शकता. कोणाच्या बापालाही घाबरण्याची गरज नाही. यापुढे तुम्हाला कोणी तुमच्या कपड्यांवरून सल्ला देत असेल तर त्याला सांगा तुमचे ज्ञान तुमच्याजवळच ठेवा."
 

Web Title: akshay kumar refutes abu azami