ऑन स्क्रीन : वर्ल्ड्स अपार्ट : गोड ग्रीक प्रेमपट

‘वर्ल्ड्स अपार्ट’चे (२०१५) नाव सुचवते त्याप्रमाणे हा चित्रपट दोन वेगवेगळ्या जगातील लोकांविषयी आहे.
worlds apart
worlds apartsakal
Summary

‘वर्ल्ड्स अपार्ट’चे (२०१५) नाव सुचवते त्याप्रमाणे हा चित्रपट दोन वेगवेगळ्या जगातील लोकांविषयी आहे.

‘वर्ल्ड्स अपार्ट’चे (२०१५) नाव सुचवते त्याप्रमाणे हा चित्रपट दोन वेगवेगळ्या जगातील लोकांविषयी आहे. हे लोक एकाच देशात, एकाच शहरात राहत असले, तरी त्यांच्यात खूप मोठी दरी आहे. ही दरी वर्ग, वर्ण, भाषा, जडणघडण आणि आचारविचार अशा अनेक प्रकारची आहे. एकमेकांप्रती वाटणारी प्रेम नि आपुलकीची भावना या लोकांना जवळ आणण्याचे काम करते आणि हे एकत्र येणे घडून येते ते ग्रीस या देशाच्या पार्श्वभूमीवर.

क्रिस्टोफर पापाकालियतिस दिग्दर्शित ‘वर्ल्ड््स अपार्ट’ची सुरुवात होते, तेव्हा ग्रीस हा अनेक समस्यांनी ग्रासलेला दिसतो. मध्य युरोपियन देशांतील वाढत्या तणावामुळे ग्रीस हा तणावग्रस्त राष्ट्रांमधील नागरिकांना दिलासा देणारा देश बनलेला आहे. ग्रीसमध्ये आधीच आर्थिक व सामाजिक विषमता वाढलेली असताना युरोपियन देशांतील हा तणाव ग्रीसवर अनेक विपरीत परिणाम करणारा ठरतो. अवतीभवती ही सारी उलथापालथ होत असताना काही लोक मात्र एकमेकांच्या प्रेमात पडू लागले आहेत. तीन वेगवेगळ्या कथा एकमेकांत गुंतलेल्या तीन प्रकरणांमधून समोर येतात. हायपरलिंक सिनेमा नावाचा हा सिनेप्रकार आहे, ज्यात वरवर पाहता वेगवेगळ्या पार्श्वभूमीची पात्रे नियतीच्या चक्रात अडकतात आणि त्यांचा एकमेकांशी संबंध आल्याने त्यातून एकसंध कथानकाची निर्मिती होते.

ग्रीसमध्ये राजकारणाचा अभ्यास करणारी दाफ्नी एका सिरीयन स्थलांतरिताच्या प्रेमात पडते. देशात उजव्या विचारसरणीच्या हिंसक लोकांचा उपद्‌व्याप वाढत असताना या दोघांची प्रेमकथा उलगडते. उजव्यांच्या हिंसक कारवाया उत्तरोत्तर अधिक तीव्र होत असताना या दोघांचे आयुष्य अधिक गुंतागुंतीचे बनत जाते. वांशिक द्वेष, सामाजिक विषमता आणि त्याला लागून येणारी हिंसा अशा गंभीर संकल्पना इथे येतात. दुसरीकडे, ग्रीसमधील एका कंपनीत काम करणारा योर्गोस त्याच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यासाठी आलेल्या एका स्वीडिश महिलेच्या प्रेमात पडतो. देशातील आर्थिक संकटाचे सूक्ष्म स्तरावर होणारे परिणाम आणि नागरिकांच्या प्रत्यक्ष जीवनावरील पडसाद यात दिसतात. तिसरीकडे, ग्रीसवरील प्रेमापोटी जर्मनीमधून ग्रीसमध्ये रहायला आलेला उतारवयातील एक इतिहासअभ्यासक एका ग्रीक गृहिणीच्या प्रेमात पडला आहे.

चित्रपटातील तिन्ही जोडप्यांची पार्श्वभूमी चित्रपटकर्त्या पापाकालियतिसचा उद्देश सुस्पष्ट करते. त्याचा ‘व्हॉट इफ?’ (२०१२) हा चित्रपटदेखील ग्रीसमधील संकटादरम्यान घडतो. या अभिनेत्या-दिग्दर्शकाला त्याच्या मूळभूमीची कथा मांडण्यात रस आहे. जगाच्या इतिहासात ग्रीसला महत्त्वाचे स्थान असले, जगातील अनेक पुराणकथा, रूपककथा ग्रीसची देण असल्या तरी गेल्या काही वर्षांमध्ये ग्रीसची स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे गौरवशाली इतिहासावर उभा असलेला हा देश वर्तमानात सातत्याने चाचपडत असल्याचे दिसते. अशावेळी त्या देशातील एका सजग चित्रपटकर्त्याला त्याच्या देशाचा दृष्टिकोन समोर मांडत काय सांगायचे आहे, याला महत्त्व प्राप्त होते.

मानवी जीवनाच्या यांत्रिकीकरणाकडे बोट दाखवताना ‘मेट्रोपोलिस’ (१९२७) या जर्मन सिनेमातील दृश्याचा केलेला वापर असेल किंवा चित्रपटात वेळोवेळी चर्चिले जाणारे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, नैतिक मुद्दे असतील, त्यातून पापाकालियतिसचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिवाय, वरवर केवळ एक प्रेमकथा वाटणाऱ्या चित्रपटातूनही राजकीय मुद्दे कशा पद्धतीने सादर करता येऊ शकतात, याचे एक चांगले उदाहरण पाहायला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com