रोमँटिक चित्रपट माझी पहिली पसंती - कियारा अडवानी

कबीर सिंह, इंदू की जवानी, शेरशाह आदी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री कियारा अडवानी आता दिग्दर्शक अनीस बझ्मी यांच्या भुलभुलैया २ या चित्रपटात (Bollywood Actress) काम करीत आहे.
Kiara Advani News
Kiara Advani News esakal

Bollywood Movie: कबीर सिंह, इंदू की जवानी, शेरशाह आदी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री कियारा अडवानी आता दिग्दर्शक अनीस बझ्मी यांच्या भुलभुलैया २ या चित्रपटात (Bollywood Actress) काम करीत आहे. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या भुलभुलैया या चित्रपटाचा हा (Kiara Advani) सिक्वेल आहे. कियारा पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी चित्रपट करीत आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत...

* या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काॅमेडीची झलक दिसत आहे. त्याचबरोबर रोमान्स आणि मंजुलिकाचा राग उफाळून आल्याचेही पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी चांगली पसंती ट्रेलरला दिली आहे. याबद्दल तू काय सांगशील...

- आम्ही मनोरंजनात्मक चित्रपट बनविला आहे. सगळ्यांनी कठोर मेहनत घेतली आहे. सगळ्यांच्या व्यक्तिरेखा मजेशीर आहेत. रोमान्स आणि हाॅररबरोबरच विनोदाचा उत्तम तडका देण्यात आला आहे. आता मंजुलिका नेमके काय रहस्य उलगडणार आहे याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. खरं सांगायचं तर मला हाॅरर चित्रपटांची खूप भीती वाटते. या जाॅनरचे चित्रपट मी सहसा पाहात नाही. रोहित शेट्टीची गोलमाल रिटर्न हा चित्रपट मी पाहिलेला आहे. तो हाॅरर काॅमेडी होता आणि असे हाॅरर काॅमेडी असलेले चित्रपट करायला मला मजा येते. आमचा हा चित्रपट हाॅरर आणि काॅमेडी यांचा उत्तम संगम आहे.

* कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक अनीस बझ्मी यांच्याबरोबर तू पहिल्यांदा काम करीत आहे. कार्तिक एक अभिनेता म्हणून कसा आहे...त्याची अॅक्टिंगची स्टाईल कशी आहे तसेच दिग्दर्शक अनीस बझ्मी यांच्या कामाची पद्धत कशी आहे याचा तू काम करण्यापूर्वी विचार केला असणारच ना किंवा त्यांच्या कामाच्या शैलीबाबत थोडा फार अभ्यास तू केला असशीलच ना....

-हो... नक्कीच. अनीस बझ्मी हे एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहेत. प्यार तो होना ही था असे सुरुवातीचे त्यांचे काही चित्रपट पाहूनच लहानाची मोठी झाली आहे.

-त्यांनी आतापर्यंत सिंग इज किंग, वेलकम असे कित्येक यशस्वी चित्रपट दिलेले आहेत. माझ्या मते ते काॅमेडीचे किंग आहेत. त्याच्या चित्रपटात काम करणे ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या चित्रपटात काॅमेडी, अॅक्शन व रोमान्स यांचे उत्तम मिश्रण असते. ते एक चित्रपटसृष्टीतील उत्तम दिग्दर्शक आहेत. कार्तिक आणि मी आम्ही समवयस्क आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये खूप थट्टामस्करी आणि विनोद सतत होत असतात. कामदेखील अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडते. कार्तिकला मी त्याच्या पहिल्या प्यार का पंचनामा या चित्रपटापासून ओळखत आहे. त्यानंतर एखाद्या कार्यक्रमात किंवा कुणाच्या तरी कार्यालयात आम्ही भेटलेलो आहोत. आम्ही दोघांनीही खूप स्ट्रगल केला आहे. यशासाठी आम्ही खूप धडपडलो आहोत. आम्ही मेहनत खूप घेतली आहे आणि आताही तेवढीच मेहनत घेत आहोत.

* आता कार्तिकला आणि तुलाही स्टारडम प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता तुझ्यात कशा प्रकारचा बदल झाला आहे आणि जबाबदारी किती वाढलेली आहे...असे तुला वाटते.

- मला वाटत नाही की माझ्या वागण्यात किंवा बोलण्यात काही बदल झाला आहे. परंतु एक गोष्ट निश्चित की स्टारडम मिळण्यापूर्वी असे चित्रपट केले पाहिजेत तसे चित्रपट केले पाहिजेत असे मनात सतत वाटत असते. म्हणजे आपण स्वतःच्याच मनात चित्रपटाचा विचार करीत असतो. परंतु एकदा का स्टारडम मिळाले की प्रेक्षकांच्या मनाचादेखील विचार करावा लागतो. कारण त्यांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या असतात. ही आता नवीन काय करणार आहे...तिचा चित्रपट कसा असणार आहे याचा विचार ते करीत असतात. आपल्या चित्रपटाकडे आणि त्यातील भूमिकेबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता असते. त्याबाबतीत खूप विचार करावा लागतो आणि चित्रपट स्वीकारावा लागतो. कारण आपल्या कामातून त्यांना आनंद दिला पाहिजे ही खूप मोठी जबाबदारी असते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनादेखील अभिमान वाटला पहिजे असे काम केले पाहिजे.

* हॉरर कॉमेडी जॉनर तू पहिल्यांदा करीत आहेस. या भूमिकेमध्ये तुला काय नावीन्य वाटले...

- मुळात पंधरा वर्षांनी भुलभुलैयाचा सिक्वेल येत आहे. तो चित्रपट यशस्वी ठरला होता आणि आता सिक्वेललादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. या चित्रपटाची कथा नवीन आहे. संपूर्ण चित्रपट मनोरंजन करणारा आहे. ट्रेलरमध्ये थोडीशी झलक सगळ्यांना दिसली आहे. एका आलिशान हवेलीत घडणारी कथा आहे. या चित्रपटाची कहाणी मजेशीर आहे. परंतु सगळ्याच बाबी आताच स्पष्ट करता येणार नाहीत. हाॅरर काॅमेडी जाॅनर मी पहिल्यांदाच करीत असले तरी मला काम करायला मनापासून आवडते ते रोमँटिक चित्रपटांमध्ये.

* आताच तू सांगितले आहेस की कहाणी मजेशीर आहे. परंतु अशा चित्रपटांकरिता बॅकग्राऊंड म्युझिकदेखील तितकेच महत्त्वाचे असते असे तुला वाटत नाही का....

- बॅकग्राऊंड म्युझिकबरोबरच कॅमेरा वर्कदेखील तितकेच महत्त्वाचे आहे असे मला वाटते. कोणताही हॉरर चित्रपट आवाज बंद करून आपण पाहू शकत नाही. त्यामध्ये ती मजा येणारच नाही. त्यामुळे हॉरर चित्रपटाला सगळ्यात महत्त्वाच्या या दोन बाबी आहेत.

* सध्या साऊथचे चित्रपट एकापाठोपाठ एक सुपरहिट होत आहेत. हिंदी चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शकांनी आता कोणत्या प्रकारचे चित्रपट बनविले पाहिजेत असे तुला वाटते...

- चित्रपटाच्या यशस्वितेचा फॉर्म्युला आतापर्यंत कुणीही शोधून काढलेला नाही. कोणता चित्रपट हिट होईल आणि कोणता होणार नाही हे कुणीही सांगू शकत नाही. आपण केवळ मनापासून काम केले पाहिजे आणि त्याकरिता प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. चित्रपटाला यश देणे किंवा न देणे हे मायबाप प्रेक्षकांवर अवलंबून आहे.

* सध्या हिंदीबरोबरच तमीळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये चित्रपट बनू लागलेले आहेत. त्याचे नेमके कारण काय असावे...

-आपला देश विविध भाषा आणि संस्कृतीने नटलेला आहे. प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत चित्रपट त्या त्या भाषेत पोहोचावा याकरिता हा चांगला प्रयत्न होत आहे. आता मी दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांचा चित्रपट करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com