
Satish Kaushik: 'प्रवासात रात्री उशिरा...', अनुपम खेरनी सांगितला कौशिक यांचा शेवटचा क्षण
Satish Kaushik Death: प्रसिद्ध दिग्दर्शक सतिश कौशिक यांच्या निधनाची बातमी अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर ९ मार्च रोजी सकाळी दिली. सतिश कौशिक यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. अनुपम खेर यांनी सांगितले की सतिश कौशिक दिल्लीतील आपल्या एका मित्राच्या घरी गेले होते,आणि तिथेच त्यांची तब्येत बिघडली.
सतिश कौशिक यांच्या निधनापूर्वी नेमकं काय आणि कसं घडलं याविषयीची माहिती अनुपम खेर यांनी दिली आहे. माहितीनुसार,सतिश कौशिक यांच्यावर आज दुपारी ३ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
सतिश कौशिक यांच्या निधनानं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करणाऱ्या पोस्टही केल्या आहेत.
अनुपम खेर आणि सतिश कौशिक यांची मैत्री ४५ वर्ष जुनी आहे. सतिश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांच्यासाठी त्यांचे निधन म्हणजे मोठा धक्का आहे.
मध्यरात्री उशिरा सतिश कौशिक यांच्यासोबत काय घडलं याविषयी अनुपम यांनी आता खुलासा केला आहे.
पीटीआय ला माहिती देताना अनुपम म्हणाले की, ''सतिश दिल्लीतील त्याच्या एका मित्राच्या घरी गेले होते. मित्राकडून गाडीत बसून निघताना त्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागलं. त्यांनी ड्रायव्हरला गाडी हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितली. हॉस्पिटलच्या वाटेवर असतानाच रात्री उशिरा जवळपास १ च्या दरम्यान सतिश कौशिक यांना हार्टअटॅक आला''.
हेही वाचा: डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...
ANI च्या रिपोर्टनुसार सतिश यांचे पोस्टमार्टम गुरुवारी ९ मार्च रोजी दिल्लीतील दीन दयाल हॉस्पिटलमध्ये झाले. रिपोर्टनुसार कळत आहे की, त्यांचे पार्थिव सकाळी साधारण साडे पाचच्या सुमारास पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. आणि ११ च्या सुमारास पोस्टमार्टम केलं गेलं.
त्यानंतर सतिश कौशिक यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाणार असून साधारण ३ च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
सतिश कौशिक यांच्या निधनाची बातमी कळताच इंडस्ट्रीतील अनेकांनी पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नवाझुद्दिन सिद्दीकीनं ट्वीट केलं आहे की,''अचूक कॉमेडी टायमिंग असलेला एक शानदार अभिनेता,दिग्दर्शक आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे वरिष्ठ. खूप लवकर सोडून गेलात सतिशजी''.
तर कंगान रनौतनं लिहिलं आहे, ''आजची सकाळ खूप दुःखद घटना ऐकून सुरू झाली. माझे सगळ्यात खास, खूप यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक सतिश कौशिक हे वैयक्तिक आयुष्यातही खूप प्रेमळ आणि खरे होते. 'इमरजन्सी' मध्ये त्यांना दिग्दर्शित करताना खूप छान अनुभव राहिला. त्यांचे स्मरण कायम राहील. ओम शांति..''