ऑन स्क्रीन : ‘द वॉकिंग डेड’ : रोमेरोच्या झॉम्बीपटांची वारसदार

काळाच्या ओघात भयपट आणि झॉम्बीपटांमधील सामजिक-राजकीय आशय अपवाद वगळता जवळपास लुप्त झाला असला, तरी अशा चित्रपटांमधील अनेक घटकांचे प्रयोजन हे गंभीर संकल्पनांना अनुसरून होते.
the walking dead movie
the walking dead moviesakal
Summary

काळाच्या ओघात भयपट आणि झॉम्बीपटांमधील सामजिक-राजकीय आशय अपवाद वगळता जवळपास लुप्त झाला असला, तरी अशा चित्रपटांमधील अनेक घटकांचे प्रयोजन हे गंभीर संकल्पनांना अनुसरून होते.

झॉम्बीपट म्हटल्यावर तुम्हाला सर्वप्रथम काय आठवते? जगाचा अंत, हिंसा आणि रक्तपात, उपहास आणि विनोदी प्रसंग की आणखी काही? मुख्य म्हणजे झॉम्बीपटांमधील सामाजिक-राजकीय आशय आणि संकल्पनांचा विचार तुमच्या मनात येतो का?

काळाच्या ओघात भयपट आणि झॉम्बीपटांमधील सामजिक-राजकीय आशय अपवाद वगळता जवळपास लुप्त झाला असला, तरी अशा चित्रपटांमधील अनेक घटकांचे प्रयोजन हे गंभीर संकल्पनांना अनुसरून होते. झॉम्बीपटांना आज जे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्याचे श्रेय जॉर्ज आर. रोमेरो या चित्रपट दिग्दर्शकाला दिले जाते. त्याच्या चित्रपटांमध्ये वर्णद्वेष, वर्गसंघर्ष, सामजिक-नैतिक प्रश्नांना अनन्यसाधारण महत्त्व होते. त्याला उपहासाची जोड असे. त्याच्या अनेक झॉम्बीपटांपैकी एक ‘डॉन ऑफ द डेड’ (१९७८) तर एका मॉलमध्ये घडतो, ज्यातून रोमेरो मॉलसंस्कृती आणि उपभोगवादाच्या अक्राळविक्राळ स्वरूपावर उपरोधिक टीका करतो. रोमेरोच्या चित्रपटांच्या लोकप्रियतेनंतर चार दशकांनी आलेली ‘द वॉकिंग डेड’ ही मालिका रोमेरोचा हाच वारसा पुढे घेऊन जाणारी आहे.

ही मालिका रॉबर्ट कर्कमनच्या ‘द वॉकिंग डेड’ याच नावाच्या कॉमिक बुक मालिकेवर आधारित आहे. मालिकेची सुरुवात होते तेव्हा रिक ग्राइम्स (अँड्र्यू लिंकन) हा पूर्वाश्रमीचा पोलिस अधिकारी नुकताच कोमातून उठतो. रिकला जाग येते तेव्हा झॉम्बींचा उद्रेक होऊन बराच काळ उलटून गेलेला असतो. रिकचा सहकारी व मित्र शेन (जॉन बर्नथॉल) हा रिकची बायको आणि मुलाला घेऊन दूरवर पोहोचलेला असतो. सुरुवातीला आपल्या बायको व मुलाचा शोध घेण्याचे आव्हान रिकपुढे असते. पोलिस अधिकारी असल्याने जिवंत राहण्यासाठी गरजेची कौशल्ये त्याच्याकडे असतात. या कौशल्यांचा वापर करीत आपल्या बायको-मुलापर्यंत पोचणे, अराजक माजलेल्या या नव्या युगातील नवे नियम समजून घेणे, अनेक लोकांशी भेटणे आणि आपल्या नेतृत्वगुणाच्या बळावर त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणे, इत्यादी गोष्टी रिकला कराव्या लागतात. मालिकेचे जवळपास डझनभर सीझन्स असल्याने मालिकेत अनेक पात्रं, अनेक जागा आणि निरनिराळी खलपात्रं पाहायला मिळतात.

मालिकेचे निर्माणकर्ते आणि त्यांचे सहकारी कलाकार-तंत्रज्ञ अनेक महत्त्वाच्या संकल्पना हाताळतात. जगाच्या विनाशाची सुरुवात ही लोकांच्या चांगल्या-वाईटाच्या संकल्पनांमध्ये अगणित बदल घडवणारी असते. मानवी स्वभावाची काळीकरडी बाजू, नैतिकतेच्या बदलत्या संकल्पना, जिवंत राहण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि त्यासाठी वाटेल ते करण्याची स्वार्थी प्रवृत्ती, इत्यादी संकल्पना या मालिकेत दिसतात. त्यानिमित्ताने मालिकेचे निर्माते अनेक सामाजिक, राजकीय, नैतिक तसेच तात्त्विक समस्यांचा ऊहापोह करतात. ज्यावर विश्वास टाकला त्या व्यक्तीनेच दगा देणे किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीलाच मारून टाकावे लागण्याची परिस्थिती उद्भवल्यानंतर पात्रांच्या मनात निर्माण होणारे नैतिक द्वंद्व यासारख्या घटना तर वारंवार पाहायला मिळतात.

वेगवेगळे वर्ण व वर्ग असलेली पात्रं, त्यांचे जगाकडे बघण्याचे निरनिराळे दृष्टिकोन, जगाकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, जगाचा सर्वनाश होत असताना मनात निर्माण होणारा निराशावादी दृष्टिकोन आणि आत्महत्या किंवा आप्तस्वकीयांची हत्या करण्याचे विचार, इत्यादी बाबी रोमेरोच्या चित्रपटांशी थेट नाते सांगणाऱ्या आहेत. आणि रोमेरोचा वारसा चालवणारी ही मालिका तब्बल बारा वर्षे आणि अकरा सीझन्सनंतर या वर्षी पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे झॉम्बीपटांचा सर्वोच्च बिंदू असणारी ही मालिका पाहण्यासाठी याहून दुसरी योग्य वेळ नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com