ओम पुरींवर बॉलिवूड अभिनेत्यांची शब्दसुमने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडमधील त्यांच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
 
सेलिब्रिटींनी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया- 

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडमधील त्यांच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
 
सेलिब्रिटींनी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया- 
ओमचं आकस्मिक निधन खूपच धक्कादायक आहे. चित्रपटसृष्टीबरोबर नाट्यसृष्टीत देखील आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारा ओम एक महत्त्वाचा अभिनेता होता.अतिशय संवेदनशील आणि एक उत्कृष्ट दर्जाचा दमदार नट, ही त्याची मला झालेली पहिली ओळख. पुढे आमची मैत्री आणि एकमेकांबद्दलचा आदर फुलत गेला. ओमचं कर्तृत्त्व शब्दशः अफाट असंच होतं. भारतीय चित्रपट सृष्टीवर त्याने आपला आगळावेगळा ठसा उमटवलेला आहे. त्याच्या अनेक आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. आम्ही खूप वेळा भेटायचो असं नाही, पण मैत्रीचा ओलावा मात्र किंचितही कमी नसायचा. आपला एक अतिशय जवळचा सहकारी गेल्याचं दुःख आज मला होत आहे. 

-अमोल पालेकर (अभिनेते व दिग्दर्शक)

ओम पुरीच्या रूपात आज देशातला एक थोर कलावंत आपण गमावलेला आहे. त्याच्या निधनाने आपल्या चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान झालंय, असं मी म्हणेन. व्यक्तिशः मी तर माझा एक अतिशय जिवलग असा जवळचा मित्रच गमावल्याचं दुःख अनुभवतेय. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग येऊनही त्याने स्वतःच्या परिश्रमांतून आणि गुणवत्तेतून झोकून देऊन आपलं आयुष्य घडवलं होतं. गो. पु. देशपांडेंच्या "उध्वस्त धर्मशाळा'चा त्याने हिंदीत साकारलेला प्रयोग आजही अनेकांच्या स्मरणात कायम आहे, यातच या अभिनेत्याचं मोठेपण असल्याचं जाणवून येईल. एक उत्तम कलावंत असण्यासोबतच ओम हा एक संवेदनशील आणि उत्तम माणूस होता. त्याने साकारलेल्या विविध उत्तमोत्तम भूमिका आपल्याला नेहमीच आठवत राहतील यात शंका नाही. त्याला माझा मनापासून सलाम ! 
-ज्योती सुभाष (अभिनेत्री) 

ओम प्रतिभावान नट होता. एवढ्या प्रतिभेचा अभिनेता विरळाच. आपला आवाज आणि आपली देहबोली यांच्या बळावर आणि अत्युच्च अभिनय गुणवत्तेमुळे त्याने आपल्या अभिनयाला एक वेगळ्या प्रकारचीच कलाटणी दिली होती. विशेष म्हणजे, आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्याने वाट्याला आलेल्या हर एक भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं. ओम हा त्या अर्थाने मुळीच देखणा अभिनेता नव्हता. पण खरं सांगायचं तर- देखणा नसतानाही देखणा दिसणारा- असा हा अभिनेता होता ! 
ओमला समोर पडद्यावर अभिनय करताना पाहिलं की, त्याला केवळ पाहतच बसावंसं वाटायचं. हे देखणेपण त्याच्या रूपाने आलेलं नव्हे, तर त्याच्या कसलेल्या अभिनयामुळे आलेलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरची रेषनरेष अशी बोलायची. चित्रपट सृष्टीत कित्येक चेहरे देखणे असतात, पण हे चेहरे कधी काही "बोलत'च नाहीत. अशा चेहऱ्याचा काय उपयोग ?... म्हणून ओमचं यांपेक्षा वेगळं असं बोलकं देखणेपण अधिक महत्त्वाचं वाटतं मला. त्याच्या "आक्रोश' किंवा "अर्धसत्य'मधल्या भूमिका विसरू शकेल कोणी ?... 
तारुण्यात असल्यापासून ते पुढे वय वाढल्यावरही त्याच्या आवाजात, चेहऱ्यात आणि एकूणच व्यक्तिमत्त्वात जे काही बदल होत गेले, त्या सगळ्यांचा वापर करत आपला अभिनय सतत खुलवत नेणारा हा एकमेव नट होता असे मला वाटते. ओमचं हेच वैशिष्ट्य केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी दिग्दर्शकांनीही हेरलेलं होतं. त्यामुळे एकाचवेळी भारतात आणि परदेशी सिनेमांत सुद्धा काम करत राहणारा एकमेव अभिनेता तो होता. विशेष म्हणजे, परदेशी अभिनेत्यांपुढे त्याचं व्यक्तिमत्त्व आणि अभिनय अधिकच झळाळून यायचे. 
अभिनेता म्हणून मोठा असणारा ओम हा माणूस म्हणूनही तितकाच मोठा होता. आमची खूप चांगली मैत्री होती. त्याला माझ्या नाटकांचं, सिनेमाचं मनापासून कौतूक असायचं. एक अतिशय साधा, सरळ आणि लोभासवाण्या स्वभावाचा हा अभिनेता भारतीयांच्या दिर्घकाळ स्मरणात राहील... 
- जब्बार पटेल (दिग्दर्शक)

मी ओम पुरी यांना मागील 43 वर्षांपासून ओळखतो. मला तो कायम एक महान अभिनेता, दयाळू आणि मोठ्या मनाचा माणूस म्हणून लक्षात राहील. 
- अनुपम खेर 

तो आवाज... ते सहज स्मितहास्य.. तो भला असा सुंदर माणूस... थोडा लवकरच निघून गेला! बडे भैय्या ओम पुरी... आठवण तर खूप येईल तुमची! 
- प्रकाश झा

एक अभिनेता, एक शिक्षक, एक मित्र आणि एक महान आत्मा ओम पुरीजी. कलेप्रती असलेल्या उत्कट भावनेने आणि निरागसता हृदयात भरलेला. आम्हाला त्यांची आठवण येत राहील.
- अनिल कपूर

एका प्रदर्शित न झालेल्या चित्रपटात मी ओम पुरी यांच्यासोबत काम केले आहे. मजेशीर, उदार, कनवाळू आणि कॅमेरा सुरू होताच अगदी चपखल. जागतिक सिनेमामध्ये त्यांची उणीव भासेल.
- राहुल बोस

ओम पुरी... तुमच्याशी झालेली चर्चा नेहमीच जिवंत अशी असे. आम्हाला अभिमान असणाऱ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी तुम्ही एक आहात. 
- शुजित सरकार

आपल्यातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींपैकी एक गमावली आहे. एक बुद्धिवान, एक आवाज, एक चैतन्य. आम्हाल तुमची आठवण येत राहील पुरीसाहेब.
- बोमन इराणी 
 

ओम पुरी आपल्यात राहिले नाहीत हे कळल्यावर शब्दांत सांगण्यापलीकडे धक्का बसला. आम्ही तुम्हाला मिस करू सर. पुरी कुटुंबीयांच्या दुखात सहभागी.
- रितेश देशमुख

Web Title: bollywood pays tribute to om puri