
Bhalchandra Kulkarni: कोल्हापूरचा एक साधा शाळा मास्तर असा बनला मराठी फिल्म इंडस्ट्रीचा मुरब्बी अभिनेता..
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी आज आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची ‘एक्झिट’ घेतली आणि त्यांच्या स्मृतींना पुन्हा विविध माध्यमांतून उजाळा मिळाला. कलायोगी जी. कांबळे स्मृती जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा नुकताच गौरव झाला होता. आयुष्याच्या सायंकाळीही त्यांनी तितक्याच सळसळत्या उत्साहात रंगभूमीची सेवा केली.
असे गेले बालपण...
भालचंद्र कुलकर्णी यांचे सारे बालपण आळते, तारदाळ, रुकडी, हातकणंगले अशा खेड्यांत गेले. तिथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर जयसिंगपूरच्या हायस्कूलमधून ते मॅट्रिकपर्यंत पोचले. शालेय जीवनात त्यांनी छोट्या नाटकांतून कामे केली. अभिनयाचे प्राथमिक धडे त्यांना येथेच मिळाले.
पुढे बहिणीच्या गावी तासगावला त्यांनी शाळेत प्रवेश घेतला. या शाळेतील स्नेहसंमेलनात ‘मैलाचा दगड’ या नाटकात काम करण्याची व दिग्दर्शनही करण्याची संधी मिळाली. नाटकात काम करण्याचा अनुभव होता, पण दिग्दर्शनाचं काय? त्यांनी मग दत्ता खेबूडकर या नाटकातल्या दर्दी माणसाला मार्गदर्शन करण्याची विनंती केली.
दत्ता खेबूडकरांनी तीन दिवस त्यांचे नाट्यशिबिरच घेतले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला, की एखाद्या मुरब्बी दिग्दर्शकाच्या कौशल्याने त्यांनी नाटकाचा प्रयोग अविस्मरणीय करून दाखविला. त्यांच्या या पहिल्या दिग्दर्शनाच्या प्रयोगाला त्यांना उत्कृष्ट अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचंही प्रथम पारितोषिक मिळालं.
सुरू झाली चित्रपटांची कारकीर्द
दहावी झाल्यावर कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात पहिले वर्ष करून इंटरला श्री. कुलकर्णी यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेही त्यांनी स्नेहसंमेलने गाजवली आणि ‘भाई टोळ’ या नावाने त्यांची ओळख बनली.
पुढे स्वतःच्या पायावर उभं राहायचा निर्धार त्यांनी वडिलांना सांगून नोकरी करायची इच्छा व्यक्त केली. त्याच वर्षी शिक्षकांच्या मुलांना शिक्षकांच्या नोकरीत प्रथम प्राधान्य देण्याचा प्रस्ताव शिक्षण खात्यात आला होता. त्यानुसार ते अंबप येथील शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करताना त्यांनी नेटाने अभ्यास करून इंटरच्या परीक्षेत यश मिळविले.
यादरम्यान त्यांची शिक्षक असलेल्या जगदीश खेबूडकर यांच्याशी मैत्री जमली. पुढे दोघांनी नोकरी सोडली. श्री. कुलकर्णी यांनी बी.ए. व बी.एड. केले आणि प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले. पण, नाटक-सिनेमाचं वेड गप्प राहू देत नव्हते. दिग्दर्शक दत्ता माने यांनी ‘शेरास सव्वाशेर’ या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेसाठी बोलावलं आणि त्यांच्या सिनेमाची कारकीर्द सुरू झाली.
गाजलेल्या भूमिका आणि सिनेमे...
दिग्दर्शक अनंत माने यांनी श्री. कुलकर्णी यांना ‘गाडवे अण्णा’ या कानडी माणसाची भूमिका दिली. चित्रपट होता ‘एक गाव बारा भानगडी’. ही भूमिका दुय्यम होती. पण, तो प्रचंड गाजल्यामुळे लोकांच्या लक्षात राहिली.
त्यानंतर शिक्षकाची नोकरी सांभाळून त्यांनी ‘खंडोबाची आण’, ‘गणगौळण’, ‘सतीचं वाण’, ‘मुंबईचा जावई’, ‘वारणेचा वाघ’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘पाठराखीण’, ‘पिंजरा’, ‘पुढारी’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘जोतिबाचा नवस’, ‘सामना’, ‘पाहुणी’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘ईर्ष्या’, ‘कलावंतीण’, ‘लक्ष्मी’, ‘सासुरवाशीण’, ‘सुशीला’, ‘भुजंग’, ‘दैवत’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘लेक चालली सासरला’, ‘माहेरची माणसं’, ‘धूमधडाका’, ‘पळवापळवी’, ‘झेड. पी.’, ‘माहेरची साडी’, ‘येऊ का घरात’, ‘सासरचं धोतर’, ‘वाजवू का’ अशा सुमारे ३०० हून अधिक सिनेमांत त्यांनी रांगडा पाटील, सरपंच, वकील, मुलीचा अगतिक पिता, कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी, न्यायाधीश, वैद्य, शिक्षक, शाहीर, बॅंक व्यवस्थापक अशा विविध कसदार भूमिका केल्या.