बोनस : क्यूट पूजा सावंत आणि हँडसम गश्मीरचा उत्तम अभिनय

संतोष भिंगार्डे
Friday, 28 February 2020

"बोनस'मध्ये त्याने निवडलेला विषय अगदी हलक्‍याफुलक्‍या पद्धतीने मांडला आहे. कुठेही आततायीपणा नाही किंवा अधिक ड्रामा नाही. तरल आणि साधा व सोप्या भाषेत त्याने हा विषय हळहळू खुलवत नेला आहे.

दिग्दर्शक सौरभ भावेने "हापूस', "ताऱ्यांचे बेट'. "चुंबक', "हृदयांतर' अशा काही चित्रपटांचे लेखन केले आहे. कौटुंबिक विविध विषय चपखलपणे मांडण्यामध्ये तो चांगलाच पटाईत आहे. आता त्याने "बोनस' या चित्रपटाच्या लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट. "बोनस'मध्ये त्याने निवडलेला विषय अगदी हलक्‍याफुलक्‍या पद्धतीने मांडला आहे. कुठेही आततायीपणा नाही किंवा अधिक ड्रामा नाही. तरल आणि साधा व सोप्या भाषेत त्याने हा विषय हळहळू खुलवत नेला आहे. एका सुखवस्तू कुटुंबातील तरुण जेव्हा सामान्य माणसाच्या वस्तीत येतो आणि त्यानंतर त्याचा काय कायापालट होतो...त्याची जगण्याची सूत्रे किंवा विचार करण्याच्या पद्धतीत काय व कोणता बदल होतो हे बोनसमध्ये त्याने मांडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे स्टोरी?
आदित्य (गश्‍मीर महाजनी) या तरुणाची ही कथा. गश्‍मीरचे कुटुंब एका उद्योगपतीचे असते. त्याच्या आजोबांनी (डॉ. मोहन आगाशे) मोठा उद्योग उभारलेला असतो. आता गश्‍मीर वयात आलेला असतो आणि काही दिवसांतच तो कंपनीची सूत्रे आपल्या हाती घेण्याची चिन्हे दिसत असतात. तो कंपनीतील कामगारांना बोनस देण्यावरून त्याचे आजोबा आणि त्याच्यामध्ये वैचारिक मतभेद होतात. मग आजोबा आणि त्याच्यामध्ये एक पैज लागते. त्यानुसार तो एका कोळीवाड्यात राहायला येतो. तेथे त्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तेथे त्याची भेट मीनलशी (पूजा सावंत) होते. मीनल सीएची परीक्षा देणारी आणि सामान्य घरातील मुलगी असते. त्या दोघांमध्ये हळुवार प्रेमाचा अंकुर फुलतो आणि मग पुढे काय व कशा गोष्टी घडतात हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.
खरे तर बोनस हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा. माणसाच्या आयुष्यात एखादी गोष्ट अधिक येते त्यालाच बोनस म्हणतात. मग तो बोनस कधी पैशाच्या स्वरूपात येतो तर कधी एखाद्या आनंदाच्या क्षणी मिळतो...शेवटी बोनस ही आनंद देणारी बाब. पण, ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच असे नाही, काहींच्या आयुष्यात ही बाब असते तर काहींच्या आयुष्यात ती नसते. 

Image may contain: 3 people, text

हे वाचलंत का ? - ठरलं..अली फझल आणि रिचा चढ्ढा करणार एप्रिलमध्ये लग्न 

काय प्लस? काय मिसिंग?
दिग्दर्शक सौरभ भावेने अशा दोन्ही घटकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. जग एकच आहे आणि आपण सगळे या जगातील लेकरे आहोत. त्यामध्ये कुणाला काही अधिक मिळालेले असते तर कुणाला कमी प्रमाणात. परंतु, प्रत्येक जण आपापल्या परीने आयुष्य जगत असतो. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या घटनांचा सामना करीत तो जीवन व्यतीत करीत असतो...गश्‍मीर आणि पूजा ही जोडी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच दिसते. त्या दोघांनीही आपापली भूमिका चौख पार पाडली आहे. विशेष म्हणजे गश्‍मीरने कमालीचा अभिनय केला आहे. अगदी छोट्या छोट्या बाबी त्याने खुमासदार पद्धतीने पडद्यावर रेखाटल्या आहेत. कोळीवाड्यातील सामान्य मुलीची भूमिका पूजाने लिलया साकारली आहे. अन्य कलाकारांनीही आपली छाप चांगली उमटविली आहे. कोळीवाडा आणि तेथील परिसर छान टिपण्यात आला आहे आणि हे सगळे कौशल्य संजय मेमाणे या सिनेमॅटोग्राफरचे आहे. चित्रपटातील गाणी चांगली जमली असली तरी ,अशा प्रकारच्या कथानकामध्ये गाण्याला चांगला वाव असतो. पण, त्याबाबतीत चित्रपट निराश करतो. चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ जातो आणि उत्तरार्धात काहीसा विस्कळीतपणा जाणवतो. परंतु, एकूणच एक हलकाफुलका चित्रपट आहे.

सुव्रत अन् सायली ‘मन फकीरा’मध्ये पहिल्यांदाच झळकणार एकत्र

Image may contain: 5 people, people standing and outdoor, text that says "छोट्या क्षणांची बंपर धम्माल! 28" FEB 2020"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bonus movie review