अनुपम खेर यांची "एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी नियुक्ती 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी (ता. 11) ही घोषणा केली. गजेंद्र चौहान यांची या पदावरील नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. 

अनुपम खेर यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून "कर्मा', "चायना गेट', "दिलवाले दुल्हनियॉं ले जाएंगे', "कुछ कुछ होता है' हे त्यांचे गाजलेले चित्रपट. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. खेर यांनी याआधी सेन्सॉर बोर्ड आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्षपदही भूषवले होते. नियुक्तीबद्दल त्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यामुळे खूप अभिमान वाटतोय. माझ्यापरीने कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असे ट्विट त्यांनी केले. 

यापूर्वी एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान होते. मात्र, सुरुवातीपासूनच ते वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या नियुक्तीला विरोध करत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. तरीही चौहान पदावर कायम होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्यावर मुदतवाढ नाकारण्यात आली. चौहान यांनी अनुपम खेर यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, अनुपम खेर चांगले काम करतील, अशी अपेक्षा आहे. 

Web Title: Anupam Kher FTII