बॉक्स ऑफिसवर 'सिक्वेल'चा धुमाकूळ, चालणार की डब्यात जाणार?|Bollywood Sequel Movies 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Sequel Movies 2023

Bollywood Sequel Movies 2023 : बॉक्स ऑफिसवर 'सिक्वेल'चा धुमाकूळ, चालणार की डब्यात जाणार?

Bollywood Sequel Movies 2023 : बॉलीवूडसाठी यंदाचे वर्ष मोठ्या कसोटीचे ठरणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडच्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यंदाच्या वर्षात शाहरुखचा पठाण आणि अजय देवगणचा दृष्यम वगळता बाकी इतरांच्या पदरी निराशा आली आहे.

बॉलीवूडमध्ये सिक्वेल ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र हॉलीवूडमध्ये सिक्वेलला ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो तो बॉलीवूडच्या सिक्वेलला मिळत नसल्याचे दिसून आले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमालचा आणि अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरचा अपवाद ओळखता अद्याप बऱ्याचशा सिक्वेलला प्रेक्षकांनी पसंत केले आहे. यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा सिक्वेलचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे.

Also Read - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

यावर्षी नव्यानं कोणते सिक्वेल प्रदर्शित होणार आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर एक प्रेम कथा या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी त्याचा पहिला भाग २००१ मध्ये आला होता. त्यावेळी त्याची थेट लढत ही आमिरच्या लगानशी होती. यावेळी या चित्रपटानं ७६.८८ कोटींची कमाई केली होती. तब्बल २२ वर्षांनी गदरचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ११ ऑगस्ट २०२३ रोजी तो प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि परेश रावलचा ओह माय गॉडचा पहिला भाग हा २०१२ मध्ये आला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. आता त्याचा दुसरा भाग याच वर्षी येणार आहे. मात्र अद्याप त्याची रिलिज डेट समोर आलेली नाही. धमाल विनोदी चित्रपट फुकरेचा तर तिसरा भाग येणार असून त्याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.

फुकरेचा पहिला भाग हा २०१३ मध्ये आला होता. त्यानंतर २०१७ मध्ये दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. फुकरेचा तिसरा भाग हा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच अजय देवगणच्या सिंघमच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत. सिंघमच्या पहिल्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती.

सिंघमच्या पहिल्या भागानं शंभर कोटींपर्यत मजल मारली होती. तर दुसऱ्या चित्रपटानं १४० कोटींपर्यत कमाई केली होती. सिंघम ३ यावर्षी प्रदर्शित होणार असून अद्याप त्याची रिलिज डेट समोर आलेली नाही. बॉलीवूडच्या भाईजानच्या टायगर चित्रपटाचा तिसरा भाग यावर्षी प्रदर्शित होणार आहे. टायगर ३ च्या टीझर आणि गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. दिवाळीच्या वेळेस हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

याशिवाय आयुषमान खुराणा याची भूमिका असलेला ड्रीम गर्ल हा २०१९ मध्ये आला होता. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याचा ड्रीम गर्ल २ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तो २९ जुन २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यासगळ्यात ओह माय गॉड आणि सिंघमच्या सिक्वेलला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या वर्षी कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.