आमचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखाच!

शब्दांकन : अश्‍विनी सहस्रबुद्धे
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

नेहा जोशी आणि प्रार्थना बेहेरे सांगताहेत त्यांच्या मैत्रीविषयी...
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची - नेहा जोशी आणि प्रार्थना बेहेरे

नेहा जोशी आणि प्रार्थना बेहेरे दोघींनाही आजवर आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहिलं आहे. नेहा आणि प्रार्थना यांनी याआधी एकत्र काम केलं नसलं, तरी आता त्यांच्या आगामी "रेडीमिक्‍स' या चित्रपटाच्या निमित्तानं त्या एकत्र आल्या आणि त्यांच्या केमिस्ट्रीविषयी चर्चा रंगू लागल्या.

neha prarthana

""खरंतर मी "पवित्र रिश्‍ता' ही मालिका करत होते तेव्हापासून नेहाला ओळखते, पण आमच्यात "हाय, हॅलो'पुरतंच संभाषण होतं. मला नेहाचं काम नेहमीच आवडत आलंय. तिच्यासोबत काम करता यावं, असं नेहमीच वाटायचं. हा चित्रपट करायचं ठरल्यावर फोटोशूटला आम्ही भेटलो आणि मग पुढं शूटिंगला. हळूहळू आमच्यात चांगली मैत्री झाली. नेहा आधी मला थोडी रागीट वाटायची. रागीटपेक्षा मुहफट! माझा स्वभाव सगळ्यांशी मजा मस्करी करत काम करण्याचा आहे. त्यामुळे मी काही बोलले आणि तिला आवडलं नाही, तर अशी सुरवातीला मला भीती होती. पण असं काहीच झालं नाही. आम्ही खूप धमाल केली,'' प्रार्थना सांगत होती. यावर नेहा म्हणते, ""आम्ही दोघी आमच्या आगामी चित्रपटात बहिणींची भूमिका करतोय, पण ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसाठी पर्सनली ट्युनिंग चांगलं हवंच, असं नसतं. काम करता करता आमचं ट्युनिंग जमलं. याच कारण म्हणजे, माझी आणि प्रार्थनाची काम करण्याची पद्धत जरी वेगळी असली, तरी आमचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र सारखाच होता. आम्ही दोघीही आमचे दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांना प्रश्न विचारून भंडावून सोडायचो.''

""सेटवर दोन नायिका एकत्र असल्या की त्यांचं पटत नाही, छोट्या छोट्या कारणांमुळे खटके उडतात असं म्हटलं जातं. आम्ही दोघी मात्र एकमेकांना खूप मदत करायचो. नेहाची थिएटरची बॅकग्राऊंड असल्यानं तिला रिहर्सल आहे आणि मी नाटक केलं नसल्यानं कधी रिहर्सल वगैरे करत नाही. मात्र, नेहा आणि मी आमच्या सीन्सची रिहर्सल करायचो. आमच्या ऍक्‍शन-रिऍक्‍शन काय असतील यावर चर्चा करायचो,'' प्रार्थनाचं बोलून होतं न्‌ होतं तोच नेहा म्हणाली, ""प्रार्थना माझ्याबरोबर असण्याचा मला खूप फायदा झाला. कारण या चित्रपटातली माझी व्यक्तिरेखा अतिशय मॉडर्न कपडे घालणारी, फॅशनेबल आहे आणि प्रत्यक्षात मी वेस्टर्न कपडे फारसे वापरत नाही. लुक्‍स वगैरेकडं माझं फारसं लक्ष नसतं. प्रार्थना मला "आउट ऑफ द वे' जाऊन मदत करायची. ती मला सांगायची कपड्यांसाठी हे कलर कॉम्बिनेशन ट्राय कर, हे कॉम्बिनेशन चांगलं नाही दिसणार, या ड्रेसवर ही हेअरस्टाइल चांगली दिसेल, लिप्स्टिकची ही शेड लाव वगैरे.

शूटिंग करताना अनेक गमतीदार किस्सेही घडले. आमचं दोघींचं एकदा नाईट शूट होतं. आमच्या दोघींचेच सीन्स असल्यानं आम्हाला डुलकी काढायलाही वेळ मिळाला नाही. रात्री 2 वाजता आम्हा दोघींनाही इतकी झोप येत होती की काय करतोय ते कळतंच नव्हतं. जालिंदर सरांनी आमच्याकडून कसं काम करून घेतलं त्यांचं त्यांनाच माहिती! या आमच्या चित्रपटाच्या दरम्यान आमच्यात छानसं बॉंडिंग तयार झालंय...''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about friendship of Neha Joshi And Prarthana Behre in Maitrin Sakal Pune Today