अस्खलित उर्दू उच्चारणासाठी यांनी अमृता खानविलकरची थोपटली पाठ!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

भूमिकेचा संपूर्ण अभ्यास आणि त्यातल्या बारकाव्यांसह मी सेटवर पोहोचल्याचे पाहून पहिल्याच दिवशी मेघनामॅमनी माझ्या तयारीचं कौतुक केलं. - अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या सिनेमात दिसणार आहे. ‘राजी’ चित्रपटात पाकिस्तानी शाही कुटूंबातल्या मुनिरा या गृहिणीच्या भूमिकेत अमृता दिसणार आहे.

पाकिस्तानी गृहिणीची भूमिका असल्याने अर्थातच अमृताला या सिनेमात उर्दूमध्ये संवाद होते. आपल्या ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमातही अमृताने उर्दू भाषेत संवाद म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आता ‘राजी’मध्ये मुस्लिम भूमिकेत ती दिसणार आहे. ‘कट्यार..’ नंतर हा सिनेमा करताना पुन्हा एकदा अमृताने उर्दूच्या शिकवण्या घेतल्या.

Amruta Khanvilakar

अमृता याविषयी म्हणते, “कट्यारपेक्षाही 'राजी' सिनेमात जास्त कठीण उर्दू होतं. त्यात मी मशहूर गीतकार-शायर गुलजार यांच्या कन्येसमोर उर्दू बोलणार असल्याने, मी सेटवर जाताना तयारीतच गेले. भूमिकेचा संपूर्ण अभ्यास आणि त्यातल्या बारकाव्यांसह मी सेटवर पोहोचल्याचे पाहून पहिल्याच दिवशी मेघनामॅमनी माझ्या तयारीचं कौतुक केले.”

ती पुढे म्हणते, “मी ऑडिशनला गेले तेव्हा माझ्या उर्दू उच्चारणांकडे पाहून त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळेच तर ऑडिशन झाल्या-झाल्या मला धर्मा प्रॉडक्शनने साइन केले. सिनेमाचे शुटिंग सुरू झाल्यावर काही सीन्समध्ये अवघड उर्दू संवादही मी अस्खलित बोलल्याने मेघनामॅमने माझी पाठ थोपटली. आणि याचा अर्थातच मला अभिमान वाटतो.”

Amruta Khanvilkar

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Amrita Khanvilkar Speaks Fluent Urdu In Raazi Movie