Avengers Endgame : अॅव्हेंजर्स: एण्डगेम: एक ताजा कलम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

इन्फिनिटी वॉरचा शेवट पाहता एण्डगेमचं मार्केटिंग करणंसुद्धा फार ट्रिकी होतं. त्यात एकंदर त्यांचे जेवढे ट्रेलर्स येत होते त्यामुळे हा संशय अजूनच बळावला होता की सिनेमा खूप काही आधीच सांगून टाकतो आहे.

सगळ्यात आधीच हे मान्य करूया की हा सिनेमा क्रिटिक प्रुफ आहे. पार्श्वसंगीत चांगलं, अभिनय उत्तम, पहिला हाफ असा आणि दुसरा तसा असली मतं इथे चालणारच नाहीत. कारण हा सिनेमा एकटं कथानक म्हणून कोणी पाहणारच नाहीये. नाही त्याचा तसा विचार केला जाऊ शकतो. गेल्या अकरा वर्षात आणि बावीस सिनेमांमध्ये जे घडलं त्याचा हा शेवट आहे. आजवर कधीही पाहिलं नाही अशा सिनेमा विश्वनिर्मितीचा हा सर्वोच्च बिंदू आहे. त्यामुळे त्याला एकटा सिनेमा म्हणून पाहताच येणार नाही. 

या सिनेमाबद्दल जी उत्सुकता आहे किंवा तिच्या मागे जो काही पट उभा केलेला आहे. हे खूप कमी वेळा अनुभवायला मिळतं. तुम्ही हॅरी पोटरचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता तेव्हा जो अनुभव घेतला होता. हा तो अनुभव आहे. किंवा अगदी आपल्याकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, “बाहुबली ने कटप्पा को क्यो मारा?” हे जितकं उत्सुकता वाढवणारं ठरलं होतं तितकाच हॉलीवूडमध्ये “थानोसने इन्फिनिटी वॉर मध्ये ज्या अर्ध्या हिरोंना मारलं ते परत कसे येणार? किंवा मुळात येणार का?” हा प्रश्न महत्वाचा झाला होता. एवढ्या सगळ्या अपेक्षांना हा सिनेमा खरा उतरेल, ह्याची शक्यता १४ दशलक्ष शक्यतांपैकी एकच असणार होती आणि लेखक स्टीव्हन मकफिली आणि ख्रिस्तोफर मार्कस ह्यांना ती बरोबर सापडली आहे. 

avengers end games poster

इन्फिनिटी वॉरचा शेवट पाहता एण्डगेमचं मार्केटिंग करणंसुद्धा फार ट्रिकी होतं. त्यात एकंदर त्यांचे जेवढे ट्रेलर्स येत होते त्यामुळे हा संशय अजूनच बळावला होता की सिनेमा खूप काही आधीच सांगून टाकतो आहे. त्यामुळे असं नको व्हायला की सिनेमा पाहायला गेल्यावर नवीन काही पाहिलंच नाही. पण सिनेमा सुरु होतो तेंव्हा कळतं की हे सगळे ट्रेलर्स तीन तासाच्या सिनेमाची केवळ पहिली पंधरा मिनिटं आहेत. त्यापुढचं काहीही त्यांनी दाखवलं नाहीये. उत्तम मार्केटिंग करणं आणि त्यात सिनेमाबद्दल उगाच अति माहिती न देणं हे दोन्ही त्यांना साध्य झालं आहे. त्यामुळे हा रिव्ह्यू लिहितानाही, आपण त्यातलं तर काही सांगत नाहीयोत ना, ह्याची काळजी घ्यावी लागते आहे. त्यात तशी शक्यताही खूप आहे कारण सिनेमा पहिल्या अर्ध्या तासातच आपण आजवर ज्या फान थिअरीज ऐकल्या होत्या त्या दाखवतो तरी किंवा फोल तरी ठरवतो. 

मग सिनेमा करतो काय, तर अशा शक्यता निवडत जातो ज्यातून त्यांनी आजवरच्या इतक्या साऱ्या सिनेमांचा जो पट मांडला आहे त्यातले भावनिक धागे जोडता येतील. म्हणजे तो केवळ इन्फिनिटीचा पुढचा भाग म्हणून समोर येत नाही तर आजवरच्या सर्व सिनेमांचा शेवट म्हणून समोर येतो. एंडगेम पहिल्या क्षणापासून भावना आणि पात्रं यांनाच महत्व देतो. जर इन्फिनिटी वॉर हा रामायणाचा लंकाकांड होता तर हा उत्तर कांड आहे. मोठं युद्ध झालं आहे. आणि ते आपले हिरो हरले आहेत. आता त्यांचा झगडा बाहेरच्या व्हिलन इतकाच स्वतःशीही आहे. जसा रामाचा युद्धा नंतरच्या काळात झाला. 

इथे इन्फिनिटी वॉर सारखी जग संपण्याची भीती नाहीये. किंवा अर्धं जग संपण्याची भीती नाहीये असं म्हणूया. इथे महत्वाचं आहे ते सर्व पात्रांना भावनिकरित्या परत उचलून तयार करणं. आणि ते करत असताना लेखक आणि दिग्दर्शक द्वयी असं काही करून दाखवतात की आजवरच्या सगळ्या सिनेमांच्या भावनिक प्रवासाला एक सुंदर शेवट इथे मिळत जातो. आणि जास्त कौतुक ह्याचं वाटतं की, हे ते एका नाही तर अनेक पात्रांच्या बाबतीत करून दाखवतात. एवढ्या सगळ्या कथांचा इथे जेवढ्या सुंदर पद्धतीने शेवट होतो त्यामुळेच हा सिनेमा मार्व्हलच्या गाथेचा सर्वांगसुंदर शेवट ठरतो. 

Related image

ता. क. सिक्वेल प्रीक्वेल आजवर पहिले होते. पण एक वेगळं विश्व कसं निर्माण करावं आणि ते पुढे कसं घेऊन जावं हे मार्व्हलच्या सिनेमा विश्वाने दाखवून दिलं आहे. एक सिनेमा हा एका छोट्या कादंबरीइतकाच आवाका कव्हर करू शकते असं म्हणतात पण मार्व्हलसारखे प्रयोग म्हणजे सिनेमा ह्या कलेचाच एका नव्या अंगाने विचार करणं आहे. हे मार्व्हलचं मिथक आहे. आणि एण्डगेम त्याला ज्या उंचीवर घेऊन जातो तो आहे ह्या मिथकाचा ताजा कलम. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avengers End Game review