शांत, संयमी अन् कर्तृत्ववान नेता! सेलिब्रिटींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

uddhav thakrey
uddhav thakrey

उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना जवळून पाहणाऱ्या, त्यांच्या छायेत वावरणाऱ्या आणि नेहमी  समाजात रमणाऱ्या आपल्या माणसांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा...

मोठ्या माणसांनी लिहिलेली आणि मोठ्या माणसांवर लिहिलेली अनेक पुस्तकं सर्वांनाच वाचायला उपलब्ध असतात, परंतु फार कमी नशीबवान माणसांना ती मोठी माणसं प्रत्यक्ष वाचायला मिळतात. मी अशा नशीबवानांपैकी एक. कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मला जवळून वाचता आलं. दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा एकत्रित अभ्यास करण्यासारखं रोमांचक दुसरं काहीच नाही! एका वटवृक्षाच्या छायेत वाढत असताना सूर्यकिरणांचा शोध घेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं, हे मोठं कठीण काम! परंतु, उद्धव साहेबांनी ते यशस्वीरीत्या करून स्वतःला सिद्ध केलं. प्रत्येक बिकट प्रसंगात मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या स्मितहास्याने आणि गोड शब्दांनी जखमेवरील फुंकरीसारखं काम केलं. माझं ‘जय जय महाराष्ट्र‘ गीत आलं तेव्हा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी निषेध करीत सीडींचं दहन केलं होतं. फार जिव्हारी लागलं ते. अत्यंत व्यथित होत मी जेव्हा ‘मातोश्री‘वर पोहचलो, तेव्हा उद्धव साहेब मला म्हणाले, `ज्याअर्थी या गाण्याला इतका विरोध होतोय, तुला इतका त्रास सहन करावा लागतोय म्हणजे तू क्रांतिकारी विचार मांडलेले आहेस. तू ‘आजचं‘ गाणं केलं आहेस, परंतु ते ‘उद्या‘ चिरंतन काळपर्यंत टिकणार आहे. मी आणि शिवसेना, आम्ही कायमच तुझ्याबरोबर आहोत...` उद्धव यांच्या आधार देणाऱ्या शब्दांमुळेच मी पुढे व्यक्त होताना कधीच घाबरलो नाही. आजच्या कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य बजावताना ते दाखवत असलेल्या धडाडीचं संपूर्ण महाराष्ट्र कौतुक करत आहे. एक पक्षाध्यक्ष म्हणून त्यांची कार्यपद्धती मी पाहिली आहे. तेव्हाच माझी खात्री झाली होती की, हा माणूस उद्या मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला मिळाला तर नक्कीच एक आदर्श कारकीर्द घडवेल! ...आणि आज ते घडतंय. अशा धडाडीच्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
- अवधूत गुप्ते, गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक

माझी आणि उद्धव ठाकरेंची पहिली भेट `बालगंधर्व` चित्रपटाच्या वेळी झाली. त्यानंतर कार्यक्रमांच्या निमित्ताने  आम्ही वरचेवर भेटत गेलो. तेव्हा मी कोणत्याच राजकीय पक्षाचा घटक नव्हतो. आदेश बांदेकर आणि माझी आधीपासून ओळख होतीच. जेव्हा शिवसेना चित्रपट सेना स्थापन करायचं ठरलं तेव्हा आदेश आणि उद्धवजींनी त्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली नि मी त्यांच्याबरोबर जोडला गेलो. उद्धवजींबद्दल सांगायचं तर अतिशय प्रेमळ, लाघवी अन् समोरच्यावर मनापासून प्रेम करणारं व्यक्तिमत्त्व. शिवसेना चित्रपट सेनेसाठी काम करायला लागून मला जवळजवळ आठ वर्षं झाली, पण मला एकदाही आठवत नाही की पक्षाच्या कामासाठी त्यांनी मला चौकटीबाहेर जाऊन काही करायला सांगितलंय. म्हणजे एक-दोनदा असं झालं की निवडणुकीचा प्रचार सुरू होता आणि मला फोनच नाही केला. मग मीच त्यांना फोन करून विचारलं, की मी जायचंय का कुठे प्रचाराला? त्यावर ते म्हणाले होते, की तुम्ही कामात असाल ना... पण मी एक दिवस जाऊ शकतो, असे मी त्यांना सांगितलं तेव्हा मला त्यांनी शिरूरला जाण्यास सांगितलं होतं. तेव्हाही फोन करून ते सतत माझी आस्थेने विचारपूस करत होते. जेव्हा त्यांचा फोन येतो तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो की, कामात असाल तर नंतर फोन करतो. त्यामुळे ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, असं कधी जाणवलंच नाही. आता ते मुख्यमंत्रीही आहेत, पण त्या पलीकडे ते माणूस म्हणून खूप मोठे आहेत. माझ्या मनात एखादी गोष्ट आली तर ती मी त्यांना बेधडकपणे सांगू शकतो एवढं स्वातंत्र्य आमच्या नात्यात आहे याचा मला आनंद आहे. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी चित्रपटसृष्टीला मदतीचा हात दिला. आमच्या एका मागणीवर झूम अॅपवरून त्यांनी नाटक, नृत्य आणि चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या मंडळींशी दीड-पावणेदोन तास संवाद साधून तातडीने तोडगा काढला. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद त्यांच्यावर आहेच. तसंच संपूर्ण शिवसैनिकांची शक्ती आणि महाराष्ट्र त्यांच्याबरोबर उभा आहे. त्यामुळे मला खात्री आहे कोरोनाच्या कठीण  काळातून ते महाराष्ट्राला बाहेर काढतील. त्यांचे प्रेम राजकारणाच्या पलीकडचे आहे. मनाने आणि हृदयाने कलाकार असलेला असा एक माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला याचा खरंच अभिमान आहे.
- सुबोध भावे, अभिनेता, दिग्दर्शक आणि शिवसेना चित्रपट सेना उपाध्यक्ष

उद्धव ठाकरे खरेच एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व. राजकारणापलीकडचा एक शांत-साधा माणूस. आदित्य ठाकरे यांनी लहानपणी काही कविता केल्या होत्या. त्याच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धवजी आणि रश्मी वहिनी यांची पहिल्यांदा भेट झाली. त्या वेळी त्यांच्यातील शांत असे वडील मी पाहिले. त्यानंतर त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत भरलं तेव्हा मला त्यांच्यातील  टॅलेंटेड कलाकार जाणवला. त्यांच्याबद्दल एक आदराची भावना माझ्या मनात निर्माण झाली. उद्धवजी मुख्यमंत्री झाले तेव्हा मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. आपल्यातीलच एक माणूस मुख्यमंत्री झाल्याची सर्वांची भावना होती. मी तर संपूर्ण शपथविधी सोहळा तेथे जाऊन डोळे भरून पाहिला. शांतचित्ताने, विचारपूर्वक आणि तितक्याच खंबीरपणे ते ठाम राजकीय निर्णय घेतात. सध्याच्या कोरोनाच्या काळातही ते शांतपणे परिस्थिती हाताळत आहेत. त्यांचे फेसबुकचे व्हिडीओ पाहताना आपल्या घरातीलच वडीलधारा माणूस आपल्याशी संवाद साधतेय आणि आपल्यासाठी झटतेय, असं अगदी सहज वाटून जातं. त्यांचे विचार आशादायी असतात. त्यांच्या बोलण्यात कुठेही भंपकपणा नसतो. हे असे आहे आणि आम्ही ते करीत आहोत, असा साधा सरळ हिशेब. म्हणूनच त्यांच्यावरचा विश्वास कैकपटीने वाढतो. कोव्हिडच्या संकटकाळात ते मुख्यमंत्री आहेत हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. उद्धवजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...  
- वैशाली सामंत, गायिका आणि संगीतकार

उद्धव ठाकरे म्हणजे एक आदर्श राजकीय नेता. मी आतापर्यंत पाहिलेलं सगळ्यात नम्र व्यक्तिमत्त्व. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून मी आवर्जून म्हणेन की आपल्याला खूप चांगलं नेतृत्व करणारा मुख्यमंत्री मिळालाय. त्यांच्यात एक कलाकारही दडलेला आहे. कोणताही कलाकार मनाने साफ आणि निर्मळ असतो. राजकीय व्यक्तिमत्त्वातील कलाकार सामान्यांच्या अडचणी आणि त्यांचं मन उत्तमप्रकारे जाणू शकतो. कोरोना काळात मोठी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्याला त्यांनी ज्या प्रकारे सांभाळलाय ते खरंच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंच्या रूपात खंबीर नेतृत्व मिळालंय. त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
- सोनू सूद, अभिनेता

उद्धव ठाकरेंबाबत मला अभिमानाने सांगावंसं वाटतं ते म्हणजे ते आमच्याच कॉलेजचे म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट्सचे विद्यार्थी आहेत. अत्यंत संयमी, शांत आणि मृदू स्वभावाचं व्यक्तिमत्त्व. चार महिने ते कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ज्या प्रकारे लढत आहेत ते खरंच अभिमानास्पद आहे. मुळातच त्यांचा स्वभाव शांत. समोरच्यालाही ते उत्तम प्रकारे धीर देऊन शांत करतात. प्रत्येक संकटाला अत्यंत धीरोदात्तपणे सामोरं जाणं हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट. विचारपूर्वक बोलणं आणि कृती करणं ही आणखी एक त्यांची जमेची बाजू. ते एक उत्तम छायाचित्रकार आहेत. प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो, असा माणूस आपला मुख्यमंत्री आहे हे आपलं भाग्य. माझ्या आणि आमच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या संपूर्ण परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछा.
- रवी जाधव, चित्रपट दिग्दर्शक

`ठाकरे` चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान एक संवादलेखक म्हणून उद्धव ठाकरेंना भेटण्याचा योग आला होता. तेव्हा फोटोग्राफीवर आमची थोडी फार चर्चा झाली. ते मुळात कलावंत असल्यामुळे आणि त्यातही फोटोग्राफी उत्तम
करीत असल्यामुळे त्यांच्याकडे चांगली दूरदृष्टी आहे. त्यांचं निरीक्षण खूप चांगलं आहे. एखादा विषय ते समजून घेतात आणि त्यानंतरच त्यावर भाष्य करतात. राजकीय भाष्य अधिक न करता शांत अन् संयमी बोलण्यावर त्याचा भर असतो. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी केलेलं भाषण ऐकल्यानंतर माझाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा त्यांच्यावर विश्वास बसला. तेव्हाच सगळ्यांना महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व मिळाल्याची खात्री झाली. आताही कोरोनासारखी परिस्थिती त्यांनी संयमितपणे हाताळली आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- अरविंद जगताप, पटकथा लेखक

आपल्याला नेहमी वाटते, की मुख्यमंत्री आपल्या मातीतला, आपल्यातलाच एक माणूस असावा... जो आपल्याबरोबर संवाद साधेल, आपले दुःख ऐकेल, आपल्या अडचणी जाणून घेईल आणि त्या सोडवायला आपल्याला मदत करील. उद्धव ठाकरे नावाचं व्यक्तिमत्त्व तसंच आहे. ते सगळ्यांसोबत तसेच वागतात. भेदभाव करणे त्यांच्या स्वभावात नाही. आम्हा कलाकारांना तर त्यांचा कायम पाठिंबा असतो. ते स्वतः एक उत्तम कलाकार आहेत. कलाकारांच्या बाजूने ते नेहमीच ठामपणे उभे असतात. त्यांच्यातील नेतृत्वगुण कौतुकास्पद आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला आधार दिला आहे. मी गावातल्या लोकांशी बोलते तेव्हा त्यांच्या मनातसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर जाणवतो. त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- दीपाली सय्यद, अभिनेत्री

संपादन- दिपाली राणे-म्हात्रे

celebrities wishesh cm uddhav thakarey on his birthdays 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com