ऑन स्क्रीन : ‘मेअर ऑफ ईस्टटाऊन’ : छोट्या शहरातील गुन्ह्याचे पडसाद

‘मेअर ऑफ ईस्टटाऊन’ ही मालिका पेन्सिल्विनियामधील एका लहान शहरात घडते. मेअर शीहन (केट विन्स्लेट) हे शीर्षकपात्र इथल्या कथेच्या केंद्रस्थानी आहे.
mare of easttown movie
mare of easttown moviesakal
Summary

‘मेअर ऑफ ईस्टटाऊन’ ही मालिका पेन्सिल्विनियामधील एका लहान शहरात घडते. मेअर शीहन (केट विन्स्लेट) हे शीर्षकपात्र इथल्या कथेच्या केंद्रस्थानी आहे.

छोट्या शहरांमध्ये गोष्टी ज्या पद्धतीने पार पडतात, त्याचे एक अंतर्गत तर्कशास्त्र असते. जवळपास प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांना ओळखत असते. अशा स्थितीत कुणाचेही प्रश्न हे केवळ वैयक्तिक राहत नाहीत, तर त्यांना सामाजिक स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे अशा शहरांमध्ये पोलिस म्हणून काम करणे अधिकच अवघड बनते. साहजिकच पात्रांना अंतर्गत व बाह्य अशा दुहेरी द्वंद्वात टाकणे चित्रपटकर्त्यांना प्रचंड आवडते. त्यातूनच एकविसाव्या शतकात छोट्या शहरांमधील गुन्हेउकलीवर आधारलेल्या बऱ्याचशा कलाकृती पाहायला मिळाल्या आहेत. अशा प्रकारचे कथानक असलेल्या ‘ट्विन पीक्स’, ‘ट्रू डिटेक्टिव्ह्ज’, ‘द आऊटसायडर’, ‘शार्प ऑब्जेक्ट्स’ या अमेरिकन मालिका किंवा ‘ब्रॉडचर्च’ आणि ‘टॉप ऑफ द लेक’ या ब्रिटिश मालिका प्रसिद्ध आहेत. ब्रॅड इंगलस्बायने लिहिलेली व निर्माण केलेली ‘मेअर ऑफ ईस्टटाऊन’ ही मालिका या यादीत स्थान मिळवणारी नवीन मालिका आहे.

‘मेअर ऑफ ईस्टटाऊन’ ही मालिका पेन्सिल्विनियामधील एका लहान शहरात घडते. मेअर शीहन (केट विन्स्लेट) हे शीर्षकपात्र इथल्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. ती राहते त्या शहरात पौगंडावस्थेतील एका मुलीचा खून झालेला आहे आणि गुन्हेगाराचा शोध घेण्याची जबाबदारी मेअरवर आहे. मात्र, हे आव्हान दिसते तितके सोपे नाही. मेअर शहरातील बहुतांशी सर्व लोकांना व्यक्तिशः ओळखते. त्यातील अनेकांशी तिचे वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक संबंध आहेत. ज्यामुळे तपास करण्यात अनेक नैतिक द्वंद्व आणि प्रत्यक्ष अडचणी निर्माण होतात. याखेरीज मेअरच्या व्यक्तिगत आयुष्यातील समस्या, तिचे कौटुंबिक जीवन व मानसिक स्थितीत होत असलेली उलथापालथ यामुळे तिचे काम अधिकच अवघड बनते. मालिकेच्या निर्माणकर्त्यांनी तिच्या व्यावसायिक जीवनावर होणारे परिणाम फारच प्रभावी पणे उभे केले आहेत.

मेअरचे शहरातील प्रत्येकाशी असणारे संबंध अधिक ठळक होतात ते डिटेक्टिव्ह कॉलिन झेबल (एव्हान पीटर्स) या तिऱ्हाईत अधिकाऱ्याच्या येण्याने. ज्यानंतर ईस्टटाऊनमधील घटनांचे अंतर्गत चलनशास्त्र अधिक स्पष्ट होते. शिवाय, शहरामध्ये मेअरला असलेले महत्त्व आणि तिच्या आंतरिक संघर्षाची तीव्रतादेखील ठळकपणे लक्षात येऊ लागते. क्लिष्ट गुन्हे आणि त्यांच्या पडसादांकडे फक्त काळ्या-पांढऱ्या दुहेरी स्वरूपात पाहता येत नसते. नैतिक स्वरूपाचे प्रश्न, मानवी नातेसंबंधांची क्लिष्टता, घटनांचे काळेकरडे स्वरूप या मालिकेमध्ये पाहायला मिळते. ‘मेअर ऑफ ईस्टटाऊन’ ही जितकी गुन्हेउकलीबाबत आहे, तितकीच मानसशास्त्र, कुणालातरी गमावल्यानंतर आयुष्याला कवटाळणारी दुःखाची भावना, दुःखाचे तीव्र स्वरूप अशा अनेकविध संकल्पनांबाबत आहे.

मालिकेतील शीर्षक भूमिका साकारणाऱ्या केट विन्स्लेटचे अभिनयातील सामर्थ्य सिद्ध करण्याचे काम ‘मेअर ऑफ ईस्टटाऊन’ने केले आहे. उतारवयातील मेअरची शारीरिक व मानसिक अवस्था, तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मनावरील आघात आणि अस्वस्थता असे सारेच विन्स्लेटने फारच उत्कृष्टरीत्या समोर उभे केले आहे. त्यामुळे मालिका त्यातील गुन्हेउकल आणि रहस्याकरिता जशी पहावी, तशीच विन्स्लेटच्या भूमिकेकरिता पाहावीशी ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com