"कुकरी शो' आणि मी : गिरीजा ओक

गिरीजा ओक
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

अभिनेत्री गिरीजा ओक सांगत आहे तिच्या कुकरी शोच्या अनुभवाबद्दल...

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सेलिब्रेटी व्ह्यू, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत... 

सेलिब्रेटी व्ह्यू 

मी तब्बल पाच वर्षं एक कुकरी शो होस्ट केला. लग्न व्हायच्या एक महिन्यापूर्वी मला या कार्यक्रमासाठी फोन आला आणि बोलणी झाली. लग्नाच्या जरासं आधी मी या शोचं शूटिंग करू लागले. आई भलतीच खूष होती. त्या आधी तिला धास्ती होती, माझं सासरी काय होईल याची! काय आहे, मला लग्नाआधी कोशिंबीरही करता यायची नाही. माझ्या आईनं बहुतेक "काय हे? मुलीला काही शिकवलं नाही वाटतं!' सदृश गोष्टी ऐकण्याची तयारी केलीच होती. पण मध्येच हा कुकरी शो आला. आता आईला आशेचा किरण दिसू लागला. काही तरी शिकेल पठ्ठी, असं वाटलं तिला. तिला तेव्हा थोडंच माहिती होतं की माझी सासू जगावेगळी आहे ते!

मी पहिल्यांदा अत्यंत सुमार दर्जाचा चहा सासऱ्यांना करून दिल्यावर माझ्या सासूनं माझं कौतुक सांगायला माझ्या आईला तासाभराचा फोन केला होता. तेव्हा आईला वाटलं असेल, "फुकट इतकी काळजी केली. हिची सासू तर चहातच खूष आहे!' पण आता कुकरी शोची कमिटमेंट घेतली होती आणि कमिटमेंटशी माझं काय कनेक्‍शन आहे ते तर तुम्हाला माहिती आहेच. (जर तुम्ही माझे लेख अगदी सुरवातीपासून वाचत असाल, तर माहिती असंलच). 

माझ्या कुकरी शोमध्ये मला बरेच धम्माल अनुभव आले. स्वयंपाकातलं किती शिकले विचारताय? फार कमी! आम्ही दिवसाला 12 रेसिपीज शूट करायचो. म्हणजे 6 एपिसोड. आता इतकं वेगवेगळं साहित्य आणि इतक्‍या कृती बघितल्यावर काय लक्षात राहणार? पण एक मात्र मला कळलं... मला वाटत होतं त्यापेक्षा स्वयंपाकातलं अधिक कळत होतं. मला चक्क पत्र पाठवून स्त्रिया कॉम्प्लिमेंट करायच्या; माझ्या कुकिंगच्या सेन्सबद्दल! काही बेसिक जिन्नसांची माहिती कळली उदा. कॉर्न फ्लोअर. कुठल्याही कुकरी शोच्या टीमचा बेस्ट फ्रेंड. एखादी ग्रेव्ही गरजेपेक्षा पातळ झाली की, कॉर्न फ्लोअर! भजी किंवा तत्सम तळायचे आयटम तेलात फुटू लागले कॉर्नफ्लोअर! या पदार्थाला जरा शाईन आली पाहिजे हॉटेलमधल्या चायनीज ग्रेव्हीला असते तशी! या जगात माझ्या मनासारखं काहीच होत नाहीये कॉर्नफ्लोअर (नाही हं)! तर असं हे बहुआयामी कॉर्नफ्लोअर मला याच शोमध्ये भेटलं. याचबरोबर बिना वांग्याची "वांग्याची भाजी' (कशी?), ब्रेडचा पुलाव (व्हॉट!), फ्रूट सरप्राईज (शॉक असं नाव अधिक सूट झालं असतं), व्हेजिटेबल आ ला मोड (म्हणजे नक्की काय?), कलिंगडाचे लाडू (याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये) असे अनेक नवीन पदार्थ कळले. 

जोक्‍स अपार्ट... वरील उदाहरणं मी तुमच्या मनोरंजनासाठी दिली (मात्र यातलं एकही उदाहरण काल्पनिक नाहीये) तर... आमच्या कार्यक्रमात खूप उत्तम पदार्थ तयार व्हायचे. ते चटकन फस्तही व्हायचे. पण त्या चविष्ट पदार्थांपेक्षाही मला आवडायचा तो हे पदार्थ करणाऱ्या माझ्या पाहुण्या मैत्रिणींचा उत्साह! घरचं सगळं मॅनेज करून, पदार्थांची पूर्वतयारी करून, नवऱ्याला सुटी टाकायला लावून, बॅगा भरून कुठून-कुठून यायच्या आणि छान ठेवणीतल्या साड्या नेसून, हसत मुखानं रेसिपी करून दाखवायच्या. त्यांच्यासाठी स्वयंपाक ही "पटापटा निपटायची, रोजचीच गोष्ट,' नसून त्यांची क्रिएटिव्हिटी एक्‍स्प्रेस करण्याचं साधन असतं. त्यांचं प्रेम, काळजी, माया त्यांनी केलेल्या स्वयंपाकातून व्यक्त होते. "हाताची चव' म्हणजे नक्की काय हेही मला याच कार्यक्रमात कळलं. मला आवडलेला एखादा पदार्थ तंतोतंत घरी केला, तरी शूट करताना जसा लागला होता तसा कधीही नाही लागायचा! स्वयंपाक हे "काम' नसून ती एक "कला' आहे हे मला मनापासून पटलं! 

ता.क. पाच वर्षांचे अनुभव एका लेखात कसे मावणार? पुढच्या लेखात अजून गमती-जमती नक्की वाचा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Girija Oak i Celebrity view column in Maitrin supplement of Sakal Pune Today