भगवान, तुझे मैं खत लिखता... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

14 जानेवारी हा संगीतकार चित्रगुप्त यांचा स्मृतिदिन.....यानिमित्त
 

माणसाने कसं, संतुष्ट असावं! कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न करता आपलं काम करावं. नाहीतर, अल्पसंतुष्ट स्वभावानं कितीतरी लोकांचं यश अक्षरशः उसाच्या पाचटासारखं झाल्याची उदाहरणं आहेत, नाही का?... म्हणुन तर, आपलं काम भलं आणि आपण भलं, कुणाच्या अध्यात-ना मध्यात. मिळेल ते काम आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणे करायचं. सिनेमा सारख्या वलयांकीत क्षेत्रात काम करूनही कुठल्याही मान-सन्मानाची अपेक्षा नाही, ऍवॉर्ड... फिल्मफेअर तर दूरचीच गोष्ट, प्रसिद्धीचाही ना खेद ना खंत!... या आणि अशाच मुशीतून घडलेला आणि आपल्याला मिळालेलं काम हे परमेश्वरावरची आपल्यावर असलेली कृपादृष्टी असं मानणारा, "बिछडे जमाने का' एक गुणी संगीतकार म्हणजे चित्रगुप्त ! शंकर-जयकिशन, नौशाद, अनिल विश्वास, ओ. पी. नय्यर यांसारख्या टॉपच्या संगीतकारांच्या पंक्तीत चित्रगुप्तचं नाव कधी आलंच नाही. मोठ्या बॅनरचे चित्रपट हे त्यावेळच्या टॉपच्या संगीतकारांकडे जायचे. मग पौराणिक, सामाजिक, लो बजेटवाले चित्रपट... त्यांना वाली हा चित्रगुप्तच! पौराणिक चित्रपटांमधे मात्र चित्रगुप्त, एस.एन.त्रिपाठी यांची मक्तेदारी कुणीच मोडू शकलं नाही. पौराणिक चित्रपट हे तसे पाहिले तर लो बजेटचे. त्यामुळे त्यांचा दर्जाही दुय्यम समजला जायचा. पण तरीही एकेकाळी अशा चित्रपटांची लाटच होती. बी ग्रेडच्या चित्रपटांचं संगीत देऊन एखादा खचून जाईल, पण चित्रगुप्तनं या चित्रपटांवर आपली अनोखी मोहोर उमटवली. आणि ती ही संगीताच्या सुवर्णयुगात, म्हणजेच एकोणीसशे पन्नासच्या दशकात! 
या माणसानं किती म्हणून गोड गाणी द्यावीत. एखाद्या बल्लवाचार्याच्या हाताला इतकी चव असते की त्याने केलेल्या सर्व पदार्थांवर खवय्यानी अक्षरशः ताव मारावा, अशी. तशीच चित्रगुप्तची गाणी. गोड, मधाळ, रसभरीत... एखाद्याला त्याची गाणी नुसती ऐकूनच डायबेटीस व्हावा अशी, इतकी ती गोड! प्रियकराला मनवणं असो, प्रियतमेची खबरबात काढणारं असो, विरह असो की मिलाप, रुसवा असो की खोड़ी... अशा कित्येक प्रकारांची गाणी या माणसानं अगदी सहजतेनं दिली. लागी छूटे ना अब तो सनम (काली टोपी लाल रुमाल), तेरी दुनिसा से दूर (जबक), मुस्कुराओ के जी नही लगता (कंगन), चॉंद जाने कहॉं खो गया (मैं चूप रहूँगी), छेडो ना मेरी जुल्फे (गंगा की लहरे), जाग दिले-ए-दिवाना (उँचे लोग), रंग दिलकी धडकन तो लाती भी होगी (पतंग), बहांरे आएंगी, होठोंपे फूल खिलेंगे (नवरात्री), दिलका दिया जला के गया (आकाशदीप), अशा कित्येक गोड चालींबरोबरच चित्रगुप्तकडं एक मास्टरपीस सिनेमा मात्र होता, भाभी! त्यातल्या "चल उड जा रे पंछी...' या गाण्यावर तर अनेक संगीतकारही फिदा झाले. सुरवातीला तलतच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड केलं. तलतच्या आवाजात हे गाणं ऐकताना, त्याची वरच्या पट्टीतली मर्यादा जाणवते कारण त्याचा आवाज मखमली, मुलायम. साहजिकच अशा टीपेच्या स्वरासाठी हा आवाज कधीच नव्हता. अर्थातच इथं हवा होता रफी! मग रफीनं हे गाणं अगदी सहजरित्या गायलं आणि त्याचं सोनंच केलं ! 
तसं पाहिलं तर रफीकडून चित्रगुप्तनं भरपूर गाणी गाऊन घेतली. म्हणतात ना एखाद्या संगीतकाराचे आणि गायकाचे सूर जुळायला लागतात. तसंच काहीसं होतं रफी-चित्रगुप्तचं. या माणसाला कुठल्याही पुरस्काराचा मोह नव्हता. रफी माझ्याकडे गातोय, हाच माझ्यासाठी मोठा पुरस्कार, असं त्याला वाटायचं. जसं मदनमोहनकडं लता गातेय, हेच त्याचं मोठं ऍवॉर्ड असं मदनमोहनला वाटायचं, तसं. हा माणूस जसा साधा तसा श्रद्धाळूही. गाण्याच्या रेकॉर्डींगला जाताना त्यांच्या पायात तुटकी वहाण असायची. एका रेकॉर्डींगच्यावेळी लतानं हे पाहिलं, तेव्हा ती चित्रगुप्तना म्हणाली, चित्रगुप्तजी ही चप्पल दुरूस्त तरी करून घ्या, नाहीतर नवी घ्या. यावर हा भला माणूस म्हणाला, मी ही चप्पल घालून रेकॉर्डींगला आलो तर माझं गाणं खुप सुंदर रेकॉर्ड होतं, हा माझा अनुभव आहे. तेव्हा लता मिश्‍कीलपणे म्हणाली, "माझ्या आवाजापेक्षा तुम्हाला या चपलांवर विश्वास आहे तर...!' 
डबल ग्रॅज्युएट असलेल्या आणि सुरवातीच्या काळात पटन्यामध्ये प्राध्यापकी केलेल्या या माणसाचं हे एक वेगळंच रूप होतं. गाण्याविषयीची ही श्रद्धा होती. या श्रद्धाळू माणसानं मनचला या चित्रपटात छोटीशी भूमिका करून स्वतः गाणंही गायलं... "भगवान तुझे मैं खत लिखता, पर तेरा पता मालूम नहीं...' 
या माणसाला भगवंताला पत्र लिहायचं होतं, पण त्याचा पत्ता त्याला ठाऊक नव्हता. आताच्या पिढीला, नवतरुणाईला, चित्रगुप्त नावाचा संगीतकारही होता... हे तरी माहिती आहे का...? 
 

Web Title: bhagwan we writes letter