rd burman
rd burmansakal

पंचमदांचा मेलोडी सूर

भारतीय चित्रपट संगीताने आतापर्यंत विविध टप्प्यांवर अनेक वेगवेगळे सांगीतिक प्रयोग अनुभवले आहेत.
Summary

भारतीय चित्रपट संगीताने आतापर्यंत विविध टप्प्यांवर अनेक वेगवेगळे सांगीतिक प्रयोग अनुभवले आहेत.

- बालाजी विट्टल

भारतीय चित्रपट संगीताने आतापर्यंत विविध टप्प्यांवर अनेक वेगवेगळे सांगीतिक प्रयोग अनुभवले आहेत. सुरुवातीला शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यापासून सुरू झालेला प्रवास काही संगीतकारांना त्यांच्या आगळ्यावेगळ्या संगीताने लोकप्रियतेपर्यंत पोहोचवला. पठडीतील संगीत रचनेपलीकडे जात शेकडो वाद्यांचा वापर करून गाण्यांमध्ये भावविश्व ओतण्याचाही प्रयत्न हिंदी चित्रपट संगीतात करण्यात आला. अशा प्रयोगशील संगीतकारांमध्ये आर. डी. बर्मन यांचे नाव आघाडीवर. ‘पंचमदा’ नावाने परिचित असलेल्या आरडींची २७ जून रोजी ८३ वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा हा आढावा...

जेव्हा आपण ‘गेम चेंजर्स’बाबत उल्लेख करतो, तेव्हा एखादा अभिनेता किंवा दिग्दर्शकच आपल्या डोळ्यासमोर उभा ठाकतो; पण पडद्यामागे जे घडते त्याचे श्रेय क्वचितच त्यांना दिले जाते. शंकर-जयकिशन हे हिंदी चित्रपट संगीतातील पहिले गेमचेंजर मानले जातात. या जोडीने हिंदी गाण्यात परिवर्तन घडवून आणले. ‘बरसात’ हा त्यांचा पहिला चित्रपट. यातील गाणी सर्वकालीन लोकप्रिय संगीतापैकी एक आहेत. यातील बहुतेक गाणी भैरवी रागावर आधारलेली आहेत. ती त्यावेळी प्रचलित असलेल्या संगीताच्या तुलनेत खूपच सोपी होती. वाद्यमेळदेखील खूप हलका होता, कारण त्या रचनेतील वाद्य रागावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाही.

‘आवारा’मधील गाण्यांनी तर अनेक मैलाचे दगड गाठले. यात पहिल्यांदाच शंभर वाद्यांचा समावेश असलेल्या ऑर्केस्ट्राचा वापर करण्यात आला होता. त्याद्वारे प्रथमच ‘तेरे बिना आग यह चांदणी’ आणि ‘घर आया मेरा परदेसी’ ही गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली होती. ‘आवारा हूं’ या शीर्षकगीतामध्ये अतिशय प्रभावी अशी काऊंटर मेलडी होती. तेव्हापासून त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांत हीच शैली अनुसरली. शम्मी कपूर अभिनीत ‘जंगली’च्या वेळी या शैलीत बदल करण्यात आला. ५० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत युगलगीते ही एकतर आनंद व्यक्त करणारी किंवा खूपच तीव्र भावना व्यक्त करणारी होती. ‘चोरी चोरी’मधील तिन्ही गाणी आनंद व्यक्त करणारी उत्साही होती. लेख टंडनच्या ‘आम्रपाली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही, पण त्यातील शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या मिश्रणाने शंकर-जयकिशन जोडीला पुन्हा संगीतकार म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आणले. आणि ती वेळही अशी होती की, जेव्हा त्यांचा भर हलकीफुलकी गाणी करण्यावर होता.

या सर्व घडामोडी घडल्या, त्याची सुरुवात झाली ती १९५१ पासून. याउलट आर. डी. बर्मन यांची संगीताचा बाज बदलणारी कारकीर्द १९७१ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत घडली. ‘तिसरी मंझील’ (१९६६) हा चित्रपट हिंदी चित्रपट संगीताच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरली, पण त्यातील गाण्यांना ‘सोना रे’सारखे झटपट यश न मिळता त्याचा स्वीकार हळूहळू झाला. रौप्यमहोत्सव साजरे होण्याच्या एक आठवड्यापूर्वी चित्रपटगृहातून चित्रपट मागे घेण्यात आल्याने दिग्दर्शक विजय आनंद यांच्यासह अनेकांना धक्का बसला. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसे पंचमदांचे संगीत ‘तिसरी मंझील’च्या यशाचे एक प्रमुख कारण मानले जाऊ लागले. ‘तिसरी मंझील’ १९७० साली पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा नॉस्टेल्जियाचा या चित्रपटाला भरपूर फायदा झाला. तोपर्यंत पंचमदा अनेक बदलांचे निर्माता मानले जाऊ लागले. दरम्यान, पंचमदांनी १९७१-१९७५ या काळात संगीतात नेमके काय-काय बदल केलेत, त्यावर थोडक्यात नजर...

कटी पतंग

राजेश खन्नाच्या स्वप्नवत आयुष्याची सुरुवात ‘आराधना’ने झाली, पण ‘कटी पतंग’ने राजेश खन्नाला सार्वकालीन रोमँटिक नायक म्हणून ओळख दिली. यात त्याने एक संवेदनशील कवी, देखणा आणि अविवाहित, डोंगरातील हवेलीत राहणारा एक सर्वोत्तम गायक कमलची भूमिका साकारली. तो नुकताच एका अत्यंत क्लेशकारक प्रेमभंगाच्या दुःखातून गेला होता. जेव्हा महिलावर्ग या चित्रपटातील संगीत ऐकतील, तेव्हा या एकाकी श्रीमंत तरुणाची प्रतिमा त्यांच्या मनात रुंजी घालेल, याची पुरेपूर काळजी किशोर कुमार आणि आरडी यांनी घेतली होती.

हरे रामा हरे कृष्णा

या चित्रपटातील उषा उथ्थपचे गाणे हे खऱ्या अर्थाने मास्ट्ररस्ट्रोक होता. तिचा धमाकेदार बास-हेवी आवाज आणि अचूक इंग्रजी उच्चार ही पंचमदांची हॅट्ट्रिक होती. आशा भोसलेंच्या ‘दम मारो दम’, उषा उथ्थपच्या ‘आय लव्ह यू’ आणि ‘ओ रे घुंगरू’, ‘कांची रे कांची रे’ या गाण्यांनी काठमांडूमधील हिमालयीन टेकड्यांना धुरकट मादकतेपासून विलग केले. पंचमदांनी या अल्बममध्ये तालवाद्य ‘मदल’ आणि तालवाद्य वादक रणजीत गझमेर यांची ओळख करून दिली.

अमर प्रेम

आरडीने किशोर कुमारचे आतापर्यंत न ऐकलेले रूप समोर आणले ते ‘अमर प्रेम’ या चित्रपटातून. शास्त्रीय रागावर आधारित गाणी गाणारे गायक म्हणून मास्टर किशोर कुमार यांची ओळख. ज्या दुनियेत शास्त्रीय गायकांनी हिंदी चित्रपटातील गाणी गाणे निंदनीय समजले जात असे, तिथे शास्त्रीय गायक ‘चिंगारी कोई भडके’ गुणगुणू लागले. यानंतर किशोर कुमारने सर्वच टीकाकारांची तोंडे बंद केली.

शोले

जेम्स बाँड असो की हॉलीवूडचे वेस्टर्न सिनेमे. पार्श्वसंगीत कथेच्या निवेदनावर एक प्रकारचा रंग चढवते. ठाकूर, गब्बर, जय आणि विरूसह पंचमचे संगीत हे ‘शोले’तील पाचवे पात्र होते. चरित्रलेखक आणि चित्रपट रसिकांनी ‘शोले’मधील पार्श्वसंगीताच्या प्रत्येक पैलूवर अविरतपणे संशोधन केले आहे. पंचमचा कोणताही लाईव्ह शो ‘शोले’तील थीम ट्यूनशिवाय पूर्ण होत नसे. भानू गुप्तांसारख्या वादकाला ‘शोले’तील जयची हार्मोनियमवरील धून वाजवण्याची वारंवार विनंती केली जात असे. यासंदर्भातला एक किस्सा त्यांनी सांगितला होता. एकदा भानू गुप्ता मुंबईत वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यावेळी ते घाईत असल्याने त्यांना लवकर जाऊ द्यावे, असे त्यांनी पोलिसांना ‘शोले’तील हीच धून वाजवून सांगितले होते. हे सर्व ४७ वर्षांपूर्वी घडले. विशेष म्हणजे पंचमने एवढं सगळं केलं, तेव्हा तो केवळ ३६ वर्षांचा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com