'राझी' सिनेमानंतर आता अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

अमृताच्या नव्या वेबसीरिजविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही, सूत्रांच्या अनुसार, अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमृता यात दिसणार असल्याचं समजतंय.

धर्मा प्रॉडक्शन्सच्या राझी सिनेमात पाकिस्तानी गृहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने या भूमिकेतून ब़ॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमृताच्या या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. राझी चित्रपटातून अमृताने दाखवून दिलं, की ती दिसायला सुंदर आहेच पण एक चांगली अभिनेत्रीही आहे. राझीच्या मुनिरा भूमिकेमूळे अमृताला बॉलिवूडची कवाडं खुली झाली.

राझीच्या शालीन आणि घरंदाज गृहिणीनंतर आता अमृता आपल्या चाहत्यांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या अनुसार, अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.

अमृताचा लवकरच डिजीटल दुनियेत डेब्यू होतो आहे. तिच्या नव्या वेबसीरिजमध्ये असलेली ही तिची भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे.

सूत्रांच्या अनुसार, अमृता सध्या आपल्या करीयरच्या शिखरावर आहे. ह्या शिखरावर गेल्यावर अर्थातच कलाकारांना अष्टपैलू भूमिका करण्याची इच्छा असते. अमृता नुकतीच एका घरंदाज गृहिणीच्या भूमिकेत राझीमध्ये दिसली होती. त्यानंतर ती आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत दिसेल.

लवकरच सुरू होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये अमृता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमृताच्या या भूमिकेच्या आसपासच कथानक विणलं गेलं आहे.

याविषयी अमृता सांगते, “मला करीयरच्या या वळणावर विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. रूढीबध्द भूमिका न करता काहीतरी वेगळं करण्याची आणि त्यासाठी कोणत्याही कसोटीवरही माझी उतरण्याची तयारी आहे. माझी ही नवी भूमिकाही माझी कसोटी पणाला लावणारी आहे.”

ब्लॉकबस्टर राजी चित्रपटातल्या मुनिरा भूमिकेमुळे अमृताचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. याविषयी ती सांगते, "मला अजूनही भरभरून प्रतिक्रिया मिळतायत. या भूमिकेसाठी मी घेतलेली मेहनत कामी आल्याचा आनंद वाटतोय. माझे चाहते, फिल्मइंडस्ट्रीतली मित्र-मंडळी यांच्याकडून पाठ थोपटली जातेय, त्यामुळे आता अजून जबाबदारीने काम करायची जाणीवही मला होतेय.“

आपल्या भूमिकेविषयी अमृता म्हणते, “या भूमिकेत मी तुम्हांला ग्रे-शेड्समध्ये दिसेन. ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. जिचं आयुष्य आणि त्यातले निर्णय खूप बोल्ड आहेत. मला आनंद आहे, की राजीनंतर आता मला अशा भूमिका ऑफर होउ लागल्यात. आज सिनेक्षेत्रात अशा कथांची आणि अशा भूमिकांची खूप गरज असल्याचं मला वाटतं.”
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Amruta Khanvilkar will appear in Hindi Webcireries after Raazi