Article 15 : देशातील शोषितांच्या कहाण्या वाचून आयुष्यमान भावूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

  • समाजातील जातव्यवस्थेवरही आयुष्यमान खुरानाचा सखोल अभ्यास
  • आयुष्यमानने शेअर केल्या वर्दीतील भावना
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या जातीभेदाबद्दल केले भरपूर वाचन

अभिनेता आयुष्यमान खुरानाचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'आर्टिकल 15' सध्या गाजतोय ते म्हणजे चित्रपटाच्या विषयावरुन. समाजातील परंपरेनं चालत आलेली जातव्यवस्था यावर आधारित 'आर्टिकल 15' चित्रपट सध्या वादाच्याही भोवऱ्यात सापडला आहे. पण या चित्रपटात काम करताना आयुष्यमानने केलेल्या आयपीएसच्या भूमिकेसाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागले असल्याचे समोर आले आहे. केवळ आपल्या भूमिकेचाच अभ्यास नव्हे तर समाजातील जातव्यवस्थेवरही सखोल अभ्यास आयुष्यमानने केला आहे.

आपल्या या अनुभवातून आयुष्यमान सांगतो की, 'मी वर्दीतील पुरुष आणि महिलांचा खूप सन्मान करतो. जेव्हा मी ही वर्दी घातली तेव्हा माझ्यात काही बदल झालेत. माझी वागण्याबोलण्याची पध्दत बदलली. हा चित्रपट भारताच्या ग्रामीण भागातील जातीव्यवस्था दर्शविणारा आहे. पहिल्यांदा चित्रपटात मी परिस्थितीचा शिकार नव्हे तर परिस्थिती हाताळणाऱ्या मास्टरच्या भूमिकेत आहे.' 

या चित्रपटाची तयारी करताना आयुष्यमानने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या जातीभेदाबद्दल भरपूर वाचन केले होते. रात्र-रात्र जागून देशातील अनेक शोषितांच्या कहाण्या आयुष्यमानने वाचल्या. 'आर्टिकल 15'मध्ये एका पोलिस ऑफिसरची भूमिका करणे हे माझ्यासाठी खूप भावनिक असल्याचेही आयुष्यमान सांगतो. 

'आर्टिकल 15'च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ब्राह्मण समाज ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने नेमिनाथ चतुर्वेदी यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार, चित्रपटात खोटी आणि मोडतोड करुन कहाणी मांडण्यात आली आहे. यात आपत्तीजनक, अफवा पसरविणाऱ्या आणि समाजात द्वेष पसरविणाऱ्या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. या याचिकेवर निर्णय होणे बाकी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayushmann khurrana shares his experience of cops role in Article 15