ऑन स्क्रीन : ‘द जज’ : बाप-लेकाच्या नात्याची गुंतागुंत

‘द जज’ (२०१४) हा चित्रपट एका न्यायाधीशाविषयी, एका खटल्याविषयी जरूर आहे. मात्र त्यासोबतच एक अमेरिकन कुटुंब आणि त्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांविषयी आहे.
The Judge Movie
The Judge MovieSakal
Summary

‘द जज’ (२०१४) हा चित्रपट एका न्यायाधीशाविषयी, एका खटल्याविषयी जरूर आहे. मात्र त्यासोबतच एक अमेरिकन कुटुंब आणि त्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांविषयी आहे.

‘द जज’ (२०१४) हा चित्रपट एका न्यायाधीशाविषयी, एका खटल्याविषयी जरूर आहे. मात्र त्यासोबतच एक अमेरिकन कुटुंब आणि त्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांविषयी आहे. विशेषतः चित्रपटातील मध्यवर्ती पात्रांपैकी एका वडील आणि मुलाच्या जोडीविषयी आहे. चित्रपटामधील बापलेकाची जोडी फारच इंटरेस्टिंग आहे. जोसेफ पामर (रॉबर्ट डुवाल) हा अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका छोट्याशा शहरातील न्यायाधीश आहे. तो समोर येतो तो एक कठोर, मात्र संवेदनशील, नर्मविनोदी न्यायाधीश म्हणून. त्याचा मुलगा, अमेरिकेतील मोठ्या शहरात वकील म्हणून कार्यरत असणारा हँक पामर (रॉबर्ट डाऊनी ज्यु.) हा त्याच्या वडिलांच्या अगदी विरुद्ध आहे. त्याची बांधिलकी ही न्यायापेक्षा अधिक पैशाशी आहे. सहाजिकच या दोघांमध्ये तात्त्विक मतभेद आहेत. मात्र, त्याला कौटुंबिक कलहाची, दोघांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या चुकांची जोड आहे.

जोसेफच्या पत्नीचा, हँकच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वर्षांनी घरी परतलेल्या हँकला त्याची इच्छा नसताना त्याचे बालपण गेलेल्या गावी राहावे लागते. यामागील कारण म्हणजे खुद्द न्यायाधीश जोसेफवर ठेवला गेलेला एका व्यक्तीचा खुनाचा ठपका. त्यानंतर चित्रपटात चालणाऱ्या खटल्यात अमेरिकेतील न्यायव्यवस्थेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या दोन व्यक्तींना एकत्रित काम करावे लागते. या दोघांच्या नात्यातील तणाव या खटल्याच्या क्लिष्टतेत अधिक भर घालत असतो.

वरवर पाहता भिन्न भासणाऱ्या या दोघा बापलेकामध्ये काही समानता आहेत. स्वतःचेच म्हणणे खरे ठरवण्याचा अट्टहास असेल किंवा कुणाची मदत न घेण्याचा स्वाभिमानी स्वभाव असेल, या बाबी त्यांनी एकमेकांच्या भावना समजून घेण्यातील मोठा अडथळा ठरत असतात. न्यायाधीश जोसेफवरील खटला आणि त्याचे वय व आजारपण त्या दोघांना एकत्र आणणारे, स्वतःच्या भूतकाळाचा, स्वतःच्या आयुष्याचा आणि भावनांचा पुनर्विचार करायला भाग पाडणारे मुद्दे ठरतात.

डेव्हिड डॉबकिन दिग्दर्शित ‘द जज’ हा प्रेक्षकाला नखे कुडतरायला भाग पाडणाऱ्या थरारक खटल्याचे चित्रण करणारा चित्रपट नाही. हा अमेरिकन न्यायव्यवस्थेभोवती फिरणारा सर्वोत्कृष्ट चित्रपटही नाही. त्याच्या निर्मात्यांना असे काही बिरुद मिरवण्यात रस असेल, असे वाटत नाही. कारण, हा चित्रपट मानवी नातेसंबंध आणि अमेरिकन कुटुंबव्यवस्थेविषयी अधिक आहे. रॉबर्ट डाऊनी ज्यु. आणि रॉबर्ट डुवाल हे दोघे या चित्रपटाला सर्वार्थाने प्रभावी बनविणारी कामगिरी करतात.

दिग्दर्शक डॉबकिन आणि सहकारी या चित्रपटाला ज्या वातावरणात घडवून आणतात, त्याला इथे फारच महत्त्व आहे. मध्यवर्ती व्यक्तिरेखांच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे सबंध चित्रपटात अस्तित्वात असणारे कारुण्यपूर्ण भावनेचे अस्तित्व तसेच छोट्या शहरातील सामजिकव्यवस्था या दोन बाबी अनेक घटनांना चालना देतात. छोट्या शहरात सर्वांचा एकमेकाशी असलेला परिचय पोलिस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवर कसा प्रभाव टाकतो, ही बऱ्याच अमेरिकन चित्रपटांमध्ये दिसणारी संकल्पना इथे समर्थपणे दिसते. ‘थ्री बिलबोर्ड्स इन एबिंग, मिझुरी’ (२०१८) हे अशा प्रकारच्या चित्रपटाचे आणखी एक उदाहरण देता येईल. भूतकाळातील भूतांच्या रूपात चित्रपटातील पात्रांच्या आनंदात ठरणारे अडथळे दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतात. रॉबर्ट डाऊनी ज्यु. आणि रॉबर्ट डुवाल यांच्या व्यक्तिरेखा या अडथळ्यांना कसे सामोरे जातात, त्यासाठी हा चित्रपट पहावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com