जेव्हा रेखा यांच्यामुळे जया बच्चन यांनी राज्यसभेत जागा बदलली!

टीम ईसकाळ
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

रेखा आणि जया बच्चन एकाचवेळी राज्यसभा सदस्य होत्या. त्यावेळचा हा किस्सा आहे.

नवी दिल्ली : महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील कथित प्रेम संबंधांची चर्चा गेली पाच दशके सुरूच आहे. अर्थातच ती यापुढेही सुरूच राहिल. त्यांच्यातील संबंधांचे पडसाद अनेकदा बॉलिवूडच्या कार्यक्रमांमध्येही पहायला मिळाले आहेत. पण, राज्यसभेतही त्याचे पडसाद उमटले होते. रेखा आणि जया बच्चन एकाचवेळी राज्यसभा सदस्य होत्या. त्यावेळचा हा किस्सा आहे. आज, महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची पुन्हा चर्चा होत आहे. अर्थातच जय बच्चन आणि रेखा त्याला अपवाद नाहीत. 

रेखा-अमिताभ कधी सुरू झाला ‘सिलसिला’?

काय घडले राज्यसभेत?
जया बच्चन राज्यसभा सदस्य असतानाच, रेखा यांची राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती झाली होती. 15 मे 2012 रोजी रेखा यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती.  त्यावेळी जया बच्चन सभागृहात उपस्थित होत्या. रेखा शपथ घेत असताना राज्यसभा टेलिव्हिजनचे कॅमेरे जया यांच्यावर होते. हे जया बच्चन यांच्याही लक्षात आले. त्यामुळे त्यांना क्षणभर अवघडल्यासारखे झाले होते. त्यावर त्यांनी नंतर नाराजीही व्यक्त केली होती. रेखा यांनी शपथ घेतल्यानंतर तात्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तात्कालीन विरोधीपक्ष नेते अरुण जेटली यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्या पुन्हा आपल्या सीट क्रमांक 99वर जाऊन बसल्या.

Happy Birthday Amitabh Bachchan : ही आहेत 'बिग बीं'ची 'Top 10' गाणी!

Image result for rekha jaya amitabh

आणि जया बच्चन यांची जागा बदलली
रेखा राज्यसभा सदस्य होण्यापूर्वी जया बच्चन समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्य होत्या. त्यांना 91 क्रमांकाची सीट देण्यात आलेली होती. तर, रेखा यांना 99 क्रमांकाची सीट देण्यात आली. पण, जया बच्चन यांनी आग्रह करून सीट बदलून घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. जया यांना 91 वरून 143 नंबरवर शिफ्ट करण्यात आली. रेखा यांच्यापासून लांब राहण्यासाठीच जया बच्चन यांनी सीट बदलून घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. विशेष म्हणजे, एका क्षेत्रात असूनही रेखा यांनी शपथ घेतल्यानंतर जया बच्चन यांनी सभागृहात त्यांचे अभिनंदन केले नाही, याकडंही त्यावेळी मीडियानं लक्ष वेधलं होतं. मुळात जया बच्चन आणि रेखा या सार्वजनिक ठिकाणी मोजक्याच कार्यक्रमात एकत्र दिसल्या आहेत. त्यावेळी त्यांनी एकमेकिंना योग्य सन्मान देत, मीडियाला चर्चेची कोणतिही संधी दिलेली नाही. 

सचिवालयाचा खुलासा
दरम्यान, जया बच्चन यांच्या राज्यसभेतील जागा बदलण्याच्या विनंतीची खूप चर्चा झाली. त्यानंतर राज्यसभा सचिवालयाने स्वतःहून त्याबाबत खुलासा केला आहे. जया बच्चन यांनी रेखा यांच्या शपथविधी वेळी कॅमेरे आपल्यावर रोखल्याविषयी तक्रार केल्याची चर्चा होती. पण, सचिवालयाने जया यांनी अशी कोणतिही तक्रार केली नसल्याचे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh rekha jaya bachchan changes her seat in rajya sabha