'काॅलेज कॅफे'मधून दिसणार भाऊ कदमचा नवा अवतार

टीम ई सकाळ
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कॉलेज जीवनात आपल्याला आवडणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे मित्रांचा ग्रुप आणि कॉलेज कॅफे. कॉलेजच्या क्लासरूम मध्ये जेवढे घडत नाही तेवढे कॉलेजच्या कॅफेत घडत असते, खरी शाळा तर तीच असते. याच विषयवार राजेश शहाळे निर्मित आणि डॉ. राज माने दिग्दर्शित कॉलेज कॅफे नावाचा मराठी सिनेमा येत्या ११ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

मुंबई : कॉलेज जीवनात आपल्याला आवडणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे मित्रांचा ग्रुप आणि कॉलेज कॅफे. कॉलेजच्या क्लासरूम मध्ये जेवढे घडत नाही तेवढे कॉलेजच्या कॅफेत घडत असते, खरी शाळा तर तीच असते. याच विषयवार राजेश शहाळे निर्मित आणि डॉ. राज माने दिग्दर्शित कॉलेज कॅफे नावाचा मराठी सिनेमा येत्या ११ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

अक्षय केळकर, भाविका निकम, अॅड.प्रशांत भेलांडे, आसावरी तारे, अनुष्का निकम, डॉ.छाया माने, जयवंत भालेकर आणि भाऊ कदम यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाला अरविंद हसबनीस यांचे संगीत आहे. दिग्दर्शक डॉ. राज माने सिनेमाबद्दल सांगतात कि, आपल्या सर्वांच्या आयुष्यात सर्वात मोठा भाग हा आपल्या कॉलेज जीवनाचा असतो. परंतु कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरात आपण अधिक रमतो. कारण तिथे आपल्याला नवनवीन मित्र, मैत्रिणी भेटतात. त्यांच्यासोबत नवनवीन गोष्टी समजतात.

अनेकांची मनं देखील इथेच जुळतात आणि काहींची तुटतात देखील. परंतु कॉलेज कॅफे या सिनेमात कॅफेमधील सर्व गोष्टी दाखवल्या आहेत. मित्रांच्या गप्पा, जुळणारी प्रेम प्रकरणे, रॅगिंगचे प्लानिंग असं सर्व काही. विजय (अक्षय केळकर) आणि इच्छा (भाविका निकम) यांची गोष्ट कॉलेज कॅफेमध्ये आहे. विजय एक हुशार मुलगा आहे. जो रॅगिंगला विरोध करत असतो आणि त्याच दरम्यान जॉनी नावाच्या एका गुंड प्रवृत्तीच्या मुलाशी विजयचा सामना होतो आणि कथानक पुढे जाते. या सर्व ठिकाणी कॉलेज कॅफेचा साक्षीदार म्हणून नेहमी उपस्थित असणारा कॅफेचा वेटर अर्थात भाऊ कदम.

अक्षय केळकर सिनेमाविषयी सांगतो कि. तसा हा माझा तिसरा मराठी सिनेमा आहे, परंतु प्रमुख नायक म्हणून पहिलाच आहे. खूप छान अनुभव होता सिनेमात काम करण्याचा. सर्व शुटींग अमरावती भागात झाले आहे कारण आमचे निर्माते राजेश शहाळे हे अमरावतीचे आहेत. खरंतर मी देखील पहिल्यांदाच अमरावतीला गेलो होतो. सिनेमात विजयची भूमिका करतांना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आम्ही पण खुप मज्जा केली होती. या सिनेमाचे काही कथानक कॉलेजमध्ये घडते तर काही विजयच्या वेगळ्या पार्श्वभूमीवर घडते, म्हणजे विजयची पण एक छोटीशी स्वतंत्र गोष्ट आहे, ती काय आहे यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या भाविकाचा नायिका म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. ती सांगते कि माझ्यासाठी हे खरोखर आव्हानात्मक काम होतं कारण मी अजून शाळेत शिकते आणि सिनेमात मला कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी साकारायची होती पण दिग्दर्शक डॉ. राज माने यांच्या सहकार्यामुळे मी माझी भूमिका छान करू शकले आहे, तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

Web Title: bhau kadam new movie collge cafe