राजकन्या अनुष्का 

Anushka
Anushka

'सुपर' या तेलुगू चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अनुष्काचे 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या "अरुंधती' चित्रपटामुळे दाक्षिणात्य सिने क्षेत्रात स्थान निर्माण झाले. त्यानंतर "बिल्ला', "मिर्ची', "नागावल्ली', "सिंघम', "वेदम', "रुध्रमादेवी' आणि आता "बाहुबली'मधील देवसेना. अनुष्काने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांमध्ये वेगळेपण दिसते. खरेतर ती साक्षात राजकन्याच आहे. 

अभिनेत्री अनुष्का शेट्टी हे तेलुगू आणि तमिळ सिने क्षेत्रातील उल्लेखनीय नाव. "बाहुबली 2- द कन्क्‍लुजन'मुळे आता तिची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होतेय. तिने साकारलेली देवसेना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. राजकुमारी देवसेनासारखा लूक सगळीकडे लोकप्रिय होतोय. यूट्युबवर देवसेना लूक या नावाने काही व्हिडीओज पोस्ट करण्यात आले, ते बघून अनेकांना देवसेना लूकविषयी कुतूहल निर्माण झाले. गुगलवरही तिचे देवसेना लूकमधील फोटो सर्च केले जात आहेत. इतकेच नाही तर प्री वेडिंग फोटो शूटमध्येही देवसेना लूक नववधूंच्या अधिक पसंतीस उतरला आहे.

साहजिकच त्यामुळे अनुष्काविषयी जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांना आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अनुष्का योगाभ्यासाची शिक्षिका होती. तिला सुरुवातीला एका कन्नड चित्रपटात काम नाकारले गेले; पण तिने आपला ध्यास सोडला नाही. 2005 तिने "सुपर' चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर तिची अभिनयातील घोडदौड सुरूच राहिली. "विक्रमारकुडू' हा तिने एस. एस. राजामौलींसोबत केलेला पहिला चित्रपट होता. अनुष्का राजामौलींना आपल्या गुरूस्थानी मानते. "अरुंधती'मध्ये तिने कमालच केली. या हॉरर काल्पनिक चित्रपटात तिने अरुंधती राणीची भूमिका साकारली जी दुष्टांचा संहार करते. अनुष्काने आपल्या अभिनय कौशल्याने अरुंधतीची भूमिका अजरामर केली. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. स्विटी या आपल्या खऱ्या नावाप्रमाणेच तिने गोड चेहऱ्याने आपली छाप पाडली. साहजिकच रुध्रमादेवी चित्रपटातही तिने स्वतःला इतके झोकून दिले की तिच्याशिवाय ही भूमिका दुसरे कुणीच करू शकत नाही, हे तिच्या चाहत्यांच्या मनावर ठसले. "अरुंधती' आणि "रुध्रमादेवी'तील भूमिकेसाठी फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांची तिच्यावर बरसात झाली. राजकन्या, राजकुमारी किंवा देवी अशाच भूमिकांमध्ये अनुष्का दिसणार की काय, असे वाटत असताना तिने प्रभाससोबत "बिल्ला' आणि "मिर्ची' चित्रपट केले. त्यामुळे अनुष्का मॉडर्न लूकमध्येही तितकीच सुंदर दिसू शकते, हे सर्वांनाच पटले. पाश्‍चिमात्य वेशभूषा आणि प्रभाससारखा स्टार अभिनेता तिच्यासोबत काम करत असतानाही अनुष्का कशातच कमी पडली नाही. या दोन चित्रपटांमुळे प्रभाससारखा चांगला मित्र तिला मिळाला. इतकेच नव्हे, तर या दोघांनी एकत्र खूप चित्रपट करावेत, असे त्यांच्या चाहत्यांना वाटू लागले. अनुष्का आणि प्रभासचा चाहता वर्ग सोशल मीडियावर खूपच प्रभावी आहे. प्रभास आणि अनुष्का फॅन क्‍लब अशा नावांनी कित्येक अकाऊंट्‌स आहेत. जिथे प्रभास आणि अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओज पोस्ट केले जातात. इतकेच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांना वाटतेय की त्या दोघांनी लग्न करावे; पण अनुष्काला तर तिच्या आई-वडिलांनी निवड केलेल्या मुलाशीच लग्न करायचे आहे. अनुष्काने आतापर्यंत कॉलीवूड आणि टॉलीवूडच्या सुपरस्टार अभिनेत्यांबरोबर काम केलेय. ज्यामध्ये रजनीकांत, नागार्जुन, सूर्या, रवी तेजा आणि प्रभास यांचा समावेश आहे. 

'रुध्रमादेवी'साठी तिला पाच कोटी मानधन मिळाले तेव्हा ती दाक्षिणात्य सिने क्षेत्रात सर्वांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली. "बाहुबली'च्या दोन्ही भागांमध्ये मातब्बर कलाकारांची फौज आहे; पण अनुष्का कुठेही कमी पडत नाही. "बाहुबली'च्या पहिल्या भागात काही मोजकेच सीन तिच्या वाट्याला आले होते; पण दुसऱ्या भागात मात्र तिने आणि प्रभासने प्रचंड मेहनत घेतलीय. ती पडद्यावर दिसतेच आहे. "बाहुबली'प्रमाणेच अनुष्काने साकारलेली देवसेनाही प्रेक्षकांना भावतेय. "बाहुबली'च्या पहिल्या भागानंतर तिचा "रुध्रमादेवी' प्रदर्शित झाला आणि तो खूपच गाजला. त्यानंतर तिने लगेचच "साईज झीरो' या चित्रपटातील सौंदर्या नावाच्या लठ्ठ मुलीची भूमिका साकारली. तिला या चित्रपटात सुरुवातीला वजन वाढवून नंतर कमी करायचे होते. हा समतोल आणि त्यातील वेगळेपणा तिने उत्तमरीत्या साधला. देवसेना साकारल्यानंतर आता तिचा "भागमती' येतोय. यात आजच्या युगाची एक रोमांचक गोष्ट मांडण्यात आलीय. यातही अनुष्का आपला वेगळा ठसा उमटवेल, हे वेगळे सांगायला नकोच. तिचा मोठ्या पडद्यावरील वावर, डौल, शान यामुळे ती अष्टपैलू अभिनेत्री ठरलीय. खरेच अनुष्काचा अभिनय पाहताना साक्षात राजकन्याच अवतरलीय असेच वाटते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com