नथुरामच्या भूमिकेने अजरामर केले : शरद पोंक्षे (भूमिका : शरद पोंक्षे)

शरद पोंक्षे
शरद पोंक्षे

मी माझे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होताच अभिनय क्षेत्रात प्रवेश करायचे ठरवले होते. त्यासाठी मी मुंबईच्या ड्रामा स्कूलमध्ये प्रवेशही घेतला.

एका नाट्यसंस्थेचा भाग झालो आणि हळूहळू शिकता शिकता "वरून सगळे सारखे' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकाने माझे अभिनय क्षेत्रासाठीचे दार खुले केले. त्यानंतर लोकांच्या लक्षात राहील अशी माझी पहिली मालिका "दामिनी'. मी या मालिकेत उदय कारखानीस या पत्रकाराची भूमिका जवळ जवळ चौदाशे भागात केली. लोकांपर्यंत एखाद्या कलाकाराला पोहोचावं लागतं त्यासाठी या मालिकेची मला खूपच मदत झाली. दामिनी संपल्यानंतर 25 वर्षांनंतरची उत्तर दामिनीची कथा चालू झाली तेव्हा उदय कारखानीस हे एकमेव पात्र कायम होतं. या भूमिकेसाठी फार अशी काही मेहनत करावी लागली नाही. उदय कारखानीस हा सरळ, सज्जन माणूस होता. कोणतीही भूमिका करताना लेखकाने जे संवाद आणि सीन लिहीलेले असतात त्याची खूप मदत मिळते. या भूमिकेसाठी पत्रकार कसे बोलत असतील, त्यांचे व्यक्तिमत्व कसे बिनधास्त असते. ते घाबरत नाहीत. त्यात रोहिणी निनावेचे लेखन होते. त्यामुळे ही भूमिका लोकांसमोर सादर करणे मला खूप सोपे गेले. लोकांना सगळीच पात्रे खूप आवडत होती. टीव्हीवरील दैनंदिन अशी ही पहिलीच मालिका होती आणि या
मालिकेमुळे मी एक अभिनेता म्हणून लोकांसमोर आलो.

पण मला खऱ्या अर्थाने अजरामर आणि अभिनेता म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणारी भूमिका म्हणजे नथुराम गोडसेची. "मी नथुराम गोडसे बोलतोय..' या नाटकातील नथुराम गोडसेची
भूमिका मला साकारायला दिल्याबद्दल मी विनय आपटे यांचा जन्मभर आभारी राहीन. कारण माझ्यासारख्या छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या नटावर विश्‍वास दाखवून मला ही भूमिका त्यांनी साकारायला दिली. हे नाटक "हे राम....नथुराम' या नावाने मी आता पुन्हा नव्याने लिहीले आणि दिग्दर्शितही केले. कारण मला नथुरामची भूमिका करताना त्याला हिरो बनवले होते ते कुठेतरी खटकत होते. आता तसे नाहीये आता नथुराम हा एक गुन्हेगार म्हणूनच लोकांसमोर सादर केला जातो. आता हे नाटक जास्त वास्तववादी वाटतं. नाटकाचं नेपथ्यही पूर्ण बदलले गेले आहे. या नाटकाने माझी लोकांमध्ये अशीच प्रतिमा झाली होती की हा अशाच प्रकारच्या भूमिका करतो.

पण त्याला लगेचच छेद देणारा "वादळवाट'या मालिकेतील देवराम खंडागळे आला. ही अगदी विरूद्ध भूमिका होती. ह्या भूमिकेसाठी मला "झी मराठीचा' सलग तीन वर्ष उत्कृष्ट
खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. पण त्यानंतर खलनायकाचाच शिक्का बसला. आपल्याकडे लगेच शिक्के मारले जातात. "दामिनी' करत होतो तेव्हा सरळ सज्जन माणसाची भूमिका
केल्यामुळे देवराम खंडागळे मी करू शकणार नाही म्हणून माझ्या वादळवाटसाठीच्या कास्टिंगसाठी नकार देत होते. त्यावेळी "वादळवाट'चा दिग्दर्शक संगीत कुलकर्णीने माझ्यावर विश्‍वास दाखविला आणि म्हणाला, "देवरामची भूमिका ही शरदच करेल'. खरं तर देवराम खंडागळेची भूमिका अतिशय सोफेस्टिकेटेड अशी लिहिलेली होती. शुद्ध मराठी भाषेत तो बोलणारा होता. 60- 70 भागांनंतर माझी एन्ट्री होती. तोपर्यंत मालिका हिट झाली होती. त्यातील चौधरी कुटुंब सगळ्यांना आवडत होतं. असं असताना एका पात्राची नवीन एन्ट्री होते आणि ते पात्र सगळ्यांना हेवी होतं हे सगळ्यांनाच कुठेतरी खटकत होतं. सगळ्यांनाच त्याचा त्रास झाला. महिन्यातून दोनच दिवस हा शूटिंग करतो पण प्रत्येत भागाला लोक याची वाट बघत असतात, हे सहकलाकारांना पटत नव्हतं. जेव्हा मी पहिल्या दिवशी शूटिंगसाठी गेलो तेव्हा मला असं वाटलं की,या मालिकेतील सगळीच पात्रे फार सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत
आणि हा खलनायकही तसाच दाखवला तर काही मजा येणार नाही. मग मी पूर्ण भाषा बदलली आणि सांगली, साताऱ्याकडची भाषा वापरली. काही गावठी शिव्या द्यायलाही सुरूवात
केली. वेशभूषा, रंगभूषा बदलली. चालताना फेंगडा चालायला लागलो. मिशा बदलल्या, भुवया वेड्यावाकड्या केल्या. वेशभूषा नेत्याचीच असल्याने त्यातून काहीच सपोर्ट मिळणार नव्हता. पण एवढं सगळं करूनही काही तरी मिसिंग आहे असं वाटत होतं. सेटवर गेल्यावर मला तिथे एका महाराजांचा फोटो दिसला आणि त्यांनी जसं गंध लावलेलं तसं उभी एक गंधाची रेषा काढली. त्यातसुद्धा काही तरी विचित्रपणा म्हणून आपण नेहमी उजव्या हाताने ओवाळतो आणि डाव्या हाताने घंटा वाजवतो. मी उजव्या हाताने घंटा ओवाळल्यासारखी फिरवायचो आणि डाव्या हातात आरती असायची. असे ते देवरामचे पात्र उभे राहिले. ही देवरामची भूमिका उभारायचं संपूर्ण श्रेय हे माझं आहे असं मी अभिमानाने सांगेन. ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की माझे आणि निर्मात्यांचे वादविवाद झाले. लेखकाचं आणि माझं पटेना. त्यामुळे माझा रोल संपविण्यात आला. पण माझा रोल संपविण्यात आल्यानंतर
मालिकेचा टीआरपी इतका खाली गेला की त्यांना देवराम खंडागळेला परत जिवंत करावं लागलं. मग खलनायक तर खलनायक म्हणूनच मला भूमिका मिळत गेल्या. कुंकू मालिकेतील परशुराम असेल किंवा कोणीही असेल.

पण लोकांचा हा शिक्का पुसणारी भूमिका म्हणजे "अग्निहोत्र'मधला महादेव. ही भूमिका करताना फारच मजा आली. तेव्हा मी खूप व्यग्र होतो. माझं नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक,
कुंकु आणि भैरोबा या दोन मालिका चालू होत्या आणि हे सगळं करताना ही मालिका शरद कसा करणार अशी शंका सगळ्यांनाच होती. पण दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्‍वास टाकला
आणि एखादी भूमिका जर कलाकाराला आवडली तर तो कशीही ऍडजस्टमेंट करायला तयार होतो. शरद पोंक्षे जसा आहे त्याच्या बरोबर विरूद्ध ही भूमिका होती. मी फार आक्रमक
आणि वर्चस्व गाजवणारा आहे आणि महादेव हा खूपच घाबरट की विजेचा आवाज आला तरी घाबरतो आणि अख्ख्या वाड्यात एकटाच राहतो, मळके कपडे घालतो, पूर्ण जगात वीज आली पण त्याच्या वाड्यात त्याला विजेची गरज भासत नाही. तो अंधार झाला की झोपतो. त्याला टेलिफोनची गरज भासत नाही. कुत्र्याच्या आवाजालाही तो घाबरतो. असा सरळ, साधा, बाहेरील जगाशी फार संबंध नसलेला असं ते पात्र होतं. मी कोकणातून आल्यामुळे मी अशी माणसं बघितलेली आहेत. त्यामुळे त्याचा खूप मला उपयोग झाला. एकटा असल्यामुळे माणूस हळू बोलत नाही किंबहुना हळू बोलणं त्याला माहितीच नाही. एकटा असल्यामुळे कोण बघतंय! अशी एक भावना म्हणून व्यवस्थित कपडे घालावे हेदेखील त्याला माहीत नाही. हे सगळं मी बघितल्याने त्याचा माझा अभ्यास होता. भूमिका वाचताना त्याचे वेगवेगळे रंग कळत जातात. त्यामुळे मला ही भूमिका साकारायला खूप मदत झाली. अशा विविधरंगी वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका मी केल्या.

त्यानंतर अगदी अलिकडेच अश्‍विनी एकबोटेबरोबर केलेल्या "त्या तिघांची गोष्ट' या नाटकातील भूमिकाही फार आवडली होती. नाटकाच्या तीस मिनिटांनंतर माझी स्टेजवर येतो. त्या आधी माझ्या चारित्र्याविषयी लोकांचे मन आधीच दूषित केलेले असते. त्या नाटकात मी एका बापाची भूमिका करतो आहे. पण माझी एन्ट्री झाल्यानंतर कसे लोकांमध्ये त्याच्याविषयीचे मत बदलत जाते हे पहायला खूप मजा येते, असे प्रेक्षकांनी मला येऊन सांगितले आहे. "एका क्षणात' या नाटकातील भूमिकाही अतिशय मस्त होती. बॉम्बस्फोटामुळे डोक्‍यावर परिणाम झालेला माणूस त्याच्या बायकोला बहीण समजायला लागतो आणि तिचंही लग्न लावायला निघतो हे ऐकून पण अंगावर काटा येतो. हे नाटक मी दिग्दर्शित केलं होतं. त्यानंतर "हे राम... नथुराम' मी दिग्दर्शित करत आहे. मग "दामिनी' मधला अगदीच सरळ साधा उदय कारखानिस, "वादळवाट'मधला बेरक्‍या देवराम खंडागळे, नथुराम गोडसे सारखा अतिशय वेगळाच असा माणूस ज्याने महात्मा गांधी यांची हत्या केली आणि हसत हसत फासावर गेला, "अग्निहोत्र'मधला अगदीच साधाभोळा, गावंढळ, अडाणी असा महादेव, "मोकळा श्‍वास' मधला गरीबीला त्रासलेला आणि त्यातून मुलगी झाली म्हणून दुःख व्यक्त करणारा बाप आणि त्याच्या अगदी विरूद्ध मुलीवर जीवापाड प्रेम करणारा आणि आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणारा "असे हे कन्यादान' या मालिकेतील बाप. अशा विविध भूमिका मला करायला मिळाल्या.

कलाकाराने आपले कान, डोळे नेहमीच उघडे ठेवणे खूप गरजेचं आहे. आपण जे बघतो आणि ऐकतो त्या सगळ्याचा वापर आपण भूमिका साकारताना करत असतो, ओरिजनल असं
काहीच नसतं. सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायची, त्या गोष्टी साठवायची सवय लागते आणि मग ते नकळत घडत जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com