Amruta khanvilkar: अमृता खानविलकर पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत, साकारतेय.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amruta khanvilkar play sonabai deshpande historical  role in har har mahadev movie

Amruta khanvilkar: अमृता खानविलकर पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत, साकारतेय..

har har mahadev movie: महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला 'हर हर महादेव' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील दमदार गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व रसिकप्रेक्षकांची या गाण्यांना उत्तम दाद मिळत आहे. शिवाय या चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित झाला असून त्यातील राज ठाकरे यांचा आवाज आणि संवाद प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी म्हणजे, अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात अत्यंत महत्वाची अशी ऐतिहासिक भूमिका साकारत आहे.

(amruta khanvilkar play sonabai deshpande historical role in har har mahadev movie)

याआधी कधीच न झालेला असा प्रयोग 'हर हर महादेव' या चित्रपटाद्वारे करण्यात आला असून हा सिनेमा फक्त मराठीतच नाही तर पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अत्यंत तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे.

झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर वीर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर आहे. एवढी दमदार कास्ट समोर आल्यानंतर इतर कलाकारांबद्दल ही जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. अशातच आज एक पोस्टर अमृतासह चित्रपटाच्या सर्व टीमने शेअर केले. ज्यामध्ये अमृता खानविलकर अत्यंत महत्वाच्या भूमिकेत असल्याचे दिसले.

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांचा मोलाचा वाटा आहे. याच सोनाबाईंची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. सोनाबाईंच्या निमित्तानं अमृता पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. नाकात नथ, कपाळावर कुंकू, नऊवार साडीतील अमृताचा पहिला लुक समोर आला आहे. अमृताने तिच्या भूमिकेचे पोस्टर शेअर करत एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे.

'योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत घराचा डोलारा सांभाळणारी स्त्रीदेखील योद्धाच असते. गनिमांना कंठस्नान घालणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांची भूमिका साकारत आहे अभिनेत्री अमृता खानविलकर. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार..' असे अमृताने पोस्ट मध्ये म्हंटले आहे.