‘द फॅमिली मॅन’ मनोज वाजपेयी एकेकाळी करणार होता आत्महत्या!

टीम ईसकाळ
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

द फॅमिली मॅन विषयी काही ना काही तरी चर्चा सुरू असताना दिसत आहे. या वेब सीरिजीच्या निमित्तानं मनोज वाजपेयी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलाय. भारतीय सिनेमातील या गुणी अभिनेत्यानं करिअरमध्ये अनेक चढ उतार पाहिले आहेत. मधल्या काळात तो सिनेमांपासून दूर होता. हातात काम नव्हतं. पण, त्यानं जिद्द सोडली नाही.

मुंबई : सध्या द फॅमिली मॅन या वेब सीरिजची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडिया असेल किंवा ऑफिस, कॅन्टिन, चहाच्या टपऱ्या, प्रत्येक ठिकाणी द फॅमिली मॅन विषयी काही ना काही तरी चर्चा सुरू असताना दिसत आहे. या वेब सीरिजीच्या निमित्तानं मनोज वाजपेयी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलाय. भारतीय सिनेमातील या गुणी अभिनेत्यानं करिअरमध्ये अनेक चढ उतार पाहिले आहेत. मधल्या काळात तो सिनेमांपासून दूर होता. हातात काम नव्हतं. पण, त्यानं जिद्द सोडली नाही. आज, यशाच्या शिखरावर असला तरी, एकेकाळी मनोज वाजपेयी अपयशानं खचून गेला होता आणि त्यानं आत्महत्येचाही विचार केला होता. 

कोणी दिला ब्रेक?
सिनेमा, नाटक, अभिनय या क्षेत्राची कोणतिही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, मनोज वाजपेयीनं इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. इथं पाय रोवणं त्याच्यासाठी खूपच अवघड होतं. त्याला पहिली भूमिका शेखर कपूर यांच्या बँडेट क्वीन सिनेमात मिळाली होती. डाकूंच्या टोळीतील एका, डाकू साकारलेल्या मनोजसाठी त्यावेळी ती गोष्ट खूप महत्त्वाची होती. बँडेट क्वीनचा कास्टिंग डायरेक्टर तिग्मान्शू धुलिया यानं मनोजचं नाव, शेखर कपूर यांना सुचवलं होतं. त्याचवेळी मनोज दूरदर्शनवर कलाकार नावाची सीरिअल करत होता. महेश भट्ट यांच्या दूरदर्शनवरील स्वाभिमान सीरिअलमध्ये मनोज त्यावेळी काम करत होता. 

भिकू म्हात्रेने दिली ओळख
रामगोपाल वर्माच्या सत्या सिनेमातील भिकू म्हात्रे या कॅरेक्टरने मनोजला बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करून दिली. सत्या सिनेमाला आज, 21 वर्षे होऊन गेली. पण, त्या सिनेमातील हिरो सत्यापेक्षा आजही लोकांना भिकू म्हात्रेच लक्षात राहिलाय. सत्याच्या आधी रामगोपाल वर्मानं दौड सिनेमात मनोज वाजपेयीला एक छोटी भूमिका दिली होती. त्याचवेळी त्याला पुढच्या सिनेमात मोठा रोल देण्याचं आश्वासनही रामगोपाल वर्मानं दिलं होतं. अर्थात त्यानं ते पाळलं आणि मनोज वाजपेयी स्टार झाला. 

Image result for bhiku mhatre

मनोज होता नैराश्येत
बिहारमधील पश्चिम चंपारनमधील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या मनोजचं कॉलेजचं शिक्षण दिल्लीत झालं. अभिनयाकडं कल असलेल्या मनोजला त्यावेळी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची माहिती मिळाली होती. त्यानं एडमिशनसाठी चार वेळा प्रयत्न केला. पण, त्याला अपयश आलं. त्यामुळं त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण, त्याकाळात ज्येष्ठ अभिनेते रघूवीर यादव यांच्याशी त्याची भेट झाली होती. त्यांनी अभिनयाचं एक वर्कशॉप करायला सांगितलं होतं. त्यानंतर मनोज थोडा सावरला आणि त्याने सीरिअल आणि सिनेमात काम मिळवण्यासाठी धडपडायला सुरुवात केली. 

Image result for manoj bajpayee sad

अनुराग कश्यपनं दिला धीर
मधल्या काळात मनोजच्या हातात फारशी कामं नव्हती. जी मिळाली त्यातून समाधान मिळालं नाही. वेदम या तेलुगू सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मनोजच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळं तो जवळापास दोन वर्षे पडद्यापासून बाजूला होता. त्यामुळं चिंतेत असलेल्या मनोजला दिग्दर्शक अनुराग कश्यपनं धीर दिला. त्याला संयम ठेवायला सांगून गँगज् ऑफ वासेपूरमध्ये सरदार खानची महत्त्वाची भूमिका दिली. त्या आधी राजनीतीमधली मनोजची भूमिका थोडी फार लक्षात राहिली होती. त्याचा करारा जबाव मिलेगा डायलॉग गाजला होता. पण, गँग्ज ऑफ वासेपूरनंतर स्पेशल 26, नाम शबाना, शूट आऊट एट वडाळा, अलिगड, बागी टू, अय्यारी या सिनेमांनी मनोज वाजपेयीला इंडस्ट्रित पुन्हा लाईनवर आणलं. आता दी फॅमिली मॅन सीरिजनं मनोज वाजपेयी पुन्हा एकदा वरच्या रांगेत आलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood the family man web series manoj bajpai career ups and downs