बाहुबलीची एवढी 'क्रेझ' का?

टीम ई सकाळ
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

बाहुबली अमेरिकेसह जगभरात प्रदर्शित करण्यात येत असताना तमिळनाडूच्या होमग्राऊंडवर मात्र तो आज सकाळी दाखविण्यात आला नाही. बाहुबलीच्या वितरकाने बिल थकविल्याने तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी सकाळचे स्क्रीनिंग रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

सामान्य चित्रपटरसिकांपासून ते समीक्षक, कलाकार, सेलिब्रिटी अशा सर्व स्तरांतून 'बाहुबली 2' चित्रपटावर स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत. देशभरात असलेल्या 'बाहुबली फीवर'चे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईचे सर्व विक्रम हा चित्रपट मोडेल अशी शक्यता समीक्षकांनी वर्तविली आहे.

फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिल्याचे स्टेटस अनेकांनी अभिमानाने अपडेट केले आहे. तर काही प्रेक्षकांनी चित्रपटाचा नायक अभिनेता प्रभास याला पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात कमी महत्त्व दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री तमन्ना भाटियाबद्दलही अनेकांनी जाहीर प्रेम व्यक्त केले आहे. 

'बाहुबली 2' हा अप्रतिम चित्रपट आहे. त्याचा दर्जा, भव्यता अविश्वसनीय आहे. दिग्दर्शक राजामौली पुढची कोणती निर्मिती करणार आहेत याची मला प्रतीक्षा आहे, असे कपिल शर्माचा सहकलाकार विनोदी अभिनेता किकू शारदा याने म्हटले आहे. किकू साकारत असलेले 'बंपर' नावाचे पात्र प्रसिद्ध आहे. 

कोणत्याही चित्रपटाला मध्यंतरामध्ये प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्याचे (स्टँडिंग ओव्हेशन) आतापर्यंत पाहिले नाही, असे अरविंद नावाच्या एका चित्रपट रसिकाने म्हटले आहे. 

'बाहुबली' हा एकच चित्रपट दोन भागांत विभागलाय असं समजून आपण पाहायला हवा. त्याची कथा, भावना, पटकथा या हॉलिवूड चित्रपटांपेक्षा वरचढ आहेत. 'बाहुबली 2'बद्दल सर्वकाही बोलून आणि सांगून झाले आहे. परंतु, मी एवढेच म्हणेन की, बाहुबली ही चित्रपटांची मालिका भारतातील सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. मला याचा अभिमान वाटतो, असे चित्रपट व्यवसाय समीक्षक सुमित कडेल यांनी म्हटले आहे. 

अनेकांनी ताज्या घडामोडींशीही बाहुबलीचा संबंध जोडून प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामध्ये वीरेंद्र सेहवाग म्हणतो, "प्रत्येकजण विचारतोय की बाहुबलीला कटप्पाने का मारलं, परंतु पोलिसांनी कटप्पाला अटक का केली नाही असं कोणी विचारत नाही. आपल्या दीनवाण्या कायदा व सुव्यवस्थेला आपणच जबाबदार आहोत." 
गौतम गंभीर सुकमातील हुतात्म्यांच्या मुलांचा खर्च करणार आहे. त्यामुळे आज गौतम हाच खरा बाहुबली आहे असे अधिका गुज्जर हिने म्हटले आहे. 

दरम्यान, दाक्षिणात्य चित्रपट निर्मिती असलेला बाहुबली अमेरिकेसह जगभरात प्रदर्शित करण्यात येत असताना तमिळनाडूच्या होमग्राऊंडवर मात्र तो आज सकाळी दाखविण्यात आला नाही. बाहुबलीच्या वितरकाने बिल थकविल्याने तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी सकाळचे स्क्रीनिंग रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अखेर बाहुबलीची एवढी क्रेझ का याचं उत्तर बॉक्स ऑफिसवरच मिळेल. 

Web Title: bahubali fever on social media