esakal | ऑस्करच्या सोहळ्यात इरफानच्या 'आठवणींना' उजाळा

बोलून बातमी शोधा

bollywood actor irrfan khan
ऑस्करच्या सोहळ्यात इरफानच्या 'आठवणींना' उजाळा
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - जगभरातील सर्व चित्रपट रसिकांना ऑस्करचे वेध लागले असतात. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान हा पुरस्कार सोहळा पार पडला. नेहमीप्रमाणे कोट्यवधी प्रेक्षकांनी हा पुरस्कार सोहळ्याचा आनंद घेतला. यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट गंभीर असल्यानं ऑस्करचा सोहळा कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. या शो चे खास वैशिष्ट्य म्हणजे ऑस्कर सोहळ्यात गेल्या वर्षी निधन झालेल्या अनेक मान्यवरांना श्रध्दांजली देण्यात आली. त्यात बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता इरफान खानच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

93 वा अॅकडमी अॅवॉ़र्ड हा भारतीय प्रेक्षकांसाठी अर्थपूर्ण असा होता. ऑस्कर सोहळ्यातील मेमोरियम सेंग्मेंट मध्ये दिवंगत अभिनेता इरफान खानला श्रध्दांजली वाहण्यात आली होती. त्याच्याशिवाय अनेक कलाकारांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. इरफान खाननं लाइफ ऑफ पाय, ज्युरासिक वर्ल्ड, इनफर्नो सारख्या चित्रपटात काम केले होते. त्याच्या त्या अभिनयाला सर्वांकडून पसंती मिळाली होती. यामुळे इरफानची लोकप्रियता कमालीची वाढली होती. इरफान खान हा असा अभिनेता होता की त्याच्या अभिनयाची ख्याती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पसरली होती. मानवतेच्या अनेक मुल्यांना आपल्या दैनंदिन आयुष्यात स्थान देणा-या अभिनेत्यांपैकी इरफानचा उल्लेख करावा लागेल.

संवेदनशील अभिनेता म्हणूनही त्याचे नाव घेता येईल. 2014 मध्ये त्यानं आयफा मध्ये आपलं सुंदर मनोगत व्यक्त केलं होतं. त्यावेळी त्यानं आपल्या परिवाराविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यात इरफान असं म्हणाला होता की, जोखीम घेणं म्हणजे काय असतं, माझ्यासाठी जोखीम घेणं म्हणजे काय, स्वप्न पाहणं म्हणजे काय, त्यावर माझा पूर्ण विश्वास होता. मी अशा फॅमिली मधून आलो होतो की त्यात आमच्या अख्ख्या परिवारात कुणी चित्रपट व्यवसायात काम केलं नव्हतं. मात्र काहीही झालं तरी आपल्याला एक चांगला अभिनेता व्हायचं हे मनाशी ठरवलं होतं.

पदवीधर शिक्षण झाल्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनी असं सांगितलं होतं की, थिएटर कर पण एखादी नोकरीही कर. मात्र मी काही त्यांचे ऐकले नाही. मला फक्त माझे स्वप्न दिसत होते. आणि मी माझ्या स्वप्नांना गवसणी घातली होती. आयुष्यात असे काही प्रसंग येतात की तेव्हा आपल्या दोन पावलं मागे यावे लागते. मात्र त्यासाठी नेहमी तयार असायला हवे असे मला वाटते.