वाचा 'बाहुबली २'चे चित्रपट परीक्षण!

महेश बर्दापूरकर
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

आता प्रश्न कटप्पानं बाहुबली का मारलं....हा खरं तर 10 टक्के प्रश्न आणि 90 टक्के गेल्या ती वर्षांत निर्माण केला गेलेला विनोदच आहे. या प्रश्नाच्या उत्तराची हिंट पहिल्या भागातही आहे आणि दुसऱ्या भागात ती थोडी स्पष्ट करून सांगितली जाते, एवढंच.

देखणा, अविस्मरणीय अनुभव 
 

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित बाहुबलीचा सिक्वेल 'बाहुबली द कन्क्‍लूजन' बहु(त) देखणा आहे. कथेच्या जोडीला अभिनय, ऍक्‍शन, इमोशन, ड्रामा खच्चून भरलेला आणि भारतीय चित्रपटांत आजपर्यंत कधीही न पाहिलेले स्पेशल इफेक्‍ट्‌स दाखवणारा हा चित्रपट डोळ्याचे पारणे फेडतो.

दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी कमाल केली आहे, तर प्रभास, राणा डग्गुबाती, अनुष्का शेट्टी यांच्या देखण्या अभिनयानं चित्रपटानं मोठी उंची गाठली आहे. पहिल्या भागाच्या शेवटी कटप्पानं महेंद्र बाहुबलीला त्याच्या वडिलांना, अमरेंद्र बाहुबली यांना का मारलं, याचं उत्तर सांगण्यास सुरवात केली होती आणि दुसरा भाग त्याच टप्प्यावर सुरू होतो.

अमरेंद्र बाहुबली (प्रभास) आता महिष्मती साम्राज्याच्या राजा होणार असतो व त्याआधी तो कटप्पाबरोबर राज्याची सफर करण्यासाठी बाहेर पडतो. या प्रवासात तो जवळच्या राज्यातील राजकुमारी देवसेनेच्या (अनुष्का शेट्टी) प्रेमात पडतो. गैरसमजातून बाहुबलीला तिला कैद करून महिष्मतीमध्ये आणावं लागतं. बाहुबलीचा मोठा भाऊ भल्लाला (राणा डग्गुबाती) देवसेनेशी विवाह करायचा असतो व या वादात महाराणी बाहुबलीला देवसेनेसह महालाबाहेर काढते. भल्ला मोठा कट रचतो व कटप्पाला त्याचा भाग बनावं लागतं. आता चित्रपट फ्लॅशबॅकमधून बाहेर पडतो व अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा महेंद्र बाहुबली तुफानी हल्ला करीत भल्लाचा बदला घेतो. 

बाहुबलीच्या या भागाची कथा अधिक मनोरंजक आहे व दिग्दर्शकानं ती छान विणली आहे. कथा व पटकथेबरोबर ऍक्‍शनचा नेमका आणि धडाकेबाज वापर, खास तमीळ चित्रपटांतच शोभणारी हळव्या प्रसंगाची मालिका, अतिभव्य सेट, हॉलिवूडपटांना लाजवतील असे स्पेशल इफेक्‍ट्‌स यांमुळं हा चित्रपट पाहणं हा अविस्मरणीय अनुभव ठरतो. प्रभासला या चित्रपटामध्ये अभिनयाची आणखी मोठी संधी मिळाली आहे.

देवसेनेचा प्रियकर, तिचं राज्य वाचवण्यासाठी लढणारा योद्धा व नंतर एका कटाचा बळी पडलेला योद्धा त्यानं छान साकारला आहे. महेंद्र बाहुबलीच्या भूमिकेत त्याचा जोशही वाखणण्याजोगा. राजघराण्याला आव्हान देणाऱ्या देवसेनेच्या भूमिकेत अनुष्का शेट्टीची देहबोली जबरदस्त. कटप्पाच्या भूमिकेत सत्यराज यांच्या वाट्याला यावेळी अनेक विनोदी प्रसंगही आले आहेत व ते त्यांनी छान निभावले आहे.

राणा डग्गुबातीनं साकारलेला खलनायक तोडीस तोड आहे. आता प्रश्न कटप्पानं बाहुबली का मारलं....हा खरं तर 10 टक्के प्रश्न आणि 90 टक्के गेल्या ती वर्षांत निर्माण केला गेलेला विनोदच आहे. या प्रश्नाच्या उत्तराची हिंट पहिल्या भागातही आहे आणि दुसऱ्या भागात ती थोडी स्पष्ट करून सांगितली जाते, एवढंच. एकूणच, बाहुबलीचा हा सिक्वेल अधिक जोरकस, मनोरंजक व देखणा असल्यानं तो अविस्मरणीय अनुभव देतो. 
 

श्रेणी : 4 

Web Title: Baahubali 2 movie review by Mahesh Bardapurkar