'बॉईज 2' चा ट्रेलर प्रदर्शित; मुंबईत पार पडला सोहळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

​'बॉईज 2' या नावामुळेच अधिक प्रसिद्ध होत असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने उपस्थितांची मने जिंकली. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

मुंबई: तरुणाईवर आधारीत सिनेमा म्हटला की त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल असेल, तर त्या मस्तीला काहीच परिसीमा उरत नाही. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेला 'बॉईज 2' हा सिक्वेल 'बॉईज'गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. सिनेमाच्या ट्रेलरचे नुकतेच मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले. मुंबईतील लोअर परेल येथे पार पडलेल्या या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात गायक अवधूत गुप्तेच्या लाईव्ह गाण्याने उपस्थितांची संध्याकाळ शानदार बनली.  

boyz 2

शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि रोमान्स जरी दिसून येत असला तरी, आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाददेखील आपल्याला पाहायला मिळते. शिवाय ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील आपल्याला या ट्रेलरमधून दिसून येतात. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या अनुभवी कलाकारांची देखील यात भूमिका आहे. 

boyz 2

इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट एन्टरटेंन्मेंट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या 'बॉईज 2' सिनेमाचा ट्रेलर सिनेरसिकांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. विशाल देवरुखकर यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या सिनेमाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने केले आहे. तसेच, या तीन अतरंगी मुलांचा दंगा इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावरदेखील वितरीत केला जाणार असल्याकारणाने 'बॉईज 2' चा 'नॉईस' भारताबाहेरच्या प्रेक्षकांनादेखील अनुभवता येणार आहे.

संबंधित बातमी:
'बॉईज'ची अतरंगी पोरं 'बॉईज 2' मध्येही करणार दंगा ​


Boyz 2


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boyz 2 Trailer Launched Program In Mumbai