‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणं लाँच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

अनिकेत विश्वासराव म्हणाला, 'माझा सिनेसृष्टीत प्रवेश अशोकमामांसोबतच्या सिनेमामधून झाला. आणि आता पार्श्वगायनात डेब्यू होतानाचं गाणंही अशोक मामांसोबतच आहे. त्यामुळे मी स्वत:ला लकी समजतो.'

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ हे धमाल हळदीचं गाणं प्रदर्शित झालं आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबध्द केलेलं ‘चंद्रमुखी’ हे गाणं गायलं आहे.    

सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन गाण्याविषयी सांगतात, 'सागर खेडेकर यांनी लिहीलेल्या गीताला सुकूमार दत्तांनी उडत्या चालीत इतके चपखलपणे बसवले आहे की, गाणं पटकन ओठांवर रूळतं. आम्ही चित्रीकरणादरम्यान हे गाणे सतत गुणगुणत होतो आणि मला पूर्ण विश्वास आहे, की सिनेरसिकांनाही हे गाणे खूप आवडेल.'

या गाण्याविषयी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणतात, 'या अगोदर सगे-सोयरे आणि कळत-नकळत सिनेमांमधून मी गाणे गायले आहे. त्यामुळे हे गाणं रेकॉर्ड होताना त्या गाण्यांचा रेकॉर्डिंगचा अनुभव गाठीशी होताच, शिवाय हे हळदीचं गाणं असलं तरी मिश्किल बाजाचे असल्याने ते आमच्या आवाजात शोभते आहे.'

अनिकेत विश्वासराव म्हणाला, 'माझा सिनेसृष्टीत प्रवेश अशोकमामांसोबतच्या सिनेमामधून झाला. आणि आता पार्श्वगायनात डेब्यू होतानाचं गाणंही अशोक मामांसोबतच आहे. त्यामुळे मी स्वत:ला लकी समजतो.'

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे यांची निर्मिती असलेला, सचिन संत यांची सहनिर्मिती असलेला  प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर ला रिलीज होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandramukhi song in hrudayat something something movie launched