esakal | सारं बनावटी झालंय; अशोक पत्कींचे निरीक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Patki

आधी गाणं गाण्यापूर्वी ‘रिहर्सल’ करत असायचे, ती तालीम तंत्रज्ञानात हरवल्याची खंत

सारं बनावटी झालंय; अशोक पत्कींचे निरीक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगीत क्षेत्रात पाच दशकं मुशाफिरी करणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की. एका बाजूला ताल आणि दुसऱ्या बाजूला लय अशी रिद्धी-सिद्धीची संगत लाभलेल्या पत्की यांनी २५ ऑगस्ट रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्तानं ‘कॉफी विथ सकाळ’च्या व्यासपीठावर त्यांनी त्यांच्या संगीतमय प्रवासाच्या कारकिर्दीचा कॅनव्हास रंगवला. पंडित जितेंद्र अभिषेकींचं शिष्यत्व पत्करून पत्कींनी सहवादन, संगीत, नाटक, जाहिरात, चित्रपट आणि गीतकार म्हणून केलेला प्रवास शब्द-सुरांच्या मैफलीत कथन केला... गेल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत काय कमावलं, काय गमावलं याविषयी सांगताना आधी गाणं गाण्यापूर्वी ‘रिहर्सल’ करत असायचे, ती तालीम तंत्रज्ञानात हरवल्याची खंत त्यांनी अधोरेखित केली.

संगीत क्षेत्रात अशोक पत्की यांचा पाच दशकं आदरपूर्वक दरारा आहे. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मात्र त्यांची अत्यंत साधी राहणी, लाघवी स्वभाव लक्षवेधी ठरला आणि थेट प्रश्नांना सुरुवात झाली. ‘तंत्रज्ञान आलंय. संगीताचं तंत्र आधुनिक झालंय. तुमच्या नजरेतून हे सारं कसं आहे’, या पहिल्याच प्रश्नावर पत्कींनी त्यांच्या विचारांची लय पकडली. ‘‘सारं बनावटी झालंय’’ हे त्यांचं पहिलं निरीक्षण.

‘‘एका बैठकीत आम्ही गाण्याला चार तास घ्यायचो. कधी-कधी दीड-दोन तास अधिक, पण साऱ्यांच्या मेहनतीतून, लगावातून गाणं अस्सल उतरायचं. एकाच वेळी ४० ते १०० म्युझिशियन्सच्या कल्लोळातून रोमारोमांत भिनणारं संगीत तयार व्हायचं. सारे एकत्र असायचे. एक व्हायचे. आज तसं काही राहिलेलं नाही. साधं एक गाणं तुकड्या-तुकड्यांनी गोळा केलं जातं. गाणारा ‘रिहर्सल’ला येत नाही. किंबहुना, तो ते विसरलाय की काय अशी शंका यावी. रफीसाहेब, मन्ना डे यांच्यासारखे महान गायक गाण्याची तीन दिवस ‘रिहर्सल’ करायचे. तरीही समाधान मिळालं नाही की पुन्हा चौथ्या दिवशी बोलावलं जायचं. गाण्याप्रती त्यांची कमालीची तळमळ होती. मोठमोठे ॲक्टरही त्यांच्यावर चित्रित होणारे गाणे पाहण्यासाठी स्टुडिओत हजर असायचे. आपल्यावरलं गाणं कसं तयार होतंय, हे पाहण्याचं जबरदस्त कुतूहल अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्यासारख्या बड्या कलाकारांमध्ये होतं हे महत्त्वाचं.’’

हेही वाचा: 'मुलं मोठी झाली की नाव कमवतात, पण माझ्या तीन वर्षाच्या अन्वीनं...

शब्दांवरून अटळ युद्ध...

पत्कींची बोटं समोर टेबलावर ठेवलेल्या हार्मोनियमवर ठेका धरू लागली. ते म्हणाले, ‘‘शास्त्रीय संगीत हा गाभा असतोच; पण चित्रपट संगीताला निव्वळ सुरांचा आधार पुरेसा नसतो. तालही त्यासोबत असतो. मग ‘सिच्युएशन’चा विचार करावा लागतो. संगीतकाराला तसं सुचवलं जातं. शेवटी संगीतकाराने त्याच्याकडे संगीताचं किती मोठं गाठोडं जमवलं, त्यावर त्या गाण्याची गोडी वाढते. पूर्वी गीतकार गाणं लिहून द्यायचे. नंतर संगीत तयार व्हायचं. आज त्याच्या नेमकं उलट झालंय. आधी संगीत रचलं जातं नि मग त्यानुसार शब्दांची निवड केली जाते. त्या काळी शब्दांवरून संगीतकार आणि गीतकार यांच्यात अक्षरशः भांडणं व्हायची. म्हणजे प्रेमळ भांडण. एखादा शब्द गीतकाराला हवाच असला नि संगीतकाराला तो अडचणीचा म्हणजे सुरावटींत बसत नसला तर? तर मग दोघांमध्ये शब्दांवरून होणारं अटळ युद्ध सुरू व्हायचं, पण रात्रीपर्यंत गाणं तयार झालं, की पुन्हा दोघांत तह व्हायचा. (म्हणजे ‘सॉरी’साठीचा फोन यायचा) तर असं होतं सारं.’’

Ashok Patki

Ashok Patki

तेरा भाषांचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा...’

‘मिले सूर मेरा तुम्हारा...’च्या निर्मितीच्या किश्श्यांविषयी सांगताना तर ते त्या काळात हरवून गेले. ‘‘नव्वदच्या दशकात ‘मिले सूर...’ आकारास आलं. १३ भाषांमध्ये ते तयार होणार होतं. प्रत्येक भाषेतला त्याचा अवधी पाच ते सहा सेकंदांचा होता. तेवढाच. त्याच्यावर जायचंच नाही, असा प्रोड्यूसरचा आग्रह होता. आग्रह म्हणजे अट्टहास म्हणता येईल इतका... का सांगतो, ‘मिले सूर...’ची चाल जशी हिंदीत होती, तशीच ती इतर भाषांमध्ये असायलाच हवी ही सूचना होती. वर पुन्हा सहा सेकंदाची मर्यादा. सोबत सुषमा श्रेष्ठ, कविता कृष्णमूर्ती अशा तोडीचे गायक असल्याने फार काही अडचणी आल्या नाहीत. फक्त बंगालीत आम्ही ठेका न वापरता ते लयीवरच पूर्ण केलं. या गीताच्या निर्मितीमागे प्रोड्युसरचा एक विचार होता. १३ भाषांमधील गायकी अशी झरझर पुढे जाणारी हवी होती. म्हणजे त्यात कमल हासन बघा, तीन सेकंदच दिसतो. तो जर का १५ मिनिटे दाखवला गेला असता, तर त्रास झाला असता की नाही? सकाळी १० ते रात्री १० असे १२ तास ‘मिले सूर...’ पूर्ण होण्यास लागले.’’

हेही वाचा: 'दो लब्जो की है दिल की कहानी'...

ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्की यांच्या संगीत वाटचालीस सुरुवात झाली, त्या दिग्गजांपैकी जितेंद्र अभिषेकी यांनी पत्की यांना ‘लेकुरें उदंड जालीं’ पहिलं नाटकाचं संगीत करायला दिलं. त्याविषयी पत्की सांगू लागले. ‘‘अभिषेकी आणि वसंत कानिटकर यांनी एक इंग्रजी चित्रपट पाहून आल्यावर हे नाटक लिहिलं गेलं. मग संगीत कोण करेल असा प्रश्न आला. तेव्हा अभिषेकी यांनी माझं नाव सुचवलं. हलकाफुलका विषय असलेल्या ‘लेकुरे’ला मी संगीत दिलं. तुम्ही या क्षेत्रात आला म्हणजे थेट संगीतकार झालाच असं होत नाही. तुमच्यासमोर पायघड्या घातल्या जात नसतात. प्रत्येक अनुभव तुम्हाला शिकवत असतो. संगीतात प्रत्येक भूमिका वठवावी लागते. त्यानंतर ‘मोरूची मावशी’, ‘एका लग्नाची गोष्ट’सारख्या असंख्य नाटकांना संगीत दिलं.’’

सिंथेसायझर अन्‌ जिंगल्स...

जिंगल्सकडे कसे वळलात, या प्रश्नावर त्यामागची गोष्ट सांगितली. सुमन कल्याणपूर यांचे त्या वेळी परदेशी दौरे व्हायचे. मला त्यांच्यासोबत जायचा योग आला. गाणं संवादिनी अर्थात पेटीवर म्हणायची पद्धत, पण त्या काळात सिंथेसायझर आला. सिंथेसायझरने माझे मन वेधून घेतले. त्यात खूप बटनं होती. ती विशिष्ट ट्यूनवर सेट केलेली असायची. त्यात बदल केला की सूर बदलायचे. बरं यातलं काही मला माहीत नव्हतं सुरुवातीला. मी सुमनताईंना म्हटलं, की पेटीऐवजी आपण सिंथेसायझरवर कार्यक्रम करायचे का? त्यावर त्यांनी होकार भरला. सिंथेसायझरवर आमच्या ‘रिहर्सल’ही झाल्या. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू झाला. सूत्रसंचालकानं, ‘‘आता सुमन कल्याणपूर त्यांच्या आवाजातलं नाविका रे... हे गाणं सादर करतील’’, असं पुकारलंही मी सिंथेसायझरवर सूर धरला, पण कसलं काय, बटन दाबल्यावर फक्त ‘टूंग’ इतकाच आवाज निघाला. पुन्हा दुसऱ्या गाण्यावर तसंच. तो गाण्यांचा कार्यक्रम सिंथेसायझरच्या ऐवजी पेटीवर घ्यावा लागला. आता गंमत सांगतो, झालं काय, की मी ‘रिहर्सल’ संपल्यानंतर त्या सिंथेसायझरची सारी बटनं एकाच रेषेत आणून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला ते वाद्य घेऊन गेलो. खूपच अधीर झालो होतो मी, पण सारा खेळ खल्लास. खरे तर सूर ‘असाइन’ केलेल्या त्या वाद्यातील बटनांमधला ‘सस्टेन’ गेला होता. म्हणजे त्यातून ‘मिंड’ (स्वरसातत्य) निघेना. म्हणून शेवटी पेटी वापरावी लागली होती. त्यातूनच जिंगल्सचा जन्म झाला. निरनिराळ्या सुरांचं भांडार सोबत असल्याने सिंथेसायझर शिकून घ्यायचाच, असा मनाचा हिय्या करून मी वाजवायला बसलो. काही दिवसांत त्यातली प्रत्येक गोष्ट पक्की करण्यास घेतली नि मग त्याचा वापर जिंगल्स बनवण्यासाठी झाला.

‘गोट्या’नंतरची ‘आभाळमाया’

पत्कींनी टीव्ही मालिकांच्या शीर्षक गीताचा प्रसंग सांगितला. ‘‘गोट्या’चं शीर्षकगीत तयार झालं आणि विनय आपटे यांचा ‘आभाळमाया’साठी मला फोन आला. म्हणाले, तूच करायचं आहेस. मी पेटी काढली. माझ्या ‘डाडाडी डूडूडू लालाला’ या शब्दांनी गाण्याची ‘डमी’ तयार झाली आणि ‘आभाळमाया’चं शीर्षकगीत तयार झालं. माझ्यासोबतचे ‘म्युझिशियन’ प्रचंड खूश झाले. थोड्या वेळाने प्रोड्युसर आले. त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्रही होता. मी शीर्षकगीत ऐकवलं. कसलं काय, प्रोड्युसरच्या चेहऱ्यावर, काय फडतूस गाणं आहे हे असा भाव उमटला. ते म्हणालेसुद्धा, असं नको. काही तरी वेगळं करा. मी म्हटलं, कसं हवंय तुम्हाला. त्यावर त्यांनी सुचवलं, की मला ‘फ्यूजन’ हवंय. ते शक्य नाही, असं मी म्हटल्याबरोबर ते तेथून तरातरा निघून गेले. पुन्हा फोन नाही काही नाही. दुसऱ्या दिवशी, मी ही गोष्ट विनय आपटेंच्या कानावर घातली. त्यावर त्यांचा अवतार बघण्यासारखाच होता. त्यांनी त्या प्रोड्युसरला बोलावून घेतलं आणि कडक भाषेत सुनावलं. त्यानंतर तेच ‘आभाळमाया’चं शीर्षकगीत घराघरांत घुमू लागलं.

रंगांत रंग तो श्यामरंग...

गीतकार कसे झालात? या प्रश्‍नावर पत्कींनी त्यांची गोष्ट सांगितली. ‘‘गाण्याची चाल लावताना आम्ही संगीतकाराच्या भाषेत ‘डाडाडी डूडूडू लालाला’सारखे डमी शब्द वापरतो. अशीच एक चाल लावताना मी डमी म्हणून शब्दप्रयोग केले. तसेच काही तरी ‘डमी’ शब्द घेऊन शांताराम नांदगावकर यांच्याकडे गेलो होतो, पण त्यांनी, मी लिहिलेले शब्द अर्थात मुखडा तसाच ठेवायला सांगून अंतरे लिहिले. काही दिवसांनंतर स्वप्नील बांदोडकर माझ्याकडे आला. त्याला माझ्याकडूनच गाणं हवं होतं. तुम्ही पाहिजे तेवढे दिवस घ्या; पण मला गाणं द्या म्हणाला. १५ दिवस. त्याने सांगितले आणि निघून गेला. कुणी असा आग्रह केला, की मी त्याच दिशेने लगेच विचार करायला लागतो. गच्चीत पेटी घेऊन आलो. बोटं फिरू लागली. चालीचं ते ‘डाडाडूडू’ सुरू झालं. आतून बायकोनं जेवणासाठी हाक मारली, पण म्हटलं, थांब थोडा वेळ. मग पुन्हा सुरू झालं आणि शेवटी गुणगुणत असतानाच पाहिजे ते गवसलं. ‘‘रंगांत रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते...’’ स्वप्नीलने मला १५ दिवसांची मुदत दिली होती. ती मी अवघ्या १५ मिनिटंच घेतली... माझ्यातला गीतकार हा असाच मला गवसला.’’

या गप्पांची भैरवी आता होणार होती. पत्कींनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करताना, मी कोणी तरी मोठा आहे, मला मान द्या, असा भाव त्यांच्या बोलण्या-वागण्यात क्षणभरही जाणवला नाही. तुम्ही तुमचं काम करीत राहा, त्याचा आनंद घेत राहा असाच संदेश त्यांनी त्यांच्या संगीतसेवेतून दिला आहे. ते जाता जाता म्हणाले, की ‘‘खऱ्या कलाकाराची कला कधीही लपून राहत नाही. ती कधीही बनावटी नसते. गुरूने दिलेले संस्कार मनाच्या खोल तळाशी तसेच असतात, पण शिष्याचं त्याचं म्हणून काही तरी त्याला निर्माण करावं लागतं. गुरूने दिलेली चौकट मोडून नाही, तर त्यात राहून एक नवी चौकट शिष्याला तयार करता येते. फक्त तेवढी तळमळ मात्र तुमच्याकडे असायला हवी.’’

loading image
go to top