‘इफ्फी’मध्ये कलापूरची ‘चौकट’

उमेश बगाडे
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

‘इफ्फी’ ने ‘चौकट’ची दखल घेतल्याने आमचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. या लघुपटासाठी कुठल्याही कलाकार, तंत्रज्ञाने मानधन घेतलेले नाही. एक चांगला प्रकल्प या एकाच उद्देशाने सर्वांनी एकत्रित येऊन प्रकल्प पूर्ण केला. भविष्यात अनेक चांगले प्रकल्प करायचे आहेत. 
- उमेश बगाडे, लेखक- दिग्दर्शक

गोव्यातील ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला २० नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. यंदाही महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटासह ‘नटसम्राट’, ‘एक अलबेला’, ‘रिंगण’ हे चार मराठी चित्रपट दाखवण्यात येतील. मिथुन चंद्र चौधरी दिग्दर्शित ‘पायवाट’, निशांत रॉय बोंबार्डे दिग्दर्शित ‘दारवठा’ आणि कोल्हापूरच्या उमेश मोहन बगाडे दिग्दर्शित ‘चौकट’ या तीन लघुपटांचीही निवड झाली आहे. 

‘चौकट’च्या ‘इफ्फी’तील निवडीमुळे कोल्हापूरची ‘कलापूर’ ही ओळख पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाली आहे. ॲडव्हेंचर्स प्रॉडक्‍शनची निर्मिती असलेल्या ‘चौकट’मधून दगडाच्या मूर्तीत सर्वांना देव दिसतोच; तसा माणसातही माणूस दिसलाच पाहिजे, हा संदेश दिला आहे. 

लघुपटाच्या कलात्मक व तांत्रिक बाजू कोल्हापूरच्याच कलाकार, तंत्रज्ञांनी सांभाळल्या आहेत. लघुपटात शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागातील प्रा. विजय पवार, अभिनेत्री व नृत्यांगना कोमल आपके यांनी भूमिका साकारल्या आहेत. अभिषेक शेटे याने छायांकन केले असून उत्कृष्ट छायांकनासाठी त्याला आत्तापर्यंत पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन, ऐश्‍वर्य मालगावे यांनी पार्श्‍वसंगीत, सागर ढेकणे व अभिषेक संत यांनी कलादिग्दर्शन केले आहे. अमर कुलकर्णी यांनी रंगभूषा, वेशभूषा, जाई दिघे हिने उपशीर्षके आणि अमर कांबळे यांनी स्थिरचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. संदीप गावडे, विजय कुलकर्णी, अक्षय क्षीरसागर, पुष्कराज ठक्कर, सुमित सासने यांचे लघुपटासाठी सहकार्य लाभले आहे. 

अनेक पुरस्कारांनी सन्मान...

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. इटलीमधील रिव्हर टू रिव्हर फ्लोरान्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल, चेन्नईतील चेनीम फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, पॉकेट फिल्म फेस्टिव्हलमध्ये व्हिर चॉईस बेस्ट फिल्म, मुंबईतील पुकार फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्‍टर आणि बेस्ट कन्सेप्ट असे तीन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच बायोस्कोप फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, हरियाणा फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, सिमला तसेच दिल्ली येथील वुडपीकर फिल्म फेस्टमध्ये बेस्ट फिल्म असे पुरस्कार पटकाविले आहेत. फिल्मिंगो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलतर्फे कान्स फिल्म फेस्टिव्हलला पाठविण्यासाठी या लघुपटाची निवड झाली आहे.

Web Title: chaukat movie in iffi movie mahotsav