esakal | अनुराग कश्‍यपने ट्‌विटर अकाउंट केले डिलीट
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag-Kashyap

अन्य दुसऱ्या एका ट्‌विटमध्ये कश्‍यप यांनी हे आपले शेवटचे ट्‌विट आहे, असे सांगताना आपल्याला येथे मुक्तपणे बोलण्याची परवानगी नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

अनुराग कश्‍यपने ट्‌विटर अकाउंट केले डिलीट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोशल मीडियावर आपली परखड मते मांडत थेट सरकारवर निशाणा साधणारे चित्रपट निर्माते अनुराग कश्‍यप यांनी आज (रविवार) कौटुंबिक सुरक्षेचे कारण देत स्वत:चे ट्‌विटर अकाउंट डिलीट केले आहे. कश्‍यप यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर संमिश्र पडसाद उमटले. अनेकांनी #AnuragKashyap चा वापर करत आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यास सुरवात केल्याने दिवसभर हा ट्रेंड विशेष चर्चेचा विषय ठरला होता. 

कश्‍यप यांनी ट्‌विटर सोडण्यापूर्वी दोन ट्‌विट करत या निर्णयामागची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली आहे, कश्‍यप यांनी दोन स्क्रिन शॉट्‌स शेअर करताना यामध्ये आपले नातेवाईक आणि मुलींना कशा प्रकार धमकावण्यात आले, हे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

"तुमच्या आई वडिलांना दूरध्वनी येत असतील, तुमच्या मुलीला ऑनलाइन धमकावले जात असेल तर एवढे मात्र नक्की आहे की, तुमच्यासोबत कुणीही बोलू इच्छित नाही. आता येथे कुठलाच तर्क दिला जाऊ शकत नाही. आता ठग हे राज्य करणार असून फसवणूक हाच नव्या जीवनाचा मार्ग असेल. या नव्या भारतामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आशा करतो की, यामध्ये तुम्ही तग धराल,'' असा उपरोधिक टोला अनुरागने लगावला आहे. 

गप्पच राहिलेले बरे 
अन्य दुसऱ्या एका ट्‌विटमध्ये कश्‍यप यांनी हे आपले शेवटचे ट्‌विट आहे, असे सांगताना आपल्याला येथे मुक्तपणे बोलण्याची परवानगी नसल्याची खंत व्यक्त केली आहे. "तुम्हा सर्वांना मी आनंद आणि यश चिंतितो. हे ट्‌विटरवरील माझे शेवटचे ट्‌विट असेल. मला जे काही बोलायचे ते बोलू दिले जात नसेल तर आपण गप्पच राहिलेले बरे. गुड बाय.'' असे त्यांनी म्हटले आहे.

loading image