सीडीआर प्रकरणी आयशा श्रॉफ, कंगणा राणावत ही नावे समोर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ आणि बॉलिबूड क्वीन कंगणा राणावत यांच्याकडे आता संशयाचे काटे फिरले आहेत.

मुंबई - कॉल डिटेल्स् रेकॉर्ड (CDR) घोटाळा प्रकरणी अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी यांचे वकील रिझवान सिद्दीकी यांना अटक झाल्यानंतर आणखी दोन बड्या सेलिब्रिटीज् ची नावे समोर आली आहेत. जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ आणि बॉलिबूड क्वीन कंगणा राणावत यांच्याकडे आता संशयाचे काटे फिरले आहेत.

ठाणे क्राइम ब्रांच इन्वेस्टीगेशनच्या माहितीनुसार, आयशा श्रॉफ यांनी मित्र साहिल खान याच्या कॉलची माहिती मागवली होती. तर साहिल याने आयशा यांचे 8 करोड रुपये घेऊन परत न केल्याचा आरोप आहे. त्यावरुन या दोघांत प्रचंड वादही झाला होता. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंतही पोहोचला होता. त्यामुळे आयशा यांनी साहिल चे कॉल रेकॉर्ड मागविल्याची शक्यता आहे. यावरुन आयशा श्रॉफ यांची चौकशी होणार असल्याचे कळत आहे. 

कंगणा राणावत हिनेही कॉल रेकॉर्ड मागावले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कंगणाने कुणाचे कॉल रेकॉर्ड मागवले याची माहिती समोर आलेली नाही. पत्नीचे कॉन्टॅक्ट्स आणि ती कुठे आहे यावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराची मदत घेऊन नवाजुद्दीन सिद्दीकीने बेकायदेशीर सीडीआर मागवल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील रिजवान सिद्दिकीला यांना मुंबईतील वर्सोवाच्या कार्यालयातून क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. रिजवान सिद्दिकी या वकिलाने नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड्स मागवले होते. याप्रकरणी नवाजुद्दीन व वकिल रिजवान यांना वारंवार ठाणे पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आले होते. मात्र तरीही ते कोर्टासमोर हजर न झाल्याने वकिल रिजवान यांना अटक करण्यात आली आहे.

कॉल डिटेल्स् रेकॉर्ड प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जायचे आणि विकण्यात यायचे असा आरोप आहे. याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने दादरमधून 2 फेब्रुवारीला देशातील पहिली महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केली होती. वीस दिवसानंतर जामीनावर त्या तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. रजनी यांना अटक केल्यानंतर कॉल डिटेल्स् रेकॉर्डचे मोठे रॅकेट समोर आले. 
 

Web Title: call details record scam kangana ranaut ayesha shroff crime branch investigation