"ब्ल्यू जीन्स ब्लूज' प्रदर्शनाच्या वाटेवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा सिनेमा 
मुंबई : दिवंगत अभिनेत्री अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा चित्रपट "ब्ल्यू जीन्स ब्लूज' लवकरच झळकणार आहे. त्यांची या चित्रपटातील व्यक्तिरेखा सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. 

अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा सिनेमा 
मुंबई : दिवंगत अभिनेत्री अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा चित्रपट "ब्ल्यू जीन्स ब्लूज' लवकरच झळकणार आहे. त्यांची या चित्रपटातील व्यक्तिरेखा सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. 
आजच्या टेक्‍नोसॅव्ही जगात तरुणाई गतिमान झाली आहे. वाढत्या अपेक्षा आणि आशांना तत्काळ गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगणारी ही तरुणाई तितक्‍याच वेगाने नैराश्‍यातही जाऊ शकते. नातेसंबंधांतून आलेल्या नैराश्‍यातून तरुणवर्ग वैफल्यग्रस्त होत असल्याचे आजचे चित्र आहे. अशाच एका वैफल्यग्रस्त तरुणाची कथा "ब्ल्यू जीन्स्‌ ब्लूज' या चित्रपटात आहे. डॉ. नितीन महाजन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तरुणाईच्या मानसिकतेचा वेध घेतो. 
डॉ. महाजन यांनीच या चित्रपटाचे लेखन केले आहे. निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे. ते म्हणाले, "मानवी जीवनातील चढ-उतार या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मनाविरुद्ध काही गोष्टी घडू लागल्या की आपण दुखावतो. मनाचे हे दुखणे शारीरिक दुखण्यापेक्षा अधिक गंभीर असू शकते, कारण त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर पडतो. अशावेळी समुपदेशकांच्या मदतीने नैराश्‍यावर मात करता येते.' 
या चित्रपटात राज ठाकूर, श्‍वेता बीस्ट, डॉ. संजीवकुमार पाटील, राधिका देशमुख यांनीही काम केले आहे. या चित्रपटाने विविध आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय चित्रपट महोत्सवांमध्ये रसिकांची दाद मिळवली आहे. गेल्या वर्षी मेक्‍सिकोत झालेल्या सिने पोर्ब फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला बेस्ट सेल्फ फंडेडचा मिळाला होता. तसेच बार्सेलोना प्लेनेट, मियामी, लॉस एंजेलीस सिनेफेस्ट यांसारख्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला होता. 

Web Title: blue jeans blues movie on ashvini ekbote