अभिनय सम्राट "बरून' 

अरुण सुर्वे 
मंगळवार, 6 जून 2017

मला करिअरसाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. आई-वडील, पत्नी आणि मित्रांनी नेहमीच पाठिंबा दिला. मी टेलिकॉम कंपनीत काम करत असतानाच अभिनयाची गोडी लागली. त्यामुळेच मॉडेलिंग सुरू केलं आणि लगेचच "श्रद्धा' या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर मायानगरी मुंबईत आलो आणि मागे वळून पाहिलं नाही. सांगतोय अभिनेता बरून सोब्ती.... 

मला करिअरसाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. आई-वडील, पत्नी आणि मित्रांनी नेहमीच पाठिंबा दिला. मी टेलिकॉम कंपनीत काम करत असतानाच अभिनयाची गोडी लागली. त्यामुळेच मॉडेलिंग सुरू केलं आणि लगेचच "श्रद्धा' या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर मायानगरी मुंबईत आलो आणि मागे वळून पाहिलं नाही. सांगतोय अभिनेता बरून सोब्ती.... 

माझा जन्म आणि लहानाचा मोठा मी दिल्लीमध्येच झालो. माझे कुटुंबीय दिल्लीमधील कीर्ती नगरमध्ये राहतात. माझं शालेय शिक्षण जनकपुरी येथील सेंट मार्क्‍स स्कूलमध्ये झालं. त्यानंतर हिंदू कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेची पदवी घेतली. वयाच्या 17 व्या वर्षापासून मी "जिंदाल टेलिकॉम' कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालो. मगच मी अभिनय आणि मॉडेलिंगला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दिल्लीमधील लाजपतनगर येथील "बॅरी जॉन ऍक्‍टिंग स्टुडिओ'मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्यामुळे माझ्यातील कलाकार फुलत गेला. 

दिल्लीमध्येच असताना 2009 मध्ये "श्रद्धा' या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं म्हणून मी मुंबईला आलो. माझे बाबा निवृत्त आर्मी अधिकारी आहेत. माझ्या आईनेच मला स्वप्नांचा पाठपुरावा करायला शिकवलं. त्यामुळेच मी अभिनेता बनण्यामध्ये तिचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच माझ्या यशाचं श्रेय मी तिला देतो. 

"श्रद्धा' या मालिकेनंतर "बात हमारी पक्की है', "इस प्यार को क्‍या नाम दू' या मालिकेत अभिनय केला. सुरभी ज्योती समवेत "तनहाईयॉं' ही वेब सीरिज केली. ती लोकप्रिय ठरली. अजूनही ती वेबसीरिज पाहिली जाते आणि प्रेक्षक सोशल मीडियावरून आम्हाला ती वेबसीरिज खूप आवडल्याचं सांगतात.

 मालिका करत असतानाच दुसरीकडे "मैं और मि. राइट', "तू है मेरा संडे', "सतरा को शादी है' आणि "22 यार्डस' अशा काही मोजक्‍या चित्रपटांत मी अभिनय केला. पण माझी खरी ओळख निर्माण झाली ती "इस प्यार को क्‍या नाम दूँ' मालिकेतील अर्णव ससिंग रायझादामुळे! माझी आणि सनाया इराणीची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. अजूनही आमचे चाहते पुन्हा या मालिकेच्या येणाऱ्या तिसऱ्या भागात आम्हाला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता "इस प्यार को क्‍या नाम दू 3' (तिसरा भाग) ही मालिका नवीन कथेसह येणार आहे. यात मी अद्वय सिंग रायझादाची भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांना यातून छान भेट मिळेल. अद्वय आणि अर्णव या दोन्ही व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत. यात माझा स्वभाव रागीट दाखवण्यात आलाय. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कुठल्यातरी गोष्टीचा बदला घेणार आहे. चेहऱ्यावर तडप आहे, राग आहे. काहीतरी खास गमावल्याची भावना आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला, पण एकूणच माझ्या अभिनय कारकिर्दीत प्रेक्षकांकडून खूप प्रेम आणि कौतुकाची थाप मिळालीय. त्यामुळे मला खूप मेहनत घेऊन प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. कारण, मला अभिनय करायला प्रचंड आवडतं. आयुष्याने मला खूप काही शिकवलंय. आपण स्वतःवर विश्‍वास ठेवायला हवा. माझे चाहते हेच माझा सर्वांत मोठा आधारस्तंभ आहेत. 

आपल्याकडे पुरेसा पैसा आहे आणि आता आपण मॉडेलिंग आणि अभिनयाच्या दिशेने वाटचाल करायला हवी, असं मला जेव्हा वाटलं तो क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. आणि तेच माझं स्वप्न होतं. 

तेव्हापासून मी कधीच मागे वळून पाहिलेलं नाही. सध्या मी मुंबईत राहतो. कामासाठी खूप प्रवास करतो, पण मुंबई आणि दिल्ली हीच माझी आवडती शहरे आहेत. दिल्लीने मला आयुष्य दिलं आणि मुंबईने माझ्या आयुष्याचा प्रवास सुंदर घडविला. त्यामुळे ही दोन्ही शहरं माझ्यासाठी "लकी' आहेत. आगामी काळातही आगळ्यावेगळ्या भूमिका साकारणार आहे. आणि खात्री आहे की जसं अर्णवसिंग रायझादा या भूमिकेमुळे प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. तसंच ते यापुढेही माझ्यावर प्रेम करतील. 
 

Web Title: Barun Sobti actor interview