विक्की वेलिंगकर : अवधूत गुप्तेंच्या आवाजातलं 'टीकिटी टॉक' एकलं का?

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील 'टीकिटी टॉक' हे नवीन गाणे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी टीजर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या टीझरने समाजमाध्यमांवर चांगलीच हलचल निर्माण केली असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील 'टीकिटी टॉक' हे नवीन गाणे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका भूमिका असून हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाच्या या नवीन गाण्याचे ‘पळे मागे दुनिया सारी, तुझ्या हाती सबकी दोरी, तुझ्यापुढे सगळेच फ्लॉप! टीकिटी टॉक टीकिटी टॉक, टाइम मिळाला घेऊन टाक’ असे या गाण्याचे बोल असून हे उत्साहित करणारे गाणे अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील या दोघांनी गायले आहे. ओमकार पाटील यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सुमित तांबे यांचे शब्द लाभले आहेत. आयुष्यात वेळेचे कीती महत्व आहे हे या गाण्यावरून सूचित होते. या गाण्याचा संपूर्ण मूड पूर्णपणे पॉप रॉक प्रकारचा असून हे 'टीकिटी टॉक' गाणे ऐकल्यानंतर  प्रेक्षकांमध्ये ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाची उत्कंठा अधिकच वाढेल यात काही शंका नाही.

गायक अवधूत गुप्ते म्हणाले की ‘विक्की वेलिंगकरमधील 'टीकिटी टॉक' या गाण्याचा मूड पुर्णपणे पॉप रॉक प्रकारचा असल्यामुळे हे गाणं रेकॉर्ड करताना खूप मजा आली. आणि ओमकार पाटीलने हे गाणे फार उत्तमपणे संगीतबद्ध केले असून त्याचे मी विशेष कौतुक करेन. हे  गाणे  प्रेक्षक देखील खूप एन्जॉय करतील यात काही शंका नाही. 'विक्की वेलिंगकर' हा चित्रपट एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे अशाप्रकारचा प्रयोग आपल्या मराठी चित्रपटांमध्ये खूप कमी वेळा पहायला मिळतो, हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि त्यांनी तो जरूर पाहावा’.

संगीतकार आणि गायक ओमकार पाटील म्हणाले की ‘टीकिटी टॉक टीकिटी टॉक, टाइम मिळाला घेऊन टाक” हे गाणे करताना माझ्या डोक्यात एक मॅडनेस होता हा मॅडनेस खरा करण्यासाठी, सामान्यता संगीतकार हा गाणं तयार झाल्यानंतर गायक निवडतात पण माझ्या डोक्यात आधीपासूनच अवधूत गुप्ते हे नाव निश्चित होत. कारण अवधूत गुप्ते यांची गाण्याची शैली, आणि त्यातील त्यांचा खरेपणा कमालीचा आहे. मी त्यांना हे गाणे ऐकवले त्यांना माझं गाणं आवडलं आणि त्यांनी ते गायचे ठरवले. अवधूत गुप्तेनी या गाण्यासाठी माझे कौतुक देखील केले. ते देखील एक मोठे संगीतकार असल्यामुळे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे’.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avadhoot Gupte s song from Vicky Velingkar released