सुशांतच्या स्मरणार्थ भूमि पेडणेकर करणार अन्नदान! एक साथ संस्थेतर्फे करणार मदत

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

सुशांतच्या वस्तूंचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेतला असताना आता अभिनेत्री भूमि पेडणेकरने सुशांतच्या आठवणीत काही गरजू कुटुंबांना
जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई ः ऐन उमेदीच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या ३४व्या वर्षी आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना बसलेल्या प्रचंड धक्क्यातून सगळेच हळू हळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्याच्या स्मरणार्थ त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पाटणा येथील घरी सुशांतच्या वस्तूंचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेतला असताना आता अभिनेत्री भूमि पेडणेकरने सुशांतच्या आठवणीत काही गरजू कुटुंबांना
जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच भूमिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ५५० जणांना जेवण उपलब्ध करुन देणार असल्याचं म्हटलं आहे. सुशांत एक चांगला मित्र होता. त्यामुळेच त्याच्यासाठी मी कार्य करणार असल्याचं तिने म्हटलं आहे.

वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

"माझा मित्र सुशांतच्या आठवणीत मी 'एक साथ' या फाऊंडेशनच्या माध्यमातून ५५० गरीब कुटुंबांमध्ये अन्नदान करण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना या काळात मदतीची आणि प्रेमाची गरज आहे अशांसाठी काही तरी करुयात", असं भूमिने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वी सुशांतचा मित्र बॉलिवूड दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि त्याची पत्नी प्रज्ञा कपूर यांनी देखील सुशांतच्या नावाने ३ हजार ४०० कुटुंबांमध्ये अन्नवाटप केलं होतं. प्रज्ञाच्या 'एक साथ' या संस्थेअंतर्गत त्यांनी ही मदत केली होती आणि त्याच संस्थेअंतर्गत भूमिदेखील गरजुंमध्ये अन्नदान करणार आहे. सुशांत आणि भूमि एकमेकांचे चांगले मित्र होते. 'सोन चिडिया' या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhoomi Pednekar will donate food in memory of Sushant!