बंदूक्या सिनेमातील गाण्यांना "जुंदरी झटका" 

टीम ई सकाळ
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई : बहुचर्चित बंदूक्या सिनेमाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. सिनेमाचे भन्नाट पोस्टर, खळबळ माजवणारे मोशन पोस्टर आणि सोशल नेटवर्किंग साईट वरून धुमाकूळ घालण्याऱ्या विविध पोस्टमुळे बंदूक्या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई : बहुचर्चित बंदूक्या सिनेमाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. सिनेमाचे भन्नाट पोस्टर, खळबळ माजवणारे मोशन पोस्टर आणि सोशल नेटवर्किंग साईट वरून धुमाकूळ घालण्याऱ्या विविध पोस्टमुळे बंदूक्या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे.

५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'बंदूक्या' सिनेमाने ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या पुरस्कारांमुळे या सिनेमाची उंची नक्कीच उंचावली आहे. १ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या बंदूक्या सिनेमाचा सॉंग लॉँचचा सोहळा नुकताच अंधेरी येथील द व्हू या ठिकाणी मोठ्या थाटात पार पडला. बंदूक्या सिनेमातील 'माझा ईर' आणि 'आता सोसना' ही गाणी तसेच ट्रेलर यावेळी दाखवण्यात आला.

निर्माते राजेंद्र बॊरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राहूल मनोहर चौधरी यांनी केलं आहे.  सिनेमातील 'माझा ईर' हे प्रमोशनल सॉंग आणि 'आता सोसना' हे इमोशनल सॉंग ही दोन्ही गाणी सिनेमाची कथा नेमकी उलगडण्यात मदत करणारी आहेत. खास "जुंदरी झटका" म्हणून स्वतंत्र ओळख असणारी जुन्नर भागातली निखळ विनोदी भाषा या सिनेमातून प्रथमतःच महाराष्ट्राच्या चोखंदळ प्रेक्षकांसमोर येतेय.

नामदेव मुरकुटे यांनी लिहिलेलं तुफान ताल धरायला लावणाऱ्या  'माझा ईर' गाण्याचा जुंदरी झटका चाखून प्रेक्षकांना भन्नाट अनुभव मिळेल. महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदे याच्या भारदस्त आवाजातील हे गाणं 'सॉंग ऑफ दी इयर' नक्कीच बनेल यात शंका नाही.  सिनेमाचं कथासार उलगडणारं 'आता सोसना' गाणं गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून उतरलं आहे.  गायक जावेद अली आणि गायिका महालक्ष्मी अय्यर यांच्या सुमधूर आवाजाचा स्वरसाज या गाण्याला चढला आहे.  कथेची व बोलीभाषेची पोत ओळखून संगीतकार परीक्षित भातखंडे यांनी  सिनेमाचं संगीत चपखल जमवून आणलं आहे. या सिनेमाची गाणी व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वीरित्या संभाळली आहे.  अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकूटे, निलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर अभिनेता निलेश बोरसे यांचं चित्रपट क्षेत्रात प्रथम पदार्पण असल्याने मराठी सिनेसृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे. बंदुक्या सिनेमाची कथा ही एका विशिष्ट समाजात पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या एका  "विशिष्ट प्रथेवर" आधारीत आहे.  अस्सल "अन टच" गावरान बोली मुळे 'बंदुक्या' सिनेमाचा एक वेगळाच ठसका पोट धरून हसता हसता शेवटी अंतर्मुख करणारा ठरणार आहे.

Web Title: bandukya music launch esakal news